10 वर्षात एनडीए सरकारने काय केले?
कलबुर्गीतील काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारसभेत प्रियांका गांधींचा मोदींना प्रश्न
प्रतिनिधी/ बेंगळूर
काँग्रेसने मागील 70 वर्षांत काय केले हे विचारण्यापेक्षा तुमच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात एनडीए सरकारने काय केले, याचे उत्तर पंतप्रधान मोदींनी द्यावे, अशी मागणी काँग्रेसच्या राष्ट्रीय मुख्य सचिव प्रियांका गांधी यांनी केली. मोदींनी श्रीमंत मित्रांना उद्योगधंद्यांसाठी सुविधा, बंदरे, विमानतळे दिली. जीएसटी नावाचा ‘काळा कर’ लादून लहान व्यापाऱ्यांना रस्त्यावर आणले. तुमच्या काळात सर्वसामान्यांच्या घरी नळांना पिण्याचे पाणी आले नाही, रोजगारही निर्माण झाले नाहीत, अशी टिकाही त्यांनी केली.
कलबुर्गी जिल्ह्याच्या सेडम येथील तालुका क्रीडांगणावर सोमवारी काँग्रेसचे उमेदवार राधाकृष्ण दोडमनी यांच्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या. काँग्रेस पक्षाने आयआयटी, आयआयएम, डीआरडीओसारख्या महत्त्वाच्या संस्था सुरू केल्या. गरिबांसाठी रोजगार हमी योजना सुरु केली. भाजप नेतृत्त्वातील एनडीए सरकारच्या काळात अशा कोणत्या योजना आणल्या गेल्या, असा प्रश्न प्रियांका गांधी यांनी उपस्थित केला. सेडम येथे सिमेंटचे अनेक कारखाने असून देखील स्थानिकांना रोजगार मिळत नाही. येथील युवकांना कामाच्या शोधात हैदराबाद, मुंबई येथे स्थलांतर करावे लागते. बेरोजगारीत वाढ, महागाई आणि हिंदू-मस्लीम यांच्यात वाद निर्माण करून केलेले राजकारण हेच मोदींनी देशाला दहा वर्षात दिलेले योगदान आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली.
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन देणाऱ्या मोदींनी त्याची अंमलबजावणी करण्याऐवजी आपल्या औद्योगिक मित्रपक्षांची कर्जे माफ केली आहेत. देशातील प्रसारमाध्यमांवर अब्जाधीशांचे नियंत्रण आहे. मोदींनी दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकल्याचा प्रसारमाध्यमे निषेध का करत नाहीत? दिल्ली पोलीस तेलंगणात येऊन काँग्रेस अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांना त्रास देत आहेत. याची चौकशी का केली जात नाही, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.
...तर शेतकऱ्यांची कर्जे माफ करू!
केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आल्यास विविध खात्यांमधील 30 लाख रिक्त पदांची भरती केली जाईल. अग्निवीर योजना रद्द करण्यात येईल. शेतकऱ्यांची कर्जे माफ केली जातील. जीएसटी रद्द केली जाईल. शहरी भागासाठीही रोजगार हमी योजना 100 दिवसांसाठी राबविण्यात येणार आहे, अशी आश्वासने प्रियांका गांधी यांनी दिली.