Kolhapur News: कोल्हापुरात कृती समिती पाहिजेच, पण?, प्रश्नांशी घट्ट राहण्याची गरज
कोल्हापुरात सुरू असलेली सर्वच आंदोलने नक्कीच विनाकारण नाहीत
By : सुधाकर काशीद
कोल्हापूर : कोल्हापूरचा विकास का होत नाही. यामागे विविध कारणे आहेत. राजकीय इच्छाशक्ती, निधीची उपलब्धता, सरकारी कामातील दिरंगाई व भ्रष्टाचार अशी वेगवेगळी कारणे त्यामागे आहेत. पण कोल्हापूरकरांच्या तोंडात आणखी एक कारण व ते म्हणजे कोल्हापुरातील काही कृती समित्या आहेत.
सरकारने, महापालिकेने काही नवीन जाहीर करायचा अवकाश लगेच एखाद्या कृती समितीने त्याला विरोध सुरू करायचा हे कोल्हापुरात ठरुनच गेले आहे. अर्थात या कृती समितीतील सर्वजणच प्रसिद्धी किंवा एखाद्या कामात खोडा घालायला एकत्र येतात असेही अजिबात नाही. पण असे वातावरण मात्र कोल्हापुरात नक्कीच झाले आहे आणि त्यात काही अंशी तथ्यही आहे आणि असा प्रपोगंडा करायची संधी काही चतुर अधिकाऱ्यांनी नक्कीच घेतली आहे.
या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात सुरू असलेली सर्वच आंदोलने नक्कीच विनाकारण नाहीत. आंदोलनातले सर्वच कार्यकर्ते कोल्हापुरी शब्दात सांगायचं झालं तर आंबे पाडणारे नाहीत. त्यामुळे कोल्हापुरात कृती समिती नक्कीच पाहिजे पण कोणी वर बोट करून आंदोलनाबद्दल शंका घेणार नाही एवढे त्यांचे वर्तन स्वच्छच असले पाहिजे.
कोल्हापूरला आंदोलनाची व जीव गेला तरी चालेल पण तडजोड नाही अशा एका खमक्या चळवळीची परंपरा आहे. अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांनी कोल्हापुरात या चळवळीचा झटका अनुभवलेला आहे. त्यांना कोल्हापूरच्या आंदोलनामुळे कोल्हापूर सोडावे लागले आहे. अॅड. गोविंद पानसरे, प्रा.एन.डी.पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात आले म्हटले तरी भ्रष्ट अधिकारी घाबरून जात होते.
पोलीस ठाण्यात साऱ्या गावावर गुरगुरणारे पोलीस पानसरे यांचे नाव घेतले तरी मऊ व्हायचे. आरटीओ ऑफिसला प्रा.विष्णुपंत इंगवले गेले तर काही काळापुरते तिथले एजंट फरारी व्हायचे. पी.डी. दिघे कामगारांचे प्रश्न मांडू लागले तर भाषण थोडक्यात करा असे म्हणायचे धाडस कलेक्टरांच्या कडेही नसायचे.
याशिवाय त्र्यंबक सिताराम कारखानीस, के.एल.मलाबादे, संतराम पाटील, बापूसाहेब पाटील, रवींद्र सबनीस, शंकर धोंडी पाटील, शंकराव सावंत, केशवराव जगदाळे, जीवनराव सावंत, शेख सनाऊल्ला, के.आर.अकोळकर, दादा चव्हाण, बाबुराव धारवाडे, गोपाळराव माने, बाबुराव जोशी, संभाजीराव चव्हाण, व्ही.आर. पाटील, बाबा सावंत वसंतराव पंदारे, दत्तोबा चव्हाण, उदय नारकर, भारती पवार, सुशीला यादव, सुमन पाटील, बाबा देसाई, दिलीप पवार ही माणसे एखादे निवेदन घेऊन आली की अधिकाऱ्यांची खात्री व्हायची की या प्रकरणात काहीतरी नक्कीच सत्य आहे.
