For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विलिनीकरणाचा भूसनळा

06:30 AM May 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
विलिनीकरणाचा भूसनळा
Advertisement

निवडणुकीचा तिसरा टप्पा पार पडताच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत देताना लोकसभा निवडणुकीनंतर काही प्रादेशिक पक्ष हे काँग्रेस पक्षाला सहकार्य करतील किंवा काँग्रेसमध्ये विलीन होतील, अशी शक्यता व्यक्त केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची विचारधारा एकच आहे. ती महात्मा गांधी-पंडित नेहरु यांना मानणारी आहे, असे सूचक विधानही त्यांनी केले. त्यामुळे राज्यात शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाच्या घर वापसीची चर्चा सुरु झाली आहे. पवारांच्या मार्गशर्दनाखाली वाटचाल करणारा उद्धव ठाकरे गटाचा शिवसेना पक्षही काँग्रेसमध्ये विलीन होणार का? ममता बॅनर्जी, बी. आर. एस. वगैरे काँग्रेस विचारधारेचे पक्ष यांच्याकडेही संशयाने पाहिले जाते आहे. ओघानेच राजकारणात खळबळ माजली आहे आणि विविध पक्ष व त्यांचे उमेदवार यांच्याकडे संशयाने पाहिले जाते आहे. महाराष्ट्रात तर लोकसभेच्या पाठोपाठ विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे अनेकांना अनेक प्रश्न पडले आहेत. शरद पवार यांनी आपल्या सुमारे साठ वर्षांच्या राजकीय वाटचालीत अनेकवेळा काडीमोड तर संधी बघून घरवापसी किंवा युती-आघाडी केली आहे. बाहेरुन पाठिंबा, आतून पाठिंबा, मते आणि आमदार फोडणे, पुन्हा विलीन होणे, संक्रांतीचे तिळगूळ देत आघाडी करणे यामध्ये ते वाक्बगार आहेत. त्यांच्या या उड्यांना महाराष्ट्रात राजकारण म्हणून ओळखले जाते. साहेबांची चाल कुणालाच कळत नाही, फार धोरणी वगैरे कौतुकही केले जाते. पण, पवारांना पक्ष व त्यांचे संघटन एखाद्या बसगाडीसारखे आहे. बसमधून काही प्रवासी उतरले तर त्याच भागातले अन्य प्रवासी घेऊन शरद पवार आपली पक्षाची बस सत्तेच्या स्थानकावर नेतात, हा इतिहास आहे. यावेळी त्यांची पंचाईत झाली आहे. अजितदादांनी प्रवाशांसह बसचा ताबा घेतला आहे. त्यामुळे पवार विरुद्ध पवार असा बारामतीचा सामना कडवा बनला आहे. बारामतीला कुणीही जिंकले तरी राजकीयदृष्ट्या ती शरद पवारांची हार मानली जाते आहे. ओघानेच पवारांनी विलिनीकरणाचा नवा भूसनळा पेटवून जनतेचे लक्ष इतरत्र वळवले आहे. पवारांचा अंदाज कुणालाही नाही. त्यांनाही नाही. तेल लावलेले ते ज्येष्ठ पेहलवान आहेत. पण, त्यांची गाडी सत्तेच्या सावलीतच विसावते हे महाराष्ट्राने अनुभवले आहे. इंडिया आघाडीच्या निर्मितीत आणि शिवसेना भाजपा यांची अनेक वर्षांची युती संपुष्टात आणण्यात पवारांचा पुढाकार होता. लोकसभेची निवडणूक ऐन मध्यावर असताना शरद पवारांनी उडवलेला भूसनळा कोणाला भाजून काढतो, हे बघायला हवे. पण, कोणते पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार, अशी आता चर्चा सुरु झाली आहे. शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे यांनी पवारांच्या या विधानाबाबत सावध प्रतिक्रिया दिली आहे. साहेबच सांगतील इंडिया आघाडीत आम्ही सर्व एकत्र आहोतच वगैरे वगैरे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असे म्हटलेले नाही वगैरे गुळमुळीत उत्तर दिले आहे तर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी यात आश्चर्य नाही, असे म्हटलंय. शरद पवारांना, उद्धवजी ठाकरेंना आपला पक्ष चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळे