Kajava : 2 हजार प्रजाती अन् फक्त 15 दिवसांचं आयुष्य, काजव्यांचा जीवनक्रम कसा असतो?
चांदोलीमध्ये येणाऱ्या पर्यटकांना वनविभागाच्या नियमात राहून काजवे पाहता येतात
By : प्रितम निकम
शिराळा : चांदोली धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात रात्रीच्या वेळी काजव्यांची रोषणाई दिसून येत आहे. चांदोली अभयारण्य परिसरात काजवे अभ्यास, निसर्ग अभ्यासक प्रणव महाजन हे सध्या या परिस्थितीवर अभ्यास करत आहेत. तर चांदोलीमध्ये येणाऱ्या पर्यटकांना वनविभागाच्या नियमात राहून काजवे पाहता येत आहेत.
काजवे भुंग्यांच्या कुळात मोडतात, जगभरात काजव्याच्या २००० विविध प्रजाती आहेत. त्यातील भारतात जेमतेम ९ ते १० प्रजाती आढळतात. काजव्यांचा जीवनक्रम पूर्ण व्हायला एक वर्ष जातं. पावसाळ्यात एक मादी तब्बल १०० अंडी देते. ही अंडी ती एखाद्या झाडाच्या खोडामध्ये किंवा पाणथळ जागांच्या शेजारी, किंवा उंच गवताळ ठिकाणी पालापाचोळा मध्ये दिली जातात.
काजव्याची अंडी व अळी दोन्ही अंधारात चमकतात. साधारण दोन आठवड्यात अंड्यातून काजव्याची अळी बाहेर येते आणि मग सुरू होतो जगण्यासाठीचा तिचा संघर्ष. ह्या काळात ती छोटेमोठे किडे, शेतीस नुकसानदायक असलेले कीटक व अळ्या तसेच शेतात पिकावर ताव मारणाऱ्या गोगलगाई, इत्यादी खाऊन फस्त करतात आणि त्या विकासाच्या पुढल्या टप्प्यात जातात.
प्रत्येकवेळी जेव्हा त्यांचा आकार वाढतो तेव्हा त्या कात टाकतात. एकूण पाच वेळा कात टाकल्यानंतर आळ्या विकासाच्या पुढच्या टप्प्यात येतात, जिथे त्या फुलपाखराप्रमाणे कोश रुप धारण करतात. तो वेळ असतो मे ते जून महिन्याच्या. आणि पावसाच्या एक दोन जोरदार सरी येऊन गेल्या नंतर ह्या कोषातून लुकलुकणारे काजवे बाहेर येतात.
आता त्यांचे दुसरे आयुष्य सुरू होते, जिथे ते हवेत उडणारे लहान मोठे कीटक खातात. लहान मोठ्या किटकांव्यातिरिक्त ते स्वजाती भक्षण देखील करत असल्याचे समोर आले आहे. प्रत्येक जातीचा काजवा एका विशिष्ट पद्धतीने लुकलुकत असतो. काही काजवे अगदी कमी वेळात जलद गतीने लुकलुक करतात, तर काही मंद गतीने लुकलुकत असतात.
त्यांच्या लुकलुकणाऱ्याची वारंवारता त्यांना त्यांच्या जनुकीय संरचनेच्या आधारे मिळते. ज्यामुळे हे काजवे आपल्या जातीच्या नर व मादीना ओळखतात आणि आकर्षित करतात. काही जातीच्या मादा इतर जातींच्या लुकलुक करण्याच्या पद्धतीची नक्कल करून दुसऱ्या जातीच्या नराला आकर्षित करतात व त्याला भक्ष देखील बनवतात. असे हे काजवे कोषातून बाहेर आले की त्यांच्या जवळ खूपच कमी वेळ असतो.
कारण कोषातून बाहेर आल्यावर त्यांचे आयुष्य केवळ दहा ते पंधरा दिवसांचे असते. एवढ्या कमी वेळात त्यांना मादी सोबत मिलन करून त्यांची पुढली पिढी निर्माण करण्यासाठी स्पर्धा सुरू असते. म्हणून बहुदा बरेच नर काही न खाता केवळ मिलन करणे हाच एक क्रम सुरू ठेवतात आणि लवकरच मरून जातात.
पुढे मादी देखील अंडी दिल्यानंतर अवघ्या काही दिवसात मरून जाते. आणि आता अंड्यातून अळीपासून कोश आणि कोषापासून काजवा तयार व्हायला तब्बल एक वर्षाचा काळ लागतो. आपल्या आयुष्याचा खूप मोठा काळ अशा रीतीने काजवे जमिनीवर काढत असतात.