For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उत्तरप्रदेशच्या हाथरसमध्ये चेंगराचेंगरी, 122 ठार

06:58 AM Jul 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
उत्तरप्रदेशच्या हाथरसमध्ये चेंगराचेंगरी  122 ठार
Advertisement

मृतांची संख्या वाढण्याची शक्यता : अनेक जण गंभीर जखमी : मृतांमध्ये महिलांचे प्रमाण अधिक 

Advertisement

वृत्तसंस्था/ हाथरस

उत्तरप्रदेशच्या हाथरस येथील फुलरई गावात एका सत्संगानंतर मोठी दुर्घटना घडली आहे. सत्संग संपल्यावर बाहेर पडणाऱ्या जमावाला संबंधित ‘बाबा’च्या वाहन ताफ्याला वाट करून देण्यासाठी रोखण्यात आल्यावर तेथे चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीत 122 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.  रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या जखमींची संख्या सातत्याने वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील दबाव वाढला आहे. यामुळे आसपासच्या जिल्ह्यांमधून डॉक्टर्स बोलाविण्यात आले आहेत. औषधांचा साठाही मागविण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेतच या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. तर चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर साकार हरि बाबा फरार झाल्याची माहिती समोर आली आहे.

Advertisement

या दुर्घटनेनंतर हाती घेण्यात आलेल्या मदत अन् बचावकार्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नजर ठेवून आहेत. मुख्यमंत्री योगींनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख तर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. राज्याचे दोन मंत्री आणि मुख्य सचिव तसेच पोलीस महासंचालकांना मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी पाठविले आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली पथक स्थापन करत दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी जखमींना तत्काळ रुग्णालयात पोहोचवून योग्य ते उपचार करण्याचे निर्देश प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

हाथरस जिल्ह्यातील सिकंदराराऊ क्षेत्रात आयोजित सत्संगात मंगळवारी चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. मानव मंगल मिलन सद्भावना समागम’चे आयोजन फुलरई मुगलगढी या गावात करण्यात आले होते. नारायण साकार विश्व हरि भोले बाबा यांच्या सत्संगाकरता हजारोंच्या संख्येत लोकांनी गर्दी केली होती.

योगी आदित्यनाथांचा दौरा

चेंगराचेंगरी झालेल्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे बुधवारी हाथरस येथे जाणार आहेत. या दौऱ्यात योगी आदित्यनाथ हे पीडित परिवारांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत मुख्य सचिव संजय प्रसाद देखील उपस्थित असतील. तर मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक मंगळवारीच हाथरस येथे पोहोचले आहेत.

जिल्हा प्रशासनाकडून हेल्पलाइन क्रमांक

हाथरसच्या जिल्हा प्रशासनाने घटनेचे गांभीर्य ओळखत सर्वसामान्य लोकांच्या मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक 05722227041 जारी केला आहे. हाथरसचे खासदार अनूप प्रधान यांना संसदेत असताना चेंगराचेंगरीच्या घटनेची माहिती कळली. प्रधान यांनी तातडीने मतदारसंघात जाण्याचा निर्णय घेत जिल्हाधिकारी आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षकांकडून दुर्घटनेविषयी माहिती जाणून घेतली.

प्रशासन जबाबदार : आयोजक

जिल्हा प्रशासनाकडून अनुमती घेत सत्संग कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात 1 लाखाहून अधिक भाविक सामील झाले होते. कार्यक्रम संपल्यावर चेंगराचेंगरीचा प्रकार घडला आहे. ही दुर्घटना प्रशासनाच्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे झाली आहे. कार्यक्रम संपल्यावर चिखलात लोक एकमेकांवर कोसळत राहिले, त्यांना सावरणारा तेथे कुणीच नव्हता असा दावा आयोजन समितीशी संबंधित महेश चंद्र यांनी केला आहे. हाथरसमध्ये हा कार्यक्रम 13 वर्षांनी आयोजित झाला होता. या कार्यक्रमासाठी 3 तासांची अनुमती होती. प्रशासनाला लाखोंच्या संख्येत भाविक सामील होणार असल्याची माहिती देण्यात आली होती. कार्यक्रमासाठी 12 हजारांहून अधिक स्वयंसेवक होते. आम्ही आमच्या पातळीवर पूर्ण व्यवस्था केली होती. कार्यक्रम संपल्यावर लोक एकाचवेळी बाहेर पडण्यासाठी पळू लागल्याने चेंगराचेंगरी झाल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात आला. तर प्रशासनाने आयोजकांकडून झालेले आरोप फेटाळले आहेत.

मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम

हाथरस येथील दुर्घटनेनंतर एटा रुग्णालयात अनेक मृतदेह आणले गेले आहेत. यात महिला आणि मुलांचा देखील समावेश आहे. या सर्व मृतदेहांची ओळख पटविली जात आहे. या दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि अलीगढ आयुक्तांचे एक पथक स्थापन करण्यात आल्याची माहिती एटाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजेश कुमार सिंह यांनी दिली आहे.

पंतप्रधान मोदींची योगींशी चर्चा

हाथरस दुर्घटनेप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा करत केंद्र सरकारकडून सर्वप्रकारची मदत करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. केंद्र सरकारने गाजियाबाद येथून एनडीआरएफ पथकाला दुर्घटनास्थळी रवाना करत मदतकार्याला वेग देण्याचा प्रयत्न केला आहे.

हरियाणा-राजस्थानातील लोक सत्संगात सामील

सत्संगात सामील होण्यासाठी अलीगढ, एटा, आगरा, मैनपुरी, इटावा, फिरोजाबाद, कासगंजसमवेत दिल्ली, राजस्थान, हरियाणा आणि मध्यप्रदेशातूनही मोठ्या संख्येत लोक पोहोचले हेत. सत्संग समाप्त झाल्यावर भाविकांची गर्दी मंडपातून बाहेर पडण्यास सुरुवात झाली आणि त्यानंतर चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. मंडपात अधिक उष्णता जाणवत असल्याने लोकांमध्ये तेथून बाहेर पडण्यासाठी चढाओढ निर्माण झाली होती. याचदरम्यान भोले बाबाचा ताफा बाहेर पडणार असल्याने भाविकांना रोखण्यात आले होते. याचमुळे भाविकांमध्ये चेंगराचेंगरी घडली, यामुळे भाविक जमिनीवर कोसळत गेले आणि लोक त्यांना चिरडून पळू लागल्याने पूर्ण परिसरात लोकांचा आक्रोश निर्माण झाला.

कमी पडले स्ट्रेचर

दुर्घटनेत मोठ्या संख्येत जखमी शासकीय रुग्णालयात पोहोचल्याने तेथे स्ट्रेचर कमी पडले. यामुळे रुग्णालयाबाहेर जमिनीवर लोक तडफडत असल्याचे दिसून आले. अशास्थितीत हाथरस प्रशासनाने खासगी रुग्णालयांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

उपराष्ट्रपतींनी व्यक्त केले दु:ख

हाथरसच्या दुर्घटनेत लोकांचा मृत्यू झाल्याचे कळल्यावर मोठे दु:ख झाले. शोकाकुल परिवारांबद्दल मी तीव्र संवेदना व्यक्त करतो आणि जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करत असल्याचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटले आहे.

मायावतींनी व्यक्त केले दु:ख

बसप अध्यक्ष मायावती यांनी हाथरस येथील चेंगराचेंगरीच्या घटनेप्रकरणी दु:ख व्यक्त केले. तसेच सरकारने या घटनेची चौकशी करत योग्य कारवाई आणि पीडित परिवारांना आर्थिक मदत करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

अखिलेश यादवांकडून सरकार लक्ष्य

सत्संगाच्या आयोजनात अधिक संख्येत लोक सामील झाले असल्यास त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेणे सरकारचे काम आहे. प्रशासनाने लोकांना तेथे मार्गदर्शन करणे अपेक्षित होते. सरकार अखेर काय करत होते? सरकारला माहित असूनही अशाप्रकारची मोठी दुर्घटना घडणे अत्यंत दु:खद आहे. लोकांच्या सुरक्षेसाठी सरकारने काय केले हा सर्वात मोठा प्रश्न आहे. जोपर्यंत तुम्ही कुठल्याही आयोजनाच्या सुरुवातीपासून समाप्तीपर्यंत लक्ष देणार नाही तोपर्यंत अशा दुर्घटना घडणार. याकरता जर कुणी जबाबदार असेल तर ते सरकार आहे असे म्हणत अखिलेश यादव यांनी भाजप सरकारला लक्ष्य केले आहे.

चेंगराचेंगरीतील जीवितहानी हृदयविदारक

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना चेंगराचेंगरीत लोकांच्या झालेल्या मृत्यूला हृदयविदारक संबोधिले आहे. तसेच जखमी लवकर बरे व्हावेत म्हणून प्रार्थना केली आहे. या दुर्घटनेत स्वकीयांना गमाविलेल्या लोकांबद्दल मी संवेदना व्यक्त करत असे राष्ट्रपती मुर्मू यांनी म्हटले आहे.

राहुल गांधींनी व्यक्त केले दु:ख

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हाथरस येथील चेंगराचेंगरी प्रकरणी शोक व्यक्त केला आहे. उत्तरप्रदेशच्या हाथरसमध्ये सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमुळे अनेक भाविकांचा मृत्यू होणे दु:खदायक आहे. सर्व शोकाकुल परिवारांबद्दल संवेदना व्यक्त करत मी जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो. सरकार आणि प्रशासनाने जखमींना आवश्यक उपचार आणि पीडित परिवारांना मदत उपलब्ध करावी. तर इंडिया आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी बचावकार्यात सहकार्य करावे असे आवाहन करत असल्याचे राहुल गांधींनी म्हटले आहे.

