For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जो दिखता है, वह है नही

06:02 AM May 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
जो दिखता है  वह है नही
Advertisement

अध्याय पहिला

Advertisement

सृष्टीतील सर्व सजीवनिर्जीव स्वत:पासून निर्माण झाल्याचे बाप्पा राजाला सांगत आहेत. याचाच अर्थ असा की, हे दिसणारं सर्व जग आणि आपण सर्व ही बाप्पांचीच रूपं आहेत. बाप्पा पुढं म्हणाले, मी सर्वांचा साक्षी आहे, सर्व जग मला दिसते. मी सर्व कर्मापासून अलिप्त आहे, निर्विकार, अप्रमेय-अव्यक्त-ज्याचे यथार्थ स्वरूप कोणाला कळत नाही असा, सर्वव्यापी व अव्यय-नाशरहित आहे. संपूर्ण जगाचा डोळा मीच आहे. मी असंख्य डोळ्यांनी जगातील सर्वांचे व्यवहार, व्यापार पहात असतो. साक्षीत्वाने जग चालवत असतो. कुणाचेही किंचितसेही कर्म माझ्या नजरेतून सुटत नाही. जग जरी माझ्या सत्तेने चालत असले तरी कुणाच्याही कोणत्याही कर्माचा लेप मला लागत नाही अव्यय व आनंदरूपी परब्रह्म मी आहे. माझी माया सर्व श्रेष्ठ जनांना देखील मोहित करते. मी परब्रह्म असून नाना प्रकारची बुद्धी व मोहमयी सिद्धी असे माझ्या मायेचे स्वरूप आहे.

बाप्पांचं सांगणं लक्षात घेतलं तर एक प्रश्न मनात येणं साहजिक आहे आणि तो म्हणजे,  ही सर्व सृष्टी तयार होण्यासाठी आवश्यक ते साहित्य कुठून आलं असेल? या प्रश्नाचे उत्तर जाळं विणणारा कोळी आपल्याला देतो. ज्याप्रमाणे कोळी स्वत:च्या शरीरामधूनच धागा तयार करतो आणि स्वत: जाळं विणतो. तसंच त्याला जाळं कसं तयार करायचं याची माहितीही असते. त्याप्रमाणे ईश्वर स्वत: मायेची निर्मिती करतो आणि त्यापासून सृष्टी निर्माण करतो. त्याला हे सर्व तयार कसं करायचं याचं ज्ञानही आहे. त्यानुसार सूर्य कुठं ठेवायचा, चंद्र कुठं हवा, भूचर, जलचर कशा स्वरूपात हवेत हे सर्व तो ठरवू शकतो. म्हणून त्याला आपण सर्वज्ञ म्हणतो. तसेच हे सर्व तयार करण्यासाठी आवश्यक ते साहित्यही त्याच्याकडे आहे म्हणून त्याला आपण सर्वशक्तिमान असंही म्हणतो.

Advertisement

मग पुढचा प्रश्न असा येतो की, ही सर्व तर्कसंगती खरी कशावरून? आपण विजेवर चालणारे पंखे पाहतो, दिवे पाहतो पण प्रत्यक्षात वीज कुणीच पाहिलेली नाही पण आपण पंखे व दिवे पाहतो तेव्हा हे मान्य करतो की, यामागे जरूर वीज असली पाहिजे. उंचावर फेकलेली वस्तू आपोआप खाली येते. का? तर गुरुत्वाकर्षण! पण हे गुरुत्वाकर्षण प्रत्यक्षात कुणी पाहिलंय का? तर नाही. तरीही आपण ते मान्य करतो. जगात अशा अनेक गोष्टी आहेत आणि त्या सर्व आपण पटवून घेतो. मग जग तयार करणाऱ्या शक्तीच्या स्वरूपात सर्वज्ञ व सर्वशक्तिमान ईश्वर आहे हे मान्य करायला काय हरकत आहे. एकदा ईश्वर आहे हे मान्य केलं की, आपोआप ईश्वर निर्मित मायेचं अस्तिव मान्य करावंच लागतं आणि या मायेचा परिणाम किंवा प्रभाव म्हणून आपल्याला हे विश्व आहे असं भासतं पण प्रत्यक्षात काही निर्माणच झालेलं नाही. जो दिखाई देता है, वो है नाही! उदाहरण द्यायचं झालं तर सूर्योदय व सूर्यास्ताचं देता येईल. सूर्योदय व सूर्यास्त आपण रोज पाहतो व ते खरेही मानतो पण प्रत्यक्षात पृथ्वी फिरत असल्याने असं घडत असल्याचा आपल्याला भास होतो. खरं बघितलं तर सूर्योदयही होत नाही आणि सूर्यास्तही होत नाही. दुसरं उदाहरण क्षितिज रेषेचं देता येईल. आकाश आणि जमीन जिथं एकमेकांना भेटलेत असं वाटतं त्याला आपण क्षितिज रेषा म्हणतो पण प्रत्यक्षात असं काहीच नसतं म्हणून म्हणतात जो दिखता है, वो है नाही.

असं जरी असलं तरी मनुष्य स्वत:च आत्मस्वरूप विसरून त्याच्या देहाला सत्य मानत असतो. देहाला सत्य मानत असल्याने त्याच्या डोळ्यासमोर चालणारे व्यवहार त्याला खरे वाटत असतात. ते त्याच्या मर्जीनुसार चालत असतील तर त्याला सुख होते जर तसे घडत नसतील तर तो दु:खी होतो. आलेल्या अपयशाबद्दल त्याच्या दैवाला दोष देत असतो. वास्तविक त्याच्या जीवनात येणाऱ्या व्यक्ती, घटना आणि परिस्थिती या सर्व गोष्टी त्याच्या पूर्वजन्मातील कर्मानुसार ठरत असतात. श्रीगणेशगीतेच्या अभ्यासातून त्याचे हे सर्व भ्रम दूर होतात.

Advertisement
Tags :

.