भारत-दक्षिण आफ्रिका दुसरा टी-20 सामना आज
शुभमन गिलवर चांगली कामगिरी करून दाखविण्याचा दबाव
वृत्तसंस्था/ मुल्लानपूर (न्यू चंदिगड)
मुल्लानपूर येथे आज गुऊवारी होणाऱ्या दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारत दक्षिण आफ्रिकेवरील आपले वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न करत असताना सर्वांत लहान स्वरूपात आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी अद्याप प्रयत्नशील असलेला शुभमन गिल घरच्या मैदानाचा फायदा उठवून मोठी खेळी करण्यासाठी प्रयत्नशील असेल.
पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये फक्त एक दिवसाचा फरक राहिलेला असला, तरी चांगल्या खेळीच्या शोधात असलेला गिल त्याचा विचार न करता मैदानात उतरेल. मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला जोरदार धक्का दिला. परंतु सप्टेंबरमध्ये आशिया कपमधून टी-20 मध्ये पुनरागमन केल्यानंतर गिलने फारशी न दाखविलेली चमक हा चर्चेचा विषय राहिला आहे. इंग्लंडमध्ये कसोटी कर्णधार म्हणून प्रभावी पदार्पणानंतर गिलला पुन्हा टी-20 संघात आणण्यात आले. जरी संजू सॅमसन आणि त्याचा पंजाबचा सहकारी अभिषेक शर्मा सलामीला चांगल्या प्रकारे भूमिका बजावत होते, तरी संघ व्यवस्थापनाने टी-20 सलामीवीर म्हणून गिलच्या क्षमतेवर प्रचंड विश्वास दाखवला.
त्यामुळे केरळच्या त्या फलंदाजाला आपली जागा गमवावी लागली आणि तेव्हापासून तो संघात स्थान मिळविण्यासाठी संघर्ष करत आहे. गेल्या वर्षीच्या टी-20 विश्वचषकापर्यंत विराट कोहलीने भारतासाठी बजावलेली भूमिका कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार असलेला गिल निर्दोषपणे पार पाडू शकतो. परंतु आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाजी पर्याय उपलब्ध असलेल्या संघाने बार्बाडोसमधील विजयानंतर त्याच्या निर्भय दृष्टिकोनात दुप्पट भर घातली आहे, ज्यामुळे खेळपट्टीला चिकटून फरंदाजी करण्यास फारशी जागा राहिलेली नाही.
गिल निश्चितच पॉवरप्लेमध्ये अभिषेक शर्मासारखा अतिआक्रमक रूप धारण करू शकत नाही आणि म्हणूनच त्याच्यासाठी काय सर्वोत्तम आहे हे शोधण्याची आवश्यकता आहे. गिलव्यतिरिक्त गेल्या 12 महिन्यांत सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या कर्णधार सूर्यकुमार यादववर देखील दबाव आहे. काही महिन्यांनंतर सूर्यकुमार घरच्या मैदानावर भारताच्या विश्वचषक राखून ठेवण्याच्या मोहिमेचे नेतृत्व करेल आणि अतिरिक्त जबाबदारी लक्षात घेता त्याच्या बॅटमधून त्या स्पर्धेत धावांचा प्रवाह वाहणे आवश्यक आहे. न्यू चंदीगडच्या थंड वातावरणात भारत विजयी संघात बदल करण्याची शक्यता कमी आहे. दुखापतीतून सावरून संघात परतलेल्या हार्दिक पंड्याने आघाडीचा अष्टपैलू खेळाडू म्हणून आपला दर्जा पुन्हा एकदा स्पष्ट केला. मागील सामन्यात त्याच्या 28 चेंडूंत 59 धावांनी मोठा फरक पाडला तसेच गोलंदाजीतही त्याने चमक दाखविली.
मंगळवारी झालेल्या निवडीतून असेही दिसून आले की, अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव हे दोन स्ट्राईक बॉलर आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाजी पर्याय उपलब्ध राहण्याची गरज असल्याने एकाच वेळी अंतिम अकरा जणांचा भाग नसतील. यावेळी अर्शदीपला संधी मिळाली आणि या प्रकारातील भारताचा आघाडीचा बळी घेणारा हा गोलंदाज जसप्रीत बुमराहसह गोलंदाजी करताना पुन्हा एकदा सुऊवातीला प्रतिस्पर्धी फलंदाजांना टिपण्यात यशस्वी झाला.
दुसरीकडे, दक्षिण आफ्रिका 176 धावांचा पाठलाग करताना 74 धावांवर गुंडाळला गेल्यानंतर फलंदाजीत खूप सुधारणा करण्याच्या प्रयत्नात असेल. पण पराभवावर विचार करण्यासाठी वेळ नाही आणि ती पाहुण्यांसाठी चांगली गोष्ट असू शकते. ‘आजकाल टी-20 क्रिकेटमध्ये आजूबाजूला पाहण्यासाठी आणि आत्मसात करण्यासाठी जास्त वेळ नसतो. परंतु सर्वांत मोठा घटक म्हणजे आम्हाला भागीदारी रचता आली नाही, फलंदाज गमावल्यानंतर स्थिरावता आले नाही आणि आमच्या बाजूने काही गती प्राप्त कता आली नाही. म्हणून आम्ही थोडक्यात चर्चा करू’, असे कर्णधार एडन मार्करम म्हणाला.
सप्टेंबरमध्ये दोन महिलांचे एकदिवसीय सामने झाल्यानंतर हे मैदान पहिल्यांदाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्याचे आयोजन करणार आहे. गेल्या आयपीएलमध्ये या खेळपट्टीवर खेळणे सोपे राहिलेले नाही आणि 101 पासून 200 पेक्षा जास्त धावसंख्या येथे नोंदली गेली आहे. दरम्यान आजच्या सामन्यावेळी युवराज सिंग आणि हरमनप्रीत कौर यांची नावे दिलेल्या स्टँडचेही अनावरण केले जाईल.
संघ: भारत-सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, अक्षर पटेल, वऊण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, संजू सॅमसन.
दक्षिण आफ्रिका : एडन मार्करम (कर्णधार), क्विंटन डी कॉक, ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, मार्को जॅनसेन, केशव महाराज, लुथो सिपामला, एनरिक नॉर्टजे, लुंगी एनगिडी, जॉर्ज लिंडे, क्वेना माफाका, रीझा हेन्ड्रिक्स, कॉर्बिन बॉश, टोनी डी झोर्झी, ओटनील बार्टमन.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7 वा.