ओल्या दुष्काळाचे सावट...
गेल्यावर्षी एल निनोच्या फटक्यातून तावून सुलाखून निघाल्यानंतर यंदा दमदार पावसाची अपेक्षा पूर्ण होताना दिसत आहे. जून तुटीचा गेल्यानंतर जुलै तसेच ऑगस्टमध्ये पावसाने सरासरी ओलांडली आहे. सप्टेंबर महिन्यातही देशाच्या अनेक भागात चांगल्या पावसाची अपेक्षा असून, सरासरीच्या 109 टक्के पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मराठवाडा तसेच विदर्भाला नुकतेच पावसाने झोडपले आहे. यातील अनेक भागात शेती पाण्याखाली बुडाली असून, ओल्या दुष्काळाची स्थिती आहे. यंदा मान्सूनचा चार महिन्याचा हंगाम आता सरासरी ओलांडण्याची शक्यता आहे. यामुळे अतिरिक्त पाऊस हाच आता संकट ठरण्याची चिन्हे आहेत.
देशभरात जून महिन्यात सरासरीच्या उणे 10 टक्के पाऊस नोंदविण्यात आला. पावसाच्या उशिरा आगमनाचा शेतीला फटका बसला. मात्र, जुलै महिन्यातील पावसाने ही कसर भरून काढली. जुलै महिन्यात सरासरीच्या 9 टक्के अधिकचा पाऊस झाल्याने शेतीसह सर्वांना दिलासा मिळाला. दरम्यान, ऑगस्ट महिन्यातील पावसाच्या जोरदार बॅटींगमुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली. 1 ते 31 ऑगस्टदरम्यान देशभरात 15 टक्के अधिकचा पाऊस झाला. धरणसाठा वाढल्याने समाधानाची स्थिती असतानाच मुसळधार पावसामुळे दैना उडविली. याच काळात बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर येत ते पश्चिमेकडे सरकले. यामुळे गुजरातसह महाराष्ट्राला पावसाने झोडपले. 1 जून ते 4 सप्टेंबरपर्यंतची आकडेवारी पाहता देशभरात सरसरीच्या 8 टक्के अधिकच्या पावसाची नोंद झाली आहे. मध्य भारतात सरासरीच्या 16.9, दक्षिण भारतात 25, वायव्य भारतात सरासरीच्या 3.5 टक्के अधिकचा पाऊस, झाला आहे. तर पूर्व व पूर्वोत्तर भारतात पावसाची तूट 13 टक्के इतकी असल्याचे दिसून येते.
सप्टेंबरमध्ये सरासरीच्या 109 टक्के पाऊस
सप्टेंबर महिन्यातील हवामान स्थितीचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यानुसार पश्चिम किनारपट्टी, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, लडाखचा काही भाग, उत्तर आंध्र प्रदेश गोवा, अंदमान-निकोबार, लक्षद्वीपच्या भागात सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस होणार आहे. तर कर्नाटक, तामिळनाडू, पाँडिचेरी, दक्षिण आंध्र प्र्रदेश, उत्तर बिहार, लडाखचा काही भाग आणि पूर्वोत्तर भारताच्या बहुतांश भागात पावसाची तूट राहणार आहे. अऊणाचल प्रदेशच्या काही भागात पावसाची ओढ भीषण राहणार आहे. महाराष्ट्रात मराठवाडा, मध्य भारतातील तुरळक भाग वगळता सर्वत्र दमदार पाऊस राहणार आहे. तर सप्टेंबर महिन्यान कमाल तसेच किमान तापमानही सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे.
सप्टेंबरच्या शेवटी ला निने
सध्या प्रशांत महासागरातील समुद्रसपाटीचे तापमान कमी आहे. एल निनो तटस्थ स्थितीत असून, मान्सूनच्या हंगामाच्या शेवटी प्रशांत महासागरात ला निनो उद्भवण्याची शक्यता आहे. आयओडीही सध्या तटस्थ स्थितीत आहे.
असना ठरले दुर्मीळ वादळ
ऑगस्ट महिन्यात उत्तर पूर्व अरबी समुद्रात असना हे चक्रीवादळ निर्माण झाले. ऑगस्ट महिन्यात निर्माण झालेले गेल्या 40 वर्षानंतरचे हे पहिले वादळ ठरले. हे वादळ ओमानकडे सरकल्याने भारतीय किनारपट्टीला याचा फारसा धोका जाणवला नाही.
जागतिक तापमानावाढ धोक्याची घंटा
एल निनो तसेच हरित वायू उत्सर्जनामुळे जागतिक तापमानवाढ मोठ्या प्रमाणात होत आहे. गेले 13 महिने सलग तापमानवाढ नोंदविण्यात आली आहे. त्यात आता जुलै महिन्यानेदेखील भर घातली आहे. 2023 नंतर यंदाचा जुलै हा दुसरा सर्वात उष्ण महिना ठरला आहे. दरम्यान, या तापमानवाढीमुळे पुन्हा एकदा तापमान नियंत्रण करण्याचे प्रयत्न फोल ठरताना दिसत असून, हरित पृथ्वी तसेच 1.5 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान वाढ रोखण्याच्या पॅरिस करारातील लक्ष्य साध्य होणार नसल्याचे चित्र आहे. यामुळे याचे परिणाम मानवजातीवर मोठ्या प्रमाणावर होत आहेत.
