सर्वात शक्तीशाली अंक कोणता...
‘गणित’ हा असा विषय आहे, की ज्याची प्रत्येकाला आवश्यकता आहे. अनेकांना त्यांच्या शालेय जीवनात हा विषय शत्रूस्थानी वाटत असतो. तरीही निदात त्यात उत्तीर्ण होण्याइतके गुण तरी मिळवावेच लागतात. व्यवहारी जीवनात या गणिताचे किमान पायाभूत ज्ञान असल्याखेरीज आपण काहीही करु शकत नाही. साधे बाजारातून भाजी आणण्याचे काम असो, त्यालाही गणित लागतेच. नाहीतर भाजीवाल्याकडूनही आपण फसवले जाण्याचा धोका असतो.
काही लोकांची मात्र या विषयात भलतीच प्रगती होते. गणितातील अत्यंत अवघड प्रश्नही असे लोक लीलया सोडवितात. तसेच अवघड गणितेही ते निर्माण करतात. गणितात संख्या ही असतेच असते. तेव्हा जगातील सर्वात शक्तीशाली संख्या कोणती असा प्रश्न असून त्याचे उत्तर देणे या विषयातील मान्यवरांनाही आजवर जमलेले नाही, असे प्रतिपादन केले जाते. संपूर्ण अंकगणित शून्य ते नऊ या 10 अंकांनी बनलेले आहे. याच अंकांपासून संख्या निर्माण होतात. त्यामुळे या अंकांमधील सर्वात शक्तीशाली अंक कोणता असा प्रश्न विचारण्यात आला आहे.
तसा प्रत्येक अंक महत्वाचाच असतो. पण सध्या याच प्रश्नावर एक व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. या व्हिडीओत एका व्यक्तीने सर्वात शक्तीशाली अंक 9 असल्याचे स्पष्ट केले आहे. याचे कारण काय ? तर 9 या अंकाला कोणत्याही पूर्णांकाने गुणले असता जी संख्या येते, त्या संख्येतील आकड्यांची बेरीज केली असता ती नेहमी 9 च भरते. उदाहरणार्थ, 9 गुणिले 12 याचे उत्तर 108 आहे. आता 108 या संख्येतील अंकांची बेरीज केली असता ती 9 होते. असे इतर कोणत्याही अंकांच्या संदर्भात घडत नाही. केवळ 9 या एकाच अंकाच्या सध्या हा व्हिडीओ बराच लोकप्रिय झाला असून अनेकांनी त्यावर आपली मते व्यक्ती केली आहेत. 9 या अंकाच्या संदर्भातच असे घडते हे मान्य केले तरी तेव्हढ्या एकाच कारणास्तव तो सर्वात शक्तीशाली अंक कसा ठरतो, असाही प्रश्न काहींनी विचारला आहे. आपणही यावर विचार करु शकता आणि आपले मत बनवू शकता. पण अंकांचा हा खेळ स्वारस्यपूर्ण आहे, हे खरे आहे.