पाचशे वर्षांनंतर भगवान रामाची दिवाळी
पंचवीस लक्ष दिव्यांसह अयोध्येत भव्य ‘दीपोत्सव’ होणार, लक्षावधी नागरिकांचा सहभाग निश्चित
वृत्तसंस्था / अयोध्या
पाचशेहून अधिक वर्षांच्या ‘बंदिवासा’तून मुक्त झालेल्या भगवान रामचंद्रांची दीपावली अयोध्येत, नेत्रांचे पारणे फिटेल अशा भव्य प्रमाणात साजरी करण्यात येणार आहे. येथील भव्य मंदिरात भगवान रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतरची ही पहिली दीपावली असल्याने देशभरातील रामभक्तांसह सर्वसामान्यांना या कार्यक्रमाची विशेष उत्सुकता लागून राहिली आहे. या ऐतिहासिक महत्वाच्या समारंभासाठी अयोध्यानगरी नखशिखांत सजली आहे. हा दीपोत्सव रविवारपर्यंत चालणार असून त्याचा शुभारंभ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी करण्यात आला. या उत्सवात अयोध्येतील नागरिकांसह भारतातून आलेले रामभक्त लक्षावधींच्या संख्येने सहभागी होणार आहेत.
बुधवारी अयोध्येत 25 लाखांहून अधिक संख्येने दीप प्रज्वलीत करुन दीपोत्सव साजरा करण्यात आला. हा एक विश्वविक्रम असून त्याची नोंद घेण्यासाठी ‘गिनीज विक्रम पुस्तिके’चे अधिकारी मंगळवारपासूनच अयोध्येत वास्तव्यास आले आहेत. त्यामुळे अयोध्येतील या दीपोत्सवाची नोंद या विक्रमपुस्तिकेत केली जाणार आहे. हा विक्रम करण्यासाठी 28 लक्ष दिव्यांची खरेदी स्थानिक कारागिरांकडून करण्यात आली होती. काही दिवे उपयोग करण्यायोग्य नसले तरी संख्या 25 लक्षांपेक्षा कमी होऊ नये, अशी दक्षता बाळगण्यात आली होती, अशी माहिती देण्यात आली.
विविध आकृतीबंध
दीपांचे विविध आकृतीबंध दर्शकांसाठी मनोवेधक ठरले होते. 10 व्या क्रमांकाच्या घाटावर ‘स्वस्तिक’ आकृतीबंधात 80 हजार दिव्यांची मांडणी करण्यात आली होती. प्रत्येक घाटावर भिन्न भिन्न आकृतीबंधांमध्ये दिव्यांची मांडणी करण्यात आली होती. हे दिवे पाहण्यासाठी रामभक्तांची रीघ लागली होती.
योगी आदित्यनाथ यांचा संदेश
अयोध्येतील या ऐतिहासिक दीपावली सोहळा कार्यक्रमाचे उद्घाटन केल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लोकांना संदेश दिला आहे. अयोध्येप्रमाणेच काशी आणि आणि मथुरा या हिंदूंच्या धार्मिक स्थळांचा विकास केला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. रामभक्तांच्या असीम त्यागानंतर भगवान रामलल्ला 500 हून अधिक वर्षांच्या बंदिवासातून मुक्त झाले आहेत. या सर्व रामभक्तांचे स्मरण आज आम्ही करत आहोत. प्रत्येक रामभक्ताला अभिमान वाटेल अशी ही दीपावली आहे, अशा भावोत्कट शब्दांमध्ये त्यांनी सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. अयोध्येतील या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी देशभरातून असंख्य रामभक्तांचे आगमन या नगरीत झालेले आहे.
लक्षावधी दिव्यांचा झगमगाट
प्राणप्रतिष्ठेनंतरची ही भगवान रामलल्लांची पहिली दीपावली असल्याने ती अतिभव्य आणि शानदार पद्धतीने साजरी करण्याची योजना सज्ज करण्यात आली आहे. याच समारंभाचा एक भाग म्हणून बुधवारी रात्री अयोध्येत 30 लाखांहून अधिक दीप प्रज्वलीत करण्यात आले. त्यामुळे सारी नगरी दिव्यांच्या प्रकाशात झळाळून गेली होती. दीपावलीचा उत्सव गुरुवारपासून साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त संपूर्ण अयोध्येत अभूतपूर्व अशी रोषणाई करण्यात आली आहे.
भगवान रामलल्लांच्या पूजनाने प्रारंभ
गुरुवारी पहाटे भगवान रामलल्लांची पूजा करून दीपावलीच्या उत्सवाचा प्रारंभ केला जाणार आहे. गुरुवारी रामलीला कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात नामवंत कलाकार भाग घेणार आहेत. प्रभू रामचंद्रांशी संबंधित असणाऱ्या सहा विविध देशांमधूनही कलाकार आमंत्रित करण्यात आले असून ते आपली कला सादर करणार आहेत. दीपावलीच्या पाच दिवसांमध्ये विविध कार्यक्रम सादर केले जाणार असून त्यांसंबंधी मोठी उत्सुकता आहे.
कडेकोट सुरक्षा व्यवस्था
संपूर्ण अयोध्यानगरी आणि परिसरात कडोकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात ठेवण्यात आली आहे. राम की पौडीपासूनचे 17 मार्ग काहीकाळ जनतेसाठी बंद करण्यात आले आहेत. केवळ अनुमती पत्र असणाऱ्यांनाच या मार्गावरुन जाणे शक्य होणार आहे. पोलिसांप्रमाणेच अर्धसैनिक दलांच्या तुकड्याही सज्ज आहेत.
सात क्षेत्रांमध्ये विभागणी
राम मंदिर परिसरात प्रज्वलीत केलेल्या दीपांची सात क्षेत्रांमध्ये विभागणी करण्यात आली होती. प्रत्येक क्षेत्रात 100-100 च्या रांगांमध्ये दिव्यांची मांडणी करण्यात आली होती. राम मंदिर परिसरात एकंदर 51 हजार दीप प्रज्वलीत करण्यात आले आहेत. दीप तीन तास सतत प्रज्वलीत राहतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या पशुपालन विभागाने 1 लक्ष 50 सहस्र दीपांचे प्रज्वलन करुन या कार्यक्रमात विशेष सहभाग घेतला होता.
पुष्पांची चित्ताकर्षक आरास
संपूर्ण राममंदिरात विविध प्रकारच्या पुष्पांची चित्तवेधक आणि नयनमनोहर अशा प्रकारची आरास करण्यात आली आहे. भगवान रामलल्लांचे स्थान असणाऱ्या गर्भगृहाची तर अतिशय सौंदर्यपूर्ण पद्धतीने आरास करण्यात आली आहे. राममंदिराच्या सर्व भिंती आणि विविध पुष्परचनांनी सजविण्यात आल्या आहेत.
अयोध्येत दीपावलीचा जल्लोष
ड प्राणप्रतिष्ठेनंतरच्या प्रथम दीपावलीकरीता अयोध्येत संचारला अमाप उत्साह
ड विक्रमी संख्येने दीपांचे प्रज्वलन, विक्रम पुस्तिकेत नोंद, चित्ताकर्षक मांडणी
ड संपूर्ण भारतातून असंख्य रामभक्त दीपोत्सव सोहळ्यासाठी अयोध्येत दाखल