शेवटच्या सामन्यात विंडीज विजयी, लेव्हिस सामनावीर
मात्र मालिका लंकेकडे, रुदरफोर्डचे नाबाद अर्धशतक, कुसल मेंडिसच्या 22 चेंडूत 56 धावा, चरिथ असालेंका मालिकावीर
वृत्तसंस्था/पल्लिकेले
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत यजमान लंकेने विंडीजचा 2-1 अशा फरकाने पराभव केला. या मालिकेतील झालेल्या शेवटच्या सामन्यात विंडीजने लंकेचा डकवर्थ लेविस नियमाच्या आधारे 8 गड्यांनी दणदणीत पराभव केला. शानदार नाबाद शतक झळकाविणाऱ्या विंडीजच्या लेव्हिसला ‘सामनावीर’ तर लंकेचा कर्णधार असालेंकाला ‘मालिकावीर’ म्हणून घोषित केले. विंडीजने शेवटचा सामना जिंकून या मालिकेत व्हाईटवॉश टाळला. या शेवटच्या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून लंकेला प्रथम फलंदाजी दिली. पावसाचा अडथळा आल्याने पंचांनी हा सामना प्रत्येकी 23 षटकांचा खेळविण्याचा निर्णय घेतला. लंकेने 23 षटकात 3 बाद 156 धावा जमवित विंडीजला विजयासाठी 157 धावांचे आव्हान दिले. दरम्यान विंडीजच्या डावात पुन्हा पावसाचा अडथळा आल्याने पंचांनी विंडीजला 23 षटकात 195 धावांचे नवे उद्दिष्ट दिले. विंडीजने 22 षटकात 2 बाद 196 धावा जमवित हा सामना 6 चेंडूत बाकी ठेऊन 8 गड्यांनी जिंकला.
लंकेच्या डावामध्ये सलामीच्या निशांकाने 62 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह 56 धावा जमविताना अविष्का फर्नांडो समवेत सलामीच्या गड्यासाठी 81 धावांची भागिदारी केली. चेसने फर्नांडोला स्वत:च्या गोलंदाजीवर टिपले. त्याने 50 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 34 धावा जमविल्या. निशांका आणि कुशल मेंडीस यांनी दुसऱ्या गड्यासाठी 57 धावांची भर घातली. चोरटी धाव घेण्याच्या नादात निशांका धावचीत झाला. कुशल मेंडीसने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून 22 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारांसह नाबाद 56 धावा झळकाविल्या. कर्णधार असालेंका 6 धावांवर बाद झाला. लंकेच्या डावात 4 षटकार आणि 21 चौकार नोंदविले गेले. लंकेने पहिल्या पॉवर प्ले दरम्यानच्या 10 षटकात 47 धावा जमविल्या. लंकेची स्थिती 17.2 षटकात 1 बाद 81 अशी असताना पावसाला प्रारंभ झाल्याने खेळ थांबवावा लागला. लंकेचे पहिले अर्धशतक 68 चेंडूत, शतक 110 चेंडूत तर दीडशतक 134 चेंडूत नोंदविले गेले. निशांकाने आपले अर्धशतक 1 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 58 चेंडूत तर कुशल मेंडीसने आपले अर्धशतक 19 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने झळकाविले. विंडीजतर्फे चेस आणि रूदरफोर्ड यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
लेव्हीसचे नाबाद शतक
प्रत्युत्तरादाखल खेळताना विंडीजचा सलामीचा फलंदाज लेव्हीसने दमदार फलंदाजी करताना 61 चेंडूत 4 षटकार आणि 9 चौकारांसह नाबाद 102 धावा जमवित आपल्या संघाला सामना जिंकून दिला. लेव्हीसने किंग समवेत पहिल्या गड्यासाठी 36 धावांची तर त्यानंतर हॉप समवेत दुसऱ्या गड्यासाठी 72 धावांची भागिदारी केली. रूदरफोर्ड आणि लेव्हिस यांनी तिसऱ्या गड्यासाठी अभेद्य 88 धावांची भागिदारी केली. रूदरफोर्डने 26 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 50 धावा झळकाविल्या. विंडीजचे पहिले अर्धशतक 41 चेंडूत, शतक 84 चेंडूत तर दीडशतक 112 चेंडूत नोंदविले गेले. लेव्हिसने अर्धशतक 1 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 34 चेंडूत तर शतक 61 चेंडूत 4 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने झळकाविले. रूदरफोर्डने अर्धशतक 26 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने पूर्ण केले. विंडीजच्या डावात 8 षटकार आणि 15 चौकार नोंदविले गेले. लंकेतर्फे मधुशंका आणि असिता फर्नांडो यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. या मालिकेमध्ये लंकेचा कर्णधार असालेंकाने फलंदाजीत 145 धावा तर गोलंदाजीत 2 गडी बाद केल्याने त्याला मालिकावीर म्हणून निवडण्यात आले. निशांकाचे वनडे क्रिकेटमधील हे 15 वे अर्धशतक आहे. तसेच रूदरफोर्डचे चौथे अर्धशतक आहे. 2021 नंतर पहिला वनडे सामना खेळणाऱ्या लेव्हिसने आपले पाचवे शतक झळकाविले.
संक्षिप्त धावफलक
श्रीलंका (23 षटकांचा खेळ) 3 बाद 156 (निशांका 56, अविष्का फर्नांडो 34, कुशल मेंडीस नाबाद 56, असालेंका 6, अवांतर 4, चेस 1-20, रूदरफोर्ड 1-27), विंडीज (23 षटकात विजयासाठी 195 धावांचे उद्दिष्ट) 22 षटकात 2 बाद 196 (किंग 16, लेव्हिस नाबाद 102, होप 22, रूदरफोर्ड नाबाद 50, अवांतर 6, मधुशनका 1-50, असिता फर्नांडो 1-39).