For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काय म्हणतोस माझे माझे...

06:19 AM Jul 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
काय म्हणतोस माझे माझे
Advertisement

उंदीर हा प्राणी उपद्रवी आहे. तो जर चुकून घरात शिरला तर घरातल्या वस्तूंचा नाश ठरलेलाच आहे. उंदीर चतुर आहे. शेतात पेरलेल्या बियांवरील औषधी थर बाजूला करून तो बियाणे फस्त करतो. त्याच्यात एक मानवी प्रवृत्ती आहे, ती म्हणजे संग्रह करण्याची. उंदीर वीस ते पंचवीस किलो धान्य स्वत:च्या बिळात साठवून ठेवतो. मुंगीजवळ देखील साठवण करण्याची वृत्ती आढळते. पोट भरल्यावर कणाकणाने मिळेल ते पदार्थ वारुळात आणून मुंग्या साठवून ठेवतात. त्याचा उपयोग त्यांना मुसळधार पावसात होतो. मधमाशांजवळसुद्धा संग्राहक वृत्ती आहे. मधाच्या पोळ्यांमध्ये मध साठवलेला असतो. जंगलामधील मादी अस्वल उन्हाळ्यात आपल्या होणाऱ्या पिल्लांसाठी औषधी फुले, पाने, डिंक, मध घालून कातळावर एक भाकरी करून वाळवून ठेवते. ती पौष्टिक असते. पावसाळ्यात अस्वलीला पिल्ले होतात तेव्हा पावसामुळे त्यांच्यासाठी खायला आणता येत नाही आणि पिल्लांना गुहेतून बाहेर पडता येत नाही, कारण पावसात भिजल्याने पिल्लांना ताप येतो, म्हणून ही बेगमी असते. निसर्गात असणारे असंख्य पशु-पक्षी-प्राणी हे उद्यासाठी संग्रह करीत नाहीत.

Advertisement

श्रीमद् भागवतात श्री हनुमंतरायांच्या पूर्वजन्माची कथा आहे. हनुमंत हे पूर्वजन्मी एक उत्तम साधक होते. त्यांनी शंकराची कठोर तपश्चर्या केली. उपासना केली. परिणामस्वरूप त्यांना साक्षात शिवाने सगुण रूपात दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले, तेव्हा ते म्हणाले, ‘माणसाचे आयुष्य अन्न-वस्त्र-निवारा या गरजा पुरवताना व्यर्थ जाते. त्यात भगवंताची भक्ती, नामस्मरण घडत नाही. मला पुढील जन्म असा दे की जेणेकरून त्यात अन्न, वस्त्र, निवारा यात आयुष्य फुकट जाणार नाही. तुझे स्मरण मात्र अखंडित राहील.’ शिवशंकर तथास्तु म्हणाले. त्याप्रमाणे शिवाच्या अंशापासून अकरावा रूद्र म्हणून त्यांचा वानर योनीत जन्म झाला व ते श्रीरामांचे प्राणसखा ठरले. श्री हनुमंतराय अखंड श्री रामनाम घेतात. ते चिरंजीव आहेत. इतर प्राणी घरटे बांधतात, गुहेत आश्रय घेतात. परंतु वानर मात्र निसर्गात उपलब्ध असणाऱ्या वनस्पतींवर जगतात. ते झाडांवर राहतात. कुठलाही संग्रह करीत नाहीत.

ज्या जगात माणूस जन्म घेतो ते जग अशाश्वत आहे. शाश्वत कल्याणाची माणसाला ओळख झाली तरी ऐहिक सुखाचा त्याग त्याला सहजासहजी करता येत नाही. लौकिक सुखामार्फत अलौकिक सुखाचा मार्ग गाठता येईल असे त्याला वाटते आणि तो त्यासाठी सारखी धडपड करतो. त्यातून संग्रह करण्याची वृत्ती निर्माण होते. संग्रह हा आधार देखील असतो. उद्याची चिंता त्याला भेडसावत असते. म्हणून माणूस आयुष्यात अनेक प्रकारचा पसारा मांडून बसतो. ईश्वराकडे जर त्याचे मन वळले तर त्याला निरर्थकतेची जाणीव होते. त्याचे आंतरिक सामर्थ्य वाढते आणि संग्रह करण्याची वृत्ती आपोआप कमी होते. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘गेले पळाले दिवस । रोज काय म्हणतोस माझे माझे । सळे धरुनी बैसला काळ । फाको नेदी घटिका पळ?’ अरे, तुझे आयुष्य माझे माझे म्हणत फुकट चालले. काळ टपून बसलाय. केसांचा रंग बदलला, कान-डोळे रजेवर गेले तरी तुझे माती खाणे काही संपत नाही. महाराज म्हणतात, ‘तुज ठाऊके मी जाणार । पाया शोधुनि बांधसी घर?’ शरीराचा पाया ढिला झाला तरी पाया खणून घर बांधतोस हे बरे आहे का? ‘तुका म्हणे वेगे । पंढरीराया शरण रिघे?’ तू सत्वर पांडुरंगाला शरण जा म्हणजे तुला आंतरिक शक्ती लाभेल. संत कधीही कोणत्याही वस्तूंचा संग्रह करीत नाहीत. मात्र त्यांचा लोकसंग्रह अफाट असतो. कारण अलौकिक निवांतपणा तिथेच संतांजवळ गवसतो म्हणून लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात.