मृतदेहांचा ढीग पाहून पोलिसाचा मृत्यू

उत्तरप्रदेशच्या एटा वैद्यकीय रुग्णालयात मृतदेहांचा ढीग पाहून तेथे तैनात पोलिसाला हृदयविकाराचा धक्का बसला आणि यातच त्याचा मृत्यू झाला. या पोलिसाला रुग्णालयात तातडीच्या सेवेकरता बोलाविण्यात आले होते. परंतु मृतदेहांचा ढीग पाहून तो हा धक्का सहन करू शकला नाही.

साकार हरि बाबा कोण?

उत्तरप्रदेशच्या हाथरस जिल्ह्यातील फुलरई गावात साकार हरि बाबा यांच्या सत्संगानंतरच चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या मोठ्या दुर्घटनेनंतर कथावाचक साकार हरि बाबा उर्फ भोले बाबा कोण असा प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे. साकार हरि बाबा उर्फ भोले बाबा यांचे मूळ नाव सूरज पाल सिंह आहे. ते मूळचे कासगंज येथील पटयाली गावचे रहिवासी आहेत. सुमारे 17 वर्षांपूर्वी पोलीस कॉन्स्टेबलची नोकरी सोडत त्यांनी सत्संग सुरू केला होता. नोकरी सोडल्यावर सूरज पाल यांनी नाव बदून साकार हरि नाव धारण केले हेत. अनुयायी त्यांना भोले बाबा या नावाने संबोधितात. गरीब आणि वंचित वर्गातील लोकांमध्ये त्यांची प्रचंड लोकप्रियता आहे. काही काळातच लाखोंच्या संख्येत त्यांचे अनुयायी झाले आहेत. उत्तरप्रदेशसोबत मध्यप्रदेश आणि राजस्थानातही त्यांचे मोठ्या संख्येत अनुयायी आहेत.

मानव सेवेचा संदेश

साकार हरि बाबा स्वत:च्या सत्संगात मानव सेवेचा संदेश देतात. मानवाची सेवा हीच सर्वात मोठी सेवा असल्याचे त्यांचे सांगणे आहे. सत्संगात येणाऱ्या लोकांचे रोग दूर होतात, मन शुद्ध होते, तेथे कुठलाच भेदभाव होत नाही, कुठलेच दान नसते, येथे सर्व समभाव आहे कारण हाच ब्रह्मलोक अन् स्वर्गलोक असल्याचे सांगितले जाते.

सूट-बूटमध्ये राहतात बाबा

साकार हरि बाबा एकेकाळी उत्तरप्रदेश पोलीस विभागात कार्यरत होते.  याचमुळे गणवेशधारक स्वयंसेवकांची मोठी फौज त्यांच्यामागे ओह. बाबा सर्वसामान्य साधूसंतांप्रमाणे भगवे वस्त्र परिधान करत नाहीत. महागडा गॉगल, पांढरा पँट-शर्ट ते परिधान करत असतात.   साकार हरि बाबा यांच्या सत्संगात मोठ्या संख्येत लोक जमत असतात. परंतु त्यांचे शिष्य प्रसारमाध्यमांपासून दूर राहणे पसंत करतात. भोले बाबाचा आश्रम कासगंज जिल्ह्यातील बहादूरनगर गावात आहे. भोले बाबाने खासगी सैन्याप्रमाणे स्वत:च्या अनुयायांची फौज निर्माण केल्याचे बोलले जाते.

भाविकांच्या सुरक्षेसाठी व्यवस्था का नव्हती?

हाथरसमध्ये भोले बाबाच्या कार्यक्रमाकरता मोठी गर्दी झाली होती, परंतु याची कल्पना बहुधा पोलीस आणि प्रशासनाला नव्हती. आयोजनात येणाऱ्या भाविकांच्या संख्येचा योग्य अनुमान पोलिसांना लावता आला नाही. यामुळे केवळ 72 पोलीस तेथे तैनात करण्यात आले होते. तर आयोजनस्थळी दूरदूरवरुन लोक बसेसमधून पोहोचले होते. सत्संग समाप्त झाल्यावर लोक कुठल्या दिशेतून बाहेर पडतील याची माहितीच कुणाला नव्हती. आयोजकांकडून स्वयंसेवक व्यवस्थेसाठी नियुक्त केले जाणे अपेक्षित असते, परंतु तेथे स्वयंसेवक फारच कमी प्रमाणात होते असे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले.

Advertisement
Tags :

.