विंडीज महिला संघाची मालिकेत बरोबरी
द. आफ्रिकेचा 6 गड्यांनी पराभव, हेली मॅथ्यूज ‘सामनावीर’
वृत्तसंस्था / केव्ह हिल
तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत द. आफ्रिका महिला क्रिकेट संघाने येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात द. आफ्रिकेचा 4 चेंडू बाकी ठेवून 6 गड्यांनी पराभव केला. या मालिकेतील पहिला सामना द. आफ्रिकेने जिंकला होता. त्यामुळे आता विंडीजने हा दुसरा सामना जिंकून बरोबरी साधली आहे. 56 चेंडूत नाबाद 63 धावा तर 15 धावांत 1 गडी बाद करणारी विंडीजची हेली मॅथ्युजला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. या दुसऱ्या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून द. आफ्रिकेला प्रथम फलंदाजी दिली. द. आफ्रिका महिला संघाने 20 षटकात 6 बाद 113 धावा जमविल्या. त्यानंतर विंडीजने 19.2 षटकात 4 बाद 116 धावा जमवित विजयाचे उद्दिष्ट गाठले.
द. आफ्रिकेच्या डावात डी. क्लर्कने 24 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 20, कर्णधार वूलव्हर्टने 2 चौकारांसह 16, ब्रिट्सने 21 चेंडूत 14, स्मिटने 1 चौकारासह 13, मेसोने 19 चेंडूत नाबाद 14 तर आठव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेली डर्कसेनने 17 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 21 धावा केल्या. मेसो आणि स्मिट यांनी सातव्या गड्यासाठी अभेद्य 34 धावांची भागिदारी केली. द. आफ्रिकेच्या डावात 1 षटकार आणि 6 चौकार नोंदविले गेले. विंडीजतर्फे फ्लेचर आणि रॅमरेक यांनी प्रत्येकी 2 तसेच मॅथ्युज आणि क्लेक्सटोन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. द. आफ्रिकेने पॉवरप्ले दरम्यान 6 षटकात 31 धावा जमविताना 2 गडी गमविले. द. आफ्रिकेचे अर्धशतक 58 चेंडूत तर शतक 113 चेंडूत फलकावर लागले. 10 षटकाअखेर द. आफ्रिकेने 3 बाद 53 धावा जमविल्या होत्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना विंडीजच्या डावात कर्णधार मॅथ्युजने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून 56 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह नाबाद 63 धावा झळकविल्या. जोसेफने 21 चेंडूत 3 चौकारांसह 17, हेक्टरने 3, कॅम्पबेलने 7 तर हेन्रीने 3 धावा केल्या. ग्लास्गोने 17 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 15 धावा जमविल्या. विंडीजच्या डावात 1 षटकार आणि 10 चौकार नोंदविले गेले. द. आफ्रिकेतर्फे मलाबाने 2 तर क्लास आणि खाका यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. विंडीजने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 33 धावा जमविल्या. 10 षटकाअखेर विंडीजने 1 बाद 47 धावा जमविल्या होत्या. विंडीजचे अर्धशतक 63 चेंडूत तर शतक 109 चेंडूत नोंदविले गेले. मॅथ्युजने 50 चेंडूत 4 चौकारांसह अर्धशतक झळकविले.
संक्षिप्त धावफलक : द. आफ्रिका 20 षटकात 6 बाद 113 (डी. क्लर्क 20, डर्कसन नाबाद 21, वूलव्हर्ट 16, ब्रिट्स 14, मेसो नाबाद 14, स्मिट 13, अवांतर 11, फ्लेचर व रामहरक प्रत्येकी 2 बळी, मॅथ्युज व क्लेक्सटोन प्रत्येकी 1 बळी), विंडीज 19.2 षटकात 4 बाद 116 (मॅथ्युज नाबाद 63, जोसेफ 17, ग्लास्गो नाबाद 15, अवांतर 8, मलाबा 2-17, क्लास व खाका प्रत्येकी 1 बळी)