For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विंडीज संघाकडून द. आफ्रिकेचे क्लीन स्वीप

06:00 AM Aug 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
विंडीज संघाकडून द  आफ्रिकेचे क्लीन स्वीप
Advertisement

टी-20 मालिकेत 3-0 ने यश : तिसऱ्या सामन्यातही आफ्रिकेची हार : रोमारिओ शेफर्ड सामनावीर तर शाय होप मालिकावीर

Advertisement

वृत्तसंस्था /त्रिनिदाद

वेस्ट इंडिज क्रिकेट टीमने दक्षिण आफ्रिकेचा टी-20 मालिकेत 3-0 असा एकतर्फी फरकाने धुव्वा उडवला. मंगळवारी रात्री झालेल्या तिसऱ्या व शेवटच्या टी-20 सामन्यात यजमान वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेवर डीएलएसनुसार 8 विकेट्सने विजय मिळवला. पावसामुळे हा सामना 13 ओव्हरचा करण्यात आला. दक्षिण आफ्रिकेने 13 षटकांत 4 विकेट्स गमावून 108 धावा केल्या. मात्र विंडीजला विजयासाठी डीएलएसनुसार 116 धावांचे आव्हान मिळालं. विंडिजने हे आव्हान 9.2 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून पूर्ण केले. विंडीजच्या रोमारिओ शेफर्डला सामनावीर तर शाय होपला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

Advertisement

ब्रायन लारा स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्यादरम्यान पावसाचा व्यत्यय आल्यामुळे हा सामना 13 षटकांचा खेळवण्यात आला. आफ्रिकेसाठी सलामीवीर रिकेल्टन व रिझा हेंड्रिक्स यांनी 23 धावांची सलामी दिली. पण, 9 धावांवर हेंड्रिक्सला अकिल होसेनने बाद करत आफ्रिकेला पहिला धक्का दिला. कर्णधार मार्करमही फार काळ टिकला नाही. 20 धावा काढून तो बाद झाला. रिकेल्टनने 27 धावांचे योगदान दिले. ट्रिस्टन स्टब्जने मात्र आक्रमक खेळताना 15 चेंडूत 5 चौकार व 3 षटकारासह 40 धावा फटकावल्या. स्टब्जच्या या धमाकेदार खेळीमुळे आफ्रिकेला शतकी मजल मारता आली. इतर फलंदाजांनी मात्र निराशा केल्यामुळे आफ्रिकन संघाला 13 षटकांत 4 बाद 108 धावा करता आल्या.

डीएलएस पद्धतीमुळे वेस्ट इंडिजला 116 धावांचे लक्ष्य मिळाले. जे यजमान संघाने अवघ्या 9.2 षटकांत पूर्ण केले. वेस्ट इंडिजची पहिली विकेट 2 धावांवर पडली. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या निकोलस पूरनने झंझावाती खेळी साकारली. पूरनने 13 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने झटपट 35 धावा केल्या. यानंतर शाय होप आणि शिमरॉन हेटमायर यांनी सामना संपवला. शाय होपने 24 चेंडूत 42 आणि हेटमायरने 17 चेंडूत 31 धावा करत सामना लवकर संपवला. या विजयासह यजमान विंडीजने तीन सामन्यांची मालिका एकतर्फी जिंकली. दरम्यान, वेस्ट इंडिजने मालिकेतील पहिला सामना सात विकेट्सने, तर दुसरा सामना 30 धावांनी जिंकला. विंडीज संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेत ते 5 वनडे सामने खेळणार आहेत.

संक्षिप्त धावफलक

दक्षिण आफ्रिका 13 षटकांत 4 बाद 108 (रिकेल्टन 27, मार्करम 20, स्टब्ज 40, रोमारिओ शेफर्ड 2 बळी, अकिल होसेन व फोर्ड प्रत्येकी एक बळी) वेस्ट इंडिज 9.2 षटकांत 2 बाद 116 (शाय होप नाबाद 42, निकोलस पूरन 35, हेटमायर नाबाद 31, बार्टमन व फोर्टिन प्रत्येकी एक बळी).

Advertisement
Tags :

.