त्यांचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण झाले तर आश्चर्य नाही, असे म्हटले आहे. नुकतेच एकनाथ शिंदे गटात सामिल झालेले एकेकाळचे काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी पवारांनी महाराष्ट्रात काँग्रेसची धुरा सुप्रिया सुळेंच्या हाती देता तर पक्ष विलीन करतो, अशी काँग्रेस हायकमांडला काही वर्षांपूर्वी ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट केला आहे. ओघानेच शरद पवारांना निवृत्तीचे वेध लागले आहेत. कन्येची सोय लावायची आहे, असे दिसते. प्रदेश काँग्रेसच्या काही नेत्यांनी अंगावरचे जुने राजकीय वळ मागे टाकून विलिनीकरण करणार तर स्वागत आहे, असे म्हटले आहे. पण, काँग्रेस हायकमांडने पवारांचा हा गुगली चेंडू न खेळता सोडून दिला आहे. भाजपाला मिशन चारशे पार कठीण दिसते आहे. निवडणूक प्रचाराच्या प्रारंभी त्याची जोरदार घोषणा होत होती, ‘अब की बार 400 पार’, असे वारंवार म्हटले जात होते. पण, तिसरा टप्पा सुरू होताच ही घोषणा मागे पडली आहे.  महाराष्ट्रातील जातीय समिकरणे, संघर्ष आणि सहानुभूतीची लाट यामुळे राज्यातली भाजपा महाआघाडीला चाळीस पार शक्य नसल्याचे मानले जाते आहे. तिसऱ्या टप्प्यात मोदींनी महाराष्ट्रात उन्हातान्हात केलेली वणवण या गोष्टीची निदर्शक मानली जाते. पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांची दोन-चार मतदारसंघात सहानुभूतीची जादू चालेल असेही अंदाज बांधले जात आहेत. या साऱ्या पार्श्वभूमिवर शरद पवारांनी काँग्रेस पक्षात प्रादेशिक पक्ष विलीन होतील, असे म्हटले असले तरी शरद पवारांचा इतिहास विरोधात बसण्याचा नाही. शरद पवार विरोधात बसण्यासाठी आपला पक्ष विलीन करतील असे वाटत नाही. सत्तेचे लोणी असेल तरच ते काहीही करू शकतात.  त्यांनी विलिनीकरणाचा हा सापळा अन्य कुणासाठी तरी लावला असावा. काँग्रेस नेते शरद पवारांच्या बाबतीत फार सावध असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचार सभातून बोलताना चार जून ही इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आहे, अशी टिपणी केली आहे. पवारांचा प्लॅन काय हे हळूहळू स्पष्ट होईल. पण, ते मुलीचे व उद्धव ठाकरे मुलाचे भवितव्य बघणार हे उघड आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची केव्हाच काँग्रेस झाली आहे. विलिनीकरण केवळ औपचारिकता आहे, असे म्हटले आहे. पण, शिवसेनेचा व स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा इतिहास ज्यांना माहिती आहे त्यांना आणीबाणीनंतर बहुतेक सर्व विरोधी पक्ष जनता पक्षात सामिल झाले. पण, बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्वतंत्र ठेवली, हे स्मरणात असेल. अजित पवारांनाही उद्धव ठाकरे काँग्रेसमध्ये आपली संघटना विलीन करतील, या शक्यतेला नाकारले आहे. पण, राजकारणात काहीही होऊ शकते. निवडणूक चौथा व पाचवा टप्पा वातावरण कसे होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. शहरी भागात महायुतीला बरे वातावरण दिसले तरी ग्रामीण भागात अनेक ठिकाणी काटे की टक्कर आहे. इंडिया आघाडीला काही ठिकाणी प्रतिसाद मिळतो आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभांना व बोचऱ्या टीकेला प्रतिसाद आहे. यासाऱ्या पार्श्वभूमिवर शरद पवारांनी पेटवलेला विलिनीकरणाचा भूसनळा कोणाला चटका देतो, कोणाला आनंद देतो हे हळूहळू समजेल. पण, पवारांचे काही प्लॅनिंग दिसते.

Advertisement

Advertisement
Tags :

.