Vari Pandharichi 2025: अनादी काळापासून असणारी वारीची परंपरा काय सांगते?
टाळकऱ्यांच्या या आनंद कल्लोळात विठुराया नाचू लागतो
Vari Pandharichi 2025: पंढरीच्या वारीच्या वाटेवर रिंगणात आनंदाची बरसातच होते. हजारो वारकऱ्यांच्या हातातील टाळ एका तालात, लयीत झणझणत असतात. आकाशाकडे उंचावलेल्या लाखो टाळांमधून केवळ ज्ञानबा तुकाराम हा गजर ऐकू येत असतो. त्या निनादणाऱ्या गगनाच्या गाभाऱ्यात जणू भगवंत प्रगट होतो.
टाळकऱ्यांच्या या आनंदकल्लोळात विठुराया नाचू लागतो. टाळ शक्यतो पितळी असतात. याव्यतिरिक्त काशाचे सुद्धा टाळ बनवतात. टाळ म्हणजे दोन पितळी द्रोणासारख्या आकाराचे भाग, दोरीने एकत्र बांधलेले असतात. हे दोन भाग एकमेकांंवर आटपून नाव निर्माण होतो.
पंढरीची वारी आहे माझे घरी। आणिक न करी तीर्थव्रत।। या संत तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे तुकाराम महाराजांचे आठवे पूर्वज विश्वंभरबाबा हे देखील वारी करत होते. तसेच संत ज्ञानेश्वरांचे पणजोबा त्र्यंबकपंत हे देखील पंढरपूरची वारी करत होते. वारीची पंरपरा ही अनादी काळापासून सुरू आहे.
नंतरच्या काळात संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत चोखोबाराय, संत गोरोबा काका, संत मुक्ताबाई आदी सर्व संत मांदियाळीने पंढरपुरातील चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये क्रांती केली. वेदप्रामाण्यानुसार ज्ञानग्रहण, ज्ञानदान करण्याचा अधिकार त्या काळी स्त्री शूद्रांना नव्हता. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवदगीता प्राकृत अर्थात मराठीमध्ये सांगितली.
त्यातून ज्ञानार्जन, ज्ञानग्रहण, ज्ञानदानाचा अधिकार सर्व समाजाला दिला. सर्व संत मांदियाळीनं समतेचं प्रतीक असणारा पंढरपूरचा पांडुरंग हे आराध्यदैवत मानले. ज्ञानेश्वरी, संत नामदेवांची गाथा असेल, एकनाथ महाराज यांचे भागवत असेल किंवा तुकोबांची गाथा असेल, या सर्व ग्रंथांना प्रमाण मानून सर्व वारकरी संप्रदायाची रचना होत गेली.