काय? अन्नोत्पादन अर्ध्यावर येणार ?
सारी सजीव सृष्टी अन्नावर टिकून आहे. मानवाची अन्नाची भूक तर अनिर्बंध आहे. मानवाला जितके आणि जितक्या प्रकारचे अन्न लागते, त्याची तुलना अन्य कोणत्याही सजीवाच्या अन्न आवश्यकतेशी होऊ शकत नाही. अन्न हे प्रामुख्याने धान्यांपासून निर्माण होते आणि धान्यांचे उत्पादन हे नैसर्गिक जलचक्रावर अवलंबून आहे. याच जलचक्राच्या संदर्भात संशोधकांनी प्रत्येकाचा थरकाप उडेल असे वक्तव्य केले आहे. जलचक्र विस्कळीत झाल्याने जगातील अन्नधान्यांचे उत्पादन आगामी काही वर्षांमध्येच सध्याच्या निम्मे होणार आहे. याचाच अर्थ असा की जगातील किमान निम्म्या लोकांवर उपासमारीची वेळ येणार आहे.
मानवाच्या इतिहासात प्रथमच गेल्या काही वर्षांमध्ये जलचक्र विस्कळीत झाले आहे. ही माहिती जल अर्थशास्त्रावरील वैश्विक आयोगाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात देण्यात आली आहे. जलचक्र ही अशी एक नैसर्गिक व्यवस्था आहे, की जेणेकरुन समुद्राच्या खाऱ्या पाण्याची सूर्याच्या उष्णतेने वाफ होते. त्या वाफेचे ढग होतात आणि ते वाऱ्यावर स्वार होऊन भूमीकडे येतात. त्यामुळे भूमीवर सर्वदूर पाऊस पडतो. हा पाऊस धान्ये आणि अन्य कोणत्याही वनस्पतींचे अस्तित्व आणि वाढ यासाठी अनिवार्य असतो. तथापि, मानवाच्या बुभुक्षितपणासमोर आता निसर्गानेही हात टेकलेले दिसतात. त्यामुळे जलचक्रावर विपरीत परिणाम होत आहे.
विश्व जलआयोग या संस्थेत विविध देशांच्या प्रमुख नेत्यांचा आणि जलतज्ञांचा सहभाग आहे. ही संस्था जलचक्राच्या स्थितीवर वेळोवेळी लक्ष ठेवत असते. जलचक्रा विस्कळीत झाल्यामुळे दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आदी संकटांशी जीवसृष्टीला दोन हात करावे लागत आहेत. मानवाने निसर्गाचे अतिशोषण केल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. जलचक्र असमतोल झाल्याने येत्या 25 वर्षांमध्ये अन्नधान्यांचे उत्पादन सध्याच्या 25 टक्के इतक्या प्रमाणात घटेल आणि जगावर उपासमारीची वेळ येईल. जास्त लोकसंख्या आणि मर्यादित उत्पन्न असणाऱ्या देशांवर, अर्थात गरीब देशांवर या स्थितीचा सर्वात घातक परिणाम संभवतो, असा गंभीर इशारा संशोधकांनी दिला आहे. ही स्थिती येऊ द्यायची नसेल, किमानपक्षी लांबवायची असेल तर प्रत्येकाने पर्यावरणाच्या संरक्षणसाठी आपल्याला शक्य होईल तितके योगदान देण्याची आवश्यकताही प्रतिपादित करण्यात आली आहे.