काय ? दगडापासून अपत्यांचा जन्म ?
विशिष्ट झाडाचे अंबे खाल्याने पुत्रप्राप्ती होते, असे प्रतिपादन महाराष्ट्रातील एका महान व्यक्तीने कथित स्वरुपात केल्याचे गाजलेले प्रकरण आपल्या सर्वांना माहीत आहे. वास्तविक त्या व्यक्तीने तसे म्हटले नव्हते. पण त्या व्यक्तीचा व्हिडीओ अर्धवट दाखवून तसे रान उठविण्यात आले होते. पुढे जेव्हा संपूर्ण व्हिडीओ लोकांना पाहता आला, तेव्हा त्या व्यक्तीसंबंधी हेतुपुरस्सर पसरविण्यात आलेला गैरसमजही दूर झाला आणि आता त्या प्रकरणाची चर्चा थांबली आहे.
पण सध्या पोर्तुगाल या देशातील एका पहाडाला अशा प्रकारची प्रसिद्ध मिळत आहे. या पहाडाचे नाव पॅरिडियस असे आहे. या पहाडात सापडणारा खडक पोटाशी धरुन झोपल्यास महिलांना अपत्यप्राप्ती होते, अशी एक समजून बऱ्याच शतकांपासून रुढ आहे. या पहाडाचे वैशिष्ट्या असे की, या पहाडातही नेहमी छोट्या छोट्या दगडांची निर्मिती होत असते. जणू काही हा पहाट छोट्या दगडांना जन्म देत असतो. हेच दगड पोटाशी धरुन झोपल्याने गर्भधारणा होते असे बोलले जाते. या वरुन या दगडाला ‘मदर रॉक’ किंवा ‘प्रेग्नंट स्टोन’ असेही नाव पडले आहे. या पहाडाचे वर किमान 30 कोटी वर्षांचे आहे. त्याच्या शिखरातून नेहमी लहान दगड निर्माण होत असतात आणि ते पायथ्याशी येऊन पडत असतात. याचमुळे या दगडांच्या सान्निध्यात झोपल्यास महिलांना गर्भधारणा होते, अशी समजून रुढ झाली असावी, असे अनेक वास्तुनिष्ठ विचारकांचे मत आहे.
या समजुतीमुळे प्रतिवर्ष असंख्य अपत्येच्छू महिला या पर्वताचे दर्शन घेण्यासाठी जातात आणि येताना खडकाचा लहानसा तुकडा घेऊन येतात. या खडकाच्या कृपेमुळे आपल्याला गर्भधारणा झाली असे सांगणाऱ्या महिलांची संख्याही कमी नाही. तथापि, विज्ञाननिष्ठांचा या समजुतीवर विश्वास नाही. असे असले तरी, या पर्वताची या कारणासाठी झालेली प्रसिद्धी हा जगभरातील चर्चेचा विषय आहे.