विंडीजचा आयर्लंडवर मालिका विजय
तीन सामन्यांची टी-20 मालिका, लेवीस ‘सामनावीर’
वृत्तसंस्था / ब्रॅडी (नॉर्दन आयर्लंड)
विंडीज क्रिकेट संघाने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत यजमान आयर्लंडचा 1-0 असा पराभव केला. या मालिकेतील खेळविण्यात आलेल्या शेवटच्या सामन्यात विंडीजने आयर्लंडचा 62 धावांनी पराभव केला. या शेवटच्या सामन्यात विंडीजच्या लेवीसला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. या मालिकेतील पहिले दोन सामने पावसाळामुळे वाया गेले. टी-20 प्रकारात विंडीजने शेवटच्या सामन्यात 256 ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या नोंदविली.
या शेवटच्या सामन्यात आयर्लंडने नाणेफेक जिंकून विंडीजला प्रथम फलंदाजी दिली. विंडीजने 20 षटकात 5 बाद 256 धावा जमविल्या. त्यानंतर आयर्लंडने 20 षटकात 7 बाद 194 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना आणि मालिका गमवावी लागली.
विंडीजच्या डावामध्ये सलामीच्या इव्हीन लेवीसने 44 चेंडूत 8 षटकार आणि 7 चौकारासह 91 तर कर्णधार हॉपने 27 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकारासह 51 धावा झोडपल्या. या जोडीने सलामीच्या गड्यासाठी 63 चेंडूत 122 धावांची शतकी भागिदारी केली. या जोडीने पहिल्या 6 षटकात 70 धावा जमविल्या. या जोडीने 26 चेंडूत अर्धशतकी तर 52 चेंडूत शतकी भागिदारी केली. लेवीसने 29 चेंडूत 5 षटकार आणि 3 चौकारांसह तर हॉपने 4 षटकार आणि 4 चौकारांसह 23 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. पॉवेलने 2, हेटमायरने 7 चेंडूत 3 चौकारांसह 15 तर होल्डरने 13 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 18, शेफल्डने 10 चेंडूत 3 षटकारांसह नाबाद 19, कार्टीने 22 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकारासह नाबाद 49 धावा जमविल्या. विंडीजच्या डावामध्ये 20 षटकार आणि 20 चौकार नोंदविले गेले. आयर्लंडतर्फे हंप्रेजने 16 धावांत 2 तर अॅडेर, मॅक्रेटी आणि वाईट यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला.
प्रत्युत्तयरादाखल खेळताना आयर्लंडच्या डावात रॉस अॅडेरने 36 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकारांसह 48, टेक्टरने 25 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 38, कर्णधार स्टर्लिंगने 6 चेंडूत 3 चौकारांसह 13, डॉक्रेलने 8 चेंडूत 3 चौकारांसह 15, मार्कअॅडेरने 14 चेंडूत 4 षटकारांसह नाबाद 31, लियाम मॅक्रेटीने 15 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 16 धावा जमविल्या. टकेर एका धावेवर तर टेक्टर 7 धावांवर बाद झाले. आयर्लंडच्या डावात 23 अवांतर धावा नोंदविल्या गेल्या आयर्लंडच्या डावामध्ये 11 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले. विंडीजतर्फे अकिल हुसेनने 27 धावांत 3, होल्डरने 49 धावांत 2, शेफर्ड आणि चेस यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. आयर्लंडने पॉवरप्ले दरम्यान 6 षटकात 64 धावा जमविताना 1 गडी गमविला.
आयर्लंडच्या दौऱ्यावर गेल्या मे महिन्यात विंडीजने तीन सामन्यांची वनडे मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडविली होती. तत्पूर्वी इंग्लंडने विंडीजचा वनडे मालिकेत 3-0 तसेच टी-20 मालिकेत 3-0 असा एकतर्फी पराभव केला होता. आता आयर्लंड दौऱ्यानंतर विंडीजमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ दाखल होत आहे. विंडीज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका 25 जूनपासून बार्बाडोस येथे सुरू होईल. कसोटी मालिकेनंतर उभय संघात पाच सामन्यांची टी-20 मालिका आयोजित केली आहे. अलिकडेच ऑस्ट्रेलिया संघाला लंडनमध्ये आयसीसीच्या कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेत अंतिम सामन्यात द. आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला होता. या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ विंडीजमध्ये पहिली कसोटी 25 जूनला खेळणार आहे.
संक्षिप्त धावफलक : विंडीज 20 षटकात 5 बाद 256 (लेवीस 91, हॉप 51, हेटमायर 15, कार्टी नाबाद 49, होल्डर 18, शेफर्ड नाबाद 19, अवांतर 11, हंप्रेज 2-15, मार्क अॅडेर, बॅरी मॅक्रेथी आणि व्हाईट प्रत्येकी 1 बळी), आयर्लंड 20 षटकात 7 बाद 194 (रॉस अॅडेर 48, टेक्टर 38, स्टर्लिंग 13, डॉक्रेल 15, मार्क अॅडेर नाबाद 31, लियाम मॅक्रेथी नाबाद 16, अवांतर 23, अकिल हुसेन 3-27, होल्डर 2-49, शेफर्ड व चेस प्रत्येकी 1 बळी)