युरोपियन यूनियन कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिस या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी 22 जुलै हा आतापर्यंतचा सर्वात उष्ण दिवस ठरला आहे. मोरोक्को, बहारीन, ग्रीस, हंगेरिया, बल्गेरिया, स्पेन, सौदी अरेबिया, थायलंड, बांगलादेश, मेक्सिको, रशिया, भारत, जपान, पाकिस्तानमध्ये काही दिवसांपूर्वी उष्णतेच्या लाटेने कहर केला होता. हज यात्रेतही शेकडो लोकांचा उन्हामुळे बळी गेला. भारतातदेखील जुलै महिन्यात तापमान अधिक राहिले आहे. 1901 नंतर रात्रीचे किमान तापमान अधिकचे राहिले आहे. उत्तर अमेरिकेत डेथ व्हॅलीमध्ये 10 जुलै रोजी सर्वाधिक 56.7 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. दक्षिण अमेरिकेलाही उष्णतेचा फटका बसला आहे.
प्रशांत महासागर तापला
जागतिक तापमानवाढीचा परिणाम प्रशांत महासागरावर होत असून, यामुळे समुद्रसपाटीचे तापमान, सामुद्रीक उष्णतेच्या लाटांत गेल्या काही वर्षात वाढ झाल्याचे आढळले आहे. यामुळे जीवसृष्टीवर परिणाम होण्यासह समुद्राच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचे जागतिक तापमान संस्था तसेच युनायटेड नेशन्सच्या अहवालातून समोर आले आहे.
जागतिक हवामान संस्था तसेच युनायटेड नेशन्सने साउथ वेस्ट पॅसिफिक 2023 हा अहवाल सादर केला आहे. यानुसार, प्र्रशांत महासागराच्या पाणीपातळीत जागतिक तापमानाच्या सरासरीपेक्षा अधिक वाढ झाली आहे. 1980 नंतर समुद्रसपाटीच्या पातळीतही तीन पटीने अधिक वाढ झाली आहे. सामुद्रीक उष्णतेच्या लाटाही आता वाढल्या असून, त्या अधिक तीव्र व अधिक काळ टिकणाऱ्या ठरत आहेत. समुद्रच तापत असल्याने शैवाळ, मासे आदी घटकांची यात हानी होत आहे. यामुळे सागरी पर्यटन व मासेमारीवर परिणाम होणार असल्याची चिंता तज्ञांनी व्यक्त केली आहे. सध्या जागतिक तापमानवाढ ही मोठी समस्या सर्वांसमोर आहे. ही कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, ते तोकडे ठरत आहेत. 2023 हे वर्ष सर्वात तापदायक ठरले आहे. यामागे हरितवायूंचे मोठ्या प्रमाणात होत असलेले उत्सर्जन हे प्रमुख कारण आहे.
2023 मध्ये सर्वाधिक उष्णता
2023 मध्ये समुद्रातील उष्णता सर्वाधिक नोंदविण्यात आली आहे. या वर्षात बर्फ मोठ्या प्रमाणात वितळला आहे. यासाठी एल निनो हा मोठा ट्रिगर ठरला आहे. गेल्या कालावधीत हिवाळा, पावसाळा तसेच उन्हाळ्यानेही उच्चांक नोंदविले आहेत. त्यामुळेच 2023 हे सर्वाधिक तापदायक वर्ष ठरले आहे. न्यूझीलंड, तसेच ऑस्ट्रेलिया देशालाही याचा फटका बसला असून, अनेक हिमशिखरांवरील बर्फ सरासरीपेक्षा कमी झाला आहे.
काय आहे पॅरिस करार
जागतिक तापमनावाढ आणि त्याचे दुष्परिणाम रोखण्यासाठी 2015 साली पॅरिस करार मांडण्यात आला. त्यानुसार 195 देश यात सहभागी झाले. यासाठी पर्यावरणाचे जतन संवर्धन करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. जागतिक सरासरी तापमानात होणारी वाढ रोखणे, हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यानुसार या शतकाच्या अखेरीस ग्लोबल वार्मिंग 1.5 डिग्री सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्याच्या आवश्यकतेवर भर देण्यात आला आहे.
पाणीसाठ्यात वाढ
चांगल्या पर्जन्यमानामुळे धरणसाठ्यात वाढ झाली असून, तो आता 83 टक्क्यांवर पोहोचला आहे. यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली आहे. यात नागपूर 83, अमरावती 85, छत्रपती संभाजीनगर 65, नाशिक 77, पुणे 90, तर कोकण विभागात 93 टक्के पाणीसाठा झाला आहे.
एकूणच ढगफुटी, अतिवृष्टी, दुष्काळ, उष्णतेच्या वा थंडीच्या लाटा, हे सारे ग्लोबल वार्मिंग वा जागतिक तापमानवाढीचे परिणाम असल्याचे म्हटले जाते. मागच्या काही वर्षांतील देशातील हवामानीय स्थितीचा आढावा घेतला, तर अनेक जिल्ह्यांना वा राज्यांना ढगफुटीच्या संकटाचा सामना करावा लागला आहे. त्याचबरोबर उष्णतेच्या लाटांनीही अनेक शहरांतील जनजीवन विस्कळीत झाल्याचे पहायला मिळाले आहे. केरळातील वायनाडमधील आपत्ती, उत्तराखंडमधील ढगफुटी, ही सारी या बदलत्या निसर्गचक्राचीही उदाहरणे म्हणावी लागतील. त्यामुळे भविष्यात देशापुढे व जगापुढे ग्लोबल वॉर्मिंगचे मोठे आव्हान राहणार, हे नक्की.
संकलन : अर्चना माने-भारती, पुणे