जोकोव्हिच, स्विटोलिना, अझारेंका पराभूत
पॉपीरिन, गॉफ,टिफोई,साबालेंका चौथ्या फेरीत दाखल
वृत्तसंस्था /न्युयॉर्क
2024 च्या टेनिस हंगामातील येथे सुरू असलेल्या शेवटच्या अमेरिकन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेत पुरूष एकेरीत सर्बियाचा विद्यमान विजेता जोकोव्हिचचे आव्हान तिसऱ्या फेरीतच ऑस्ट्रेलियाच्या पॉपीरिनने संपुष्टात आणले. फ्रान्सचा टिफोईने आपल्याच देशाच्या शेल्टनचा पराभव करत शेवटच्या 16 खेळाडूंत स्थान मिळविले. महिला एकेरीत अमेरिकेची विद्यमान विजेती कोको गॉफने युक्रेनच्या स्विटोलिनाचा फडशा पाडत चौथ्या फेरीत स्थान मिळविले. चीनच्या वेंगने बेलारुसच्या माजी टॉपसिडेड अझारेंकाला पराभूत केले. साबालेंकाने महिला एकेरीची चौथी फेरी गाठली.
या स्पर्धेत स्पेनच्या माजी टॉपसिडेड अल्कारेझचे आव्हान दुसऱ्या फेरीतच समाप्त झाल्यानंतर सर्बियाच्या विद्यमान विजेता जोकोव्हिचला तिसऱ्याफेरीत ऑस्ट्रेलियाच्या पॉपीरिनने पराभवचा अनपेक्षित धक्का दिला. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत जोकोव्हिचने सुवर्णपदक मिळविताना अल्कारेझला पराभूत केले होते. पुरूष एकेरीच्या तिसऱ्या फेरीतील सामन्यात अॅलेक्सी पॉपीरिनने जोकोव्हिचवर 6-4, 6-4, 2-6, 6-4 अशा सेटस्मध्ये पराभव करत शेवटच्या 16 खेळाडूंत स्थान मिळविले. या सामन्यात जोकोव्हिचने 14 दुहेरी चुका केल्या. या स्पर्धेत अल्कारेझच्या दुसऱ्या फेरीतील पराभवानंतरचा हा धक्कादायक निकाल आहे. या पराभवामुळे जोकोव्हिचचे विक्रमी 25 वे ग्रॅन्डस्लॅम जेतेपद मिळविण्याचे स्वप्न भंगले.
पुरूष एकेरीच्या तिसऱ्या फेरीतील अन्य एका सामन्यात अमेरिकेच्या फ्रान्सीस टिफोईने आपल्याच देशाच्या बेन शेल्टनचा 4-6, 7-5, 6-7(5-7), 6-4, 6-3 अशा पाच सेटस्मधील लढतीत पराभव केला.
महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीतील सामन्यात अमेरिकेच्या कोको गॉफने युक्रेनच्या इलीना स्विटोलिनाचा 3-6, 6-3, 6-3 अशा सेटस्मध्ये पराभव करत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. तिसऱ्या फेरीतील अन्य एका सामन्यात गेल्यावर्षी या स्पर्धेत उपविजेतेपद मिळविणाऱ्या आर्यना साबालेंकाने 29 व्या मानांकित अॅलेक्सेंड्रोव्हाचा 2-6, 6-1, 6-2 अशा सेटस्मध्ये पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. चीनच्या यफेन वेंगने बेलारुसच्या माजी टॉपसिडेड तर सध्याच्या 20 व्या मानांकित अझारेंकाचे आव्हान 6-4, 3-6, 6-1 असे संपुष्टात आणले. हा सामना अडीच तास चालला होता. चीनच्या झेंग क्वीनवेनने जर्मनीच्या बिगर मानांकित निमेरचा 6-2, 6-1 असा फडशा पाडत पुढील फेरीत प्रवेश केला.