Advertisement

पूर्वीच्या काळी लोक कंजूषपणा नको पण काटकसर हवीच या विचाराने छोट्या छोट्या गोष्टी जमवून ठेवायचे. किराणा माल भरलेले पुडे, फुलांची पुडी यांना बांधलेला दोरा, दुधाच्या-प्लास्टिकच्या पिशव्या, औषधांच्या जुन्या बाटल्या, पेट्या, कपडे अशा अनेक वस्तूंनी घर भरलेले असे. कारण तेव्हा वस्तू मुबलक मिळत नसत. हवी तेव्हा हवी ती गोष्ट मिळणे दुरापास्त होते. शिवाय पैसा गरजेपुरताच मिळत होता. एक अंगावर, एक दांडीवर एवढ्या कपड्यातच लोक संतुष्ट होते. पैशाचा ओघ जसा वाढला तसे ऐसपैस मोकळे घर खोट्या प्रतिष्ठेच्या लोभापायी दिमाखदार वस्तूंनी भरून गेले. माणसे कमी आणि सामान जास्त. अशी घरसजावट मनात पोकळी निर्माण करू लागली. काळ बदलला तशी मनोवृत्तीही बदलली. युज अँड थ्रो हा जमाना आला. वापरा आणि फेका ही वृत्ती व्यवहारात रुजली, तसा तिचा प्रवेश माणसाच्या रक्तामध्ये भिनला. वस्तूंप्रमाणेच माणसेसुद्धा वापरा आणि काम संपले की दूर करा. साठवणूक रक्ताच्या नात्यांमध्येही उरली नाही. त्यामुळे परमार्थाचा रस्ता बुजला व ती वाट बंद झाली.

श्री दत्त संप्रदायात संग्रहाविषयी दोन उदाहरणे अंतर्मुख करणारी आहेत. श्री दत्तप्रभूंनी सूर्याला चोवीस गुरूंमध्ये प्रधान स्थान दिले. श्री दत्तमहात्म्य या ग्रंथात प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी म्हणतात, ‘चराचर जगात । जे दिसेल उपयुक्त। ते ठेवावे सुरक्षित । आपण आसक्त न होता?’ जे उपयुक्त दिसेल त्याचा माणसाने संग्रह करावा. परंतु त्यात आसक्त होऊ नये. योग्य वेळी योग्य पात्री त्याचे निरपेक्षपणे दान करावे. सूर्यदेव ग्रीष्म ऋतूमध्ये पृथ्वीवरील पाणी आपल्या किरणांनी शोषून घेतात आणि वर्षा ऋतू आला की ते पाणी परत भूमीला देऊन टाकतात. अनासक्त वृत्तीने प्रयास न करता जे काही मिळते त्याच्या संग्रहाने दोष लागत नाही. निरपेक्ष दान ही शिकवण मी सूर्याकडून शिकलो. मध तयार करणाऱ्या मधमाशीलाही दत्तगुरूंनी गुरू केले. ‘रिघोनी नाना संकटस्थानांसी । मधुसंग्रहो करी मधमाशी । तो संग्रहचि करी घातासी । मधू न्यावयासी जे येती?’ मधमाशी मध पोळ्यात लपवून ठेवते. ना स्वत: सेवन करत, ना इतरांना देत. एक दिवस मध गोळा करणारे लोक मधमाशांना जाळून सर्व मध घेऊन जातात. संग्रहामागील वृत्ती दानाची असावी. नाही तर त्याचा नाश होतो. संन्यासी व्रताचे कठोर आचरण असणाऱ्या प. प. टेंब्ये स्वामींनी दऊत आणि लेखणीचा संग्रह केला व अफाट अक्षर वाड्.मयनिर्मिती केली हे भक्तांचे, अभ्यासकांचे अहोभाग्यच!

                                 -स्नेहा शिनखेडे

Advertisement
Tags :

.