वेस्टर्न बायपासचे आज उद्घाटन
मडगाव ते वार्कापर्यंत 11 किलोमीरचा महामार्ग
मडगाव : मडगाव घाऊक मासळी मार्केट ते वार्का रोड पर्यंतच्या 11 किलो मीटरच्या वेस्टर्न बायपासचे उद्घाटन आज सोमवार दि. 23 रोजी सकाळी 11.30 वा. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे. नव्या राष्ट्रीय महामार्ग 66 अंतर्गत हा वेस्टर्न बायपास येत असून नुवे येथून मडगावच्या घाऊक मासळी मार्केट पर्यंतचे काम पूर्ण झाले होते. त्यानंतर घाऊक मासळी मार्केट ते वार्का रोड पर्यंतच्या रस्त्याचे काम बरेच रेंगाळले होते. ते पूर्ण झाले असून आज त्याचे उद्घाटन होत आहे. वेस्टर्न बायपासचे उद्घाटन करावे अशी मागणी बाणावलीचे आमदार व्हॅन्झी व्हियेगस तसेच प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केले होती. ख्रिसमस सण जवळ आल्याने मडगाव शहरातील वाहनाची गर्दी कमी करण्यासाठी वेस्टर्न बायपासचे उद्घाटन करावे अशी मागणी केली जात होती. या उद्घाटन सोहळ्याला पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा, खा. कॅप्टन विरियातो फर्नांडिस, आमदार व्हॅन्झी व्हियेगस, विजय सरदेसाई, दिगंबर कामत, उल्हास तुयेकर इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.