पाश्चिमात्य देशांची पाकिस्तानला होती पसंती !
जर्मनीत विदेशमंत्री जयशंकर यांनी सुनावले
वृत्तसंस्था/ म्युनिच
विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी रशियासोबत संरक्षण आणि व्यापार सहकार्याची पुष्टी दिली आहे. अनेक पाश्चिमात्य देश भारताला नव्हे तर पाकिस्तानला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करत होते. मागील दशकात ही वृत्ती बदलली असल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे.
अनेक पाश्चिमात्य देशांनी दीर्घकाळापासून भारताला नव्हे तर पाकिस्तानला संरक्षण सामग्रीचा पुरवठा करणे पसंत केले आहे, परंतु अमेरिकेसोबत मागील 10 किंवा 15 वर्षांमध्ये हे चित्र बदलले आहे. आमची नवी संरक्षणखरेदी आता अमेरिकेसोबत वैविध्यपूर्ण झाली आहे, रशिया, फ्रान्स आणि इस्रायल हे आमचे मुख्य पुरवठादार असल्याचे जयशंकर यांनी स्पष्ट केले.
जगाचे आर्थिक मॉडेल अस्थिर
जर्मनीत म्युनिच सुरक्षा संमेलनादम्यान एक प्रमुख जर्मन आर्थिक वृत्तपत्र डँडेल्सब्लैटला त्यांनी मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत जयशंकर यांनी जगातील पुरवठा साखळ्यांमधील असंतुलनावर प्रकाशझोत टाकला आणि जगाचे आर्थिक मॉडेल अस्थिर आणि चुकीचे असल्याचे नमूद केले. जागतिकीकरणाच्या नावावर आम्ही जगात केंद्रीकरण पाहिले आहे. उत्पादनाला निवडक देशांमध्ये स्थानांतरित करण्यात आल्याने अनेक देशांची अर्थव्यवस्था कोलमडतेय. जागतिक व्यवस्था सध्या अनेक प्रकारच्या तणावांना सामोरी जात आहे. कोरोना, युक्रेन युद्ध, गाझामधील संघर्ष, अफगाणिस्तानातून नाटोची माघार आणि हवामान बदलामुळे येणाऱ्या आपत्ती आमच्यासमोर आव्हान निर्माण करत असल्याचे जयशंकर म्हणाले.
रशियासोबत मजबूत भागीदारी
भारत आणि रशियाने दशकांपासून ऐतिहासिक संबंध आणि संयुक्त हितसंबंधांवर आधारित एक मजबूत रणनीतिक भागीदारी निर्माण केली आहे. या संबंधांच्या केंद्रस्थानी व्यापक संरक्षण सहकार्य आहे. रशिया भारताला सैन्य उपकरणांचा पुरवठा करत आहे. तसेच दोन्ही देशांचे सैन्य युद्धाभ्यास, अत्याधुनिक मिलिट्री प्लॅटफॉर्म्स विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.