कझाकस्तान विमान अपघातात 42 ठार
25 जणांना वाचविले : विमान तातडीने उतरविण्यात येत असताना लागली आग
वृत्तसंस्था / मॉस्को
अझरबैजान या देशाचे 67 प्रवाशांना घेऊन जाणारे प्रवासी विमान कझाकस्तान या देशात अपघातग्रस्त विमानातील 42 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 25 जणांना वाचविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. विमान धावपट्टीवर उतरत असताना त्याला आग लागली. यात विमानाचा बहुतांश भाग जळून खाक झाला. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने ते तातडीने उतरविण्यात येत होते. मात्र, त्याचवेळी विमानाला आग लागून मोठा स्फोट झाला, अशी माहिती देण्यात आली.
प्राथमिक वृत्तानुसार विमानातील 28 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तथापि, या विमानातील एकही प्रवासी वाचण्याची शक्यता नाही, असेही नंतर स्पष्ट करण्यात आले होते. विमानातील प्रवाशांच्या संख्येसंबंधीही गोंधळ होता. पण रात्री उशीराच्या वृत्तानुसार मृतांची संख्या 42 असल्याचे स्पष्ट करण्यात आले. प्रवाशांसह या विमानात 5 विमान कर्मचारीही होते. रशियाच्या वृत्तसंस्थेने विमानाला अपघात झाल्याची माहिती दिली. हे विधान अझरबैजान एअरलाईन्स या कंपनीचे असून ते अझरबैजानची राजधानी बाकू येथून रशियाच्या ग्रोझनी येथे चाललेले होते. दाट धुक्यामुळे विमानाची दिशा चुकली आणि त्याचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. त्यामुळे ते तातडीने उतरविण्याचा प्रयत्न वैमानिकाने केला, बर्फाळ भूप्रदेशावर ते उतविण्यात येत असताना अचानक आग लागली. काही क्षणातच आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण विमानाला घेरले. साहाय्यतेचे प्रयत्नही अपुरे पडले.
व्हिडीओ चित्रिकरणातून घटना स्पष्ट
या विमानाला तातडीने उतरविण्यात येत असताना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या घटनेचे चित्रिकरण झाले आहे. त्यामुळे विमान उतरवत असताना नेमके काय घडले, हे प्रत्यक्ष दिसून येत आहे. तसेच विमानाच्या चाकांनी भूमीला स्पर्श करताना विमानाला आग लागल्याचेही या चित्रिकरणात स्पष्ट दिसत आहे. ज्या स्थानी विमान उतरविण्यात येत होते, तेथे कोणतीही साहाय्यता सुविधा उपलब्ध नसल्याने विमानातील कोणी वाचले असण्याची शक्यता नसल्याचेही कझाकस्तानच्या प्रशासनाने स्पष्ट केले. मात्र प्रयत्न करण्यात येत होते.
अक्ताऊनजीक अवतरण
कझाकस्तान या देशातील अक्ताऊ या शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर हे विधान उतरविण्यात येत होते. हे विमान ‘एंबरीर 190’ या जातीचे असून रशियन बनावटीचे होते. विमानाच्या इंजिनात ते हवेत असतानाच बिघाड झाल्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. अझरबैजान देशाच्या प्रशासनाने या अपघाताची चौकशी करण्याचा आदेश दिला असून चौकशीअंती अपघाताचे खरे कारण स्पष्ट होईल, अशी शक्यता वर्तविली आहे. घातपाताच्या कारणास्तव ही घटना घडली असल्याची शक्यता प्रथमदर्शनी नाकारण्यात आली आहे. मात्र, चौकशी सर्व शक्यता गृहित धरुन केली जाणार आहे.