‘राशि’ याचा नेमका अर्थ काय ?
बँकेत जेव्हा आपण आपल्या किंवा इतर कोणाच्या खात्यावर पैसे जमा करावयास जातो, तेव्हा आपल्याला एक फॉर्म भरुन द्यावा लागतो, अशी पद्धत आहे. या फॉर्मवर आपण जमा करणार असलेली रक्कम, आकड्यांमध्ये आणि अक्षरांमध्ये लिहावी लागते. तसेच ज्या खात्यात ती जमा करायची आहे, त्या खात्याचा क्रमांक लिहावा लागतो. तसेच इतर माहिती भरुन खाली स्वाक्षरी करावी लागते. ही नेहमीची पद्धत आहे. जे लोक फारसे शिकलेले नसतात, किंवा फॉर्म ज्या इंग्रजी आणि हिंदी भाषेत असतो, त्या भाषा ज्यांना फारशा चांगल्या येत नसतात, त्यांना असे फॉर्म भरुन देण्यात अडचणी येतात. त्यांना साहाय्य करण्यासाठी बँक कर्मचाऱ्यांना पुढे यावे लागते, असे आपण पाहिलेले असते.
या फॉर्मला ‘पे स्लिप’ असे म्हणतात. संगीता नामक एका महिलेने स्टेट बँकेची पे स्लिप भरली. या स्लिपमध्ये ‘राशि’ असा शब्द असतो. त्याचा अर्थ आपण किती रक्कम जमा करणार आहोत, ती रक्कम नोंद करावी लागते. राशि याचा अर्थ रक्कम असा अभिप्रेत आहे. तथापि या महिलेने राशि या शब्दापुढे ‘तुला’ असे लिहिले. तिची समजूत राशि म्हणजे ज्याला आपण रास म्हणतो तशी मेष, वृषभ आदी राशी अशी झाली असावी. त्यामुळे तिने रक्कम लिहिण्याऐवजी स्वत:ची रास नोंद केली. रकमेच्या कॉलममध्ये तिने 2,000 रुपये हे आकड्यात लिहिले आहे. तथापि, शब्दांमध्ये रक्कम लिहिण्याच्या जागी आपली स्वत:ची जन्मरास लिहिली.
सध्या यासंबंधीचे वृत्त व्हिडीओच्या माध्यमातून बरेच प्रसिद्ध झाले आहे. असंख्य लोकांनी ते पाहून आपल्या तऱ्हेतऱ्हेच्या टिप्पणी केल्या आहेत. आता हा सर्व प्रकार खरोखरच घडला आहे, की कुणी मुद्दाम एक सनसनाटी पसरविण्यासाठी केलेला आहे, हे कळत नाही. पण तो चर्चेचा विषय झाला आहे, हे निश्चित.