उगीच रोज मोर्चा काढायचा. रोज निवेदन काढायचे असला प्रकार या सर्व पक्षाच्या नेत्यांनी कोल्हापुरात कधी केला नाही. आताही नक्कीच असे अभ्यासू कार्यकर्ते चळवळीत आहेत. कागदोपत्री पुरावे घेऊन आंदोलन करण्याची त्यांची पद्धत आहे. पण चळवळ आंदोलन करणाऱ्या खऱ्या कार्यकर्त्यांना बनावट आंदोलनांचा फटका बसत आहे. रोज निवेदन, रोज निदर्शने, रोज या ना त्या कार्यालयात जाऊन निवेदने असा प्रकार काहींनी सुरू केला आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या चळवळी परंपरेला त्याचा फटका बसला आहे.
आंदोलन सुरू करायचे. हळूच मागे घ्यायचे असा प्रकार चालू झाला आहे. त्यामुळे एखादे आंदोलन अगदी खरे आणि आवश्यकच असले तरी त्याकडे संशयाने बघितले जात आहे. एवढेच नव्हे तर पेपरला रोज फोटो येतो म्हणूनही काहीजण आंदोलनात सहभागी होत आहेत. त्यामुळे काय झाले आहे? चळवळ आणि आंदोलनाची भीतीच मोडली गेली आहे. अधिकारी कोणालाही दाद देत नाहीत अशी परिस्थिती आहे. काही अधिकाऱ्यांनी तर आंदोलनात पद्धतशीरपणे फूट पाडली आहे. काही अधिकारी प्रति आंदोलन उभे करत आहेत.
चांगला विषयही त्यामुळे बाजूला पडला जात आहे आणि नेमका त्याचा फायदा काही चतुर अधिकारी नक्कीच घेत आहेत. कृती समिती म्हणजे तडजोड असे वातावरण त्यांनी व्यवस्थित पसरवले आहे .आणि त्यात काही अंशी तथ्यही आहे. त्यामुळे कोल्हापुरातल्या उठ सुठ आंदोलनाची संख्या पहिल्यांदा कमी झाली पाहिजे. ज्या विषयावर आंदोलन त्याचा सखोल अभ्यास आंदोलनकर्त्यांनी केला पाहिजे.
आंदोलनासाठी एकटा माणूसही चालू शकतो त्यामुळे फक्त फोटोसाठी येणाऱ्यांना आंदोलनात स्थान दिले गेले नसले पाहिजे. आंदोलन कोणाच्यातरी दावणीला बांधले गेले नसले पाहिजे. आणि ब्लॅकमेलिंगसाठी आंदोलन हा प्रकार तर कोल्हापूरसारख्या चळवळीची परंपरा असलेल्या गावात कधीच नसला पाहिजे.म्हणूनच कृती समिती पाहिजेच. पण आंदोलनाची ताकद वाढवणारीच पाहिजे.
त्या कार्यकर्त्यांनी दु:खही कधी व्यक्त केले नाही
कोल्हापुरात आताचा भाजप म्हणजे त्यावेळचा जनसंघ अगदी मर्यादित होता. जास्तीत जास्त अगदी आठ दहा कार्यकर्ते रस्त्यावर उतरून मोर्चा काढायचे. मोर्चातल्या लोकांची संख्या कमी आहे म्हणून ते मोर्चा थांबवायचे नाहीत किंवा रद्द करायचे नाहीत. आता भाजप सत्तेत शक्तिशाली असला तरी या जनसंघात आयुष्य घालवलेल्या भाजप कार्यकर्त्याला फार मोठे पद कधी मिळाले नाही. व त्या कार्यकर्त्यांनी दु:खही कधी व्यक्त केले नाही.
कॉम्रेड मलाबादे यांच्या मोर्चाला गर्दी कमी पण..
कॉम्रेड के. एल. मलाबादे मोर्चा काढायचे त्यावेळीही संख्या कमी असायची. पण समोर गर्दी नाही म्हणून मलाबादे यांनी आपल्या भाषणातील मुद्दे कधी कमी केले नाहीत. भर उन्हात त्यांचे कार्यकर्ते डांबरी रस्त्यावर बसून त्यांचे भाषण पूर्णपणे ऐकायचे.
संतराम पाटील यांची भाषणातून सविस्तर मांडणी संतराम पाटील यांनीही कधी मोर्चाची गर्दी सभेची गर्दी याचा विचार केला नाही. समोर एकटा बसला असला तरी ते सविस्तरपणे आपली भूमिका मांडूनच आपले म्हणणे थांबवायचे. उद्या पेपरला बातमी फोटो येणार का? हे देखील कधी त्यांनी कोणाला विचारले नाही.