Sangli News : सांगलीत बिटल जातीच्या शेळीने गाठला ₹1,01,000 चा विक्रमी दर
वाळवा तालुक्यातील युवा शेतकऱ्याचा विक्रमी शेळीपालन व्यवहार
सांगली : अबब… एका शेळीची किंमत तब्बल एक लाख एक हजार रुपये! होय, सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एका युवा शेतकऱ्याने शेळीपालनातून असा विक्रम केला आहे, जो सध्या संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील गोटखिंडी गाव… इथे राहणारे युवा शेतकरी दीपक नांगरे यांनी पाळलेल्या बिटल जातीच्या शेळीने थेट ₹1,01,000 इतका विक्रमी दर गाठत सर्वांनाच थक्क केले आहे.
विशेष म्हणजे, ही किंमत अनेक ठिकाणी मिळणाऱ्या म्हशीपेक्षाही अधिक असल्याने हा व्यवहार सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.ही शेळी अवधूत चिखलगुट यांनी विकत घेतली. खरेदी-विक्रीच्या क्षणी गावात अक्षरशः उत्सुकतेची लाट उसळली होती. “इतक्या किमतीला शेळी?” हे पाहण्यासाठी शेतकरी, युवक आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
“ही शेळी बिटल जातीची आहे. लहानपणापासून खूप जपून संगोपन केलं. चांगला दर मिळेल अशी अपेक्षा होती, पण एक लाखाच्या वर जाईल असं कधी वाटलं नव्हतं.”योग्य जातीची निवड, संतुलित आहार, नियमित आरोग्य तपासणी आणि सातत्यपूर्ण काळजी…या सगळ्याचा परिणाम म्हणजे आज शेळीपालनातून मिळालेला हा विक्रमी मोबदला. या व्यवहारानंतर संपूर्ण वाळवा तालुक्यात दीपक नांगरे यांच्या मेहनतीची आणि शेळीपालन कौशल्याची चर्चा सुरू आहे.
शेळीपालनातूनही आर्थिक समृद्धी साधता येते, हेच या विक्रमी व्यवहाराने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे.
शेतीसोबत जोडधंदा म्हणून शेळीपालन…आणि त्यातून थेट लाखोंचा व्यवहार…वाळव्यातील ही ‘लाखमोलाची शेळी’ सध्या सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.