विंडीजच्या गॅब्रियलचा क्रिकेटला निरोप
बार्बाडोस : विंडीज संघाचा वेगवान गोलंदाज शेनॉन गॅब्रियलने गुरुवारी आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिक्रेट क्षेत्रातील निवृत्तीची घोषणा केली. 36 वर्षीय ग्रॅब्रियलने गेल्या 12 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत विंडीज संघाचे प्रतिनिधीत्व करताना सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. गॅब्रियलने आपल्या वेगवान गोलंदाजीची दहशत निर्माण केली होती. 2012 साली लॉर्डस् मैदानावर झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात त्याने आपले कसोटी पदार्पण केले होते.
त्यानंतर 2018 साली झालेल्या लंके विरुद्धच्या कसोटी सामन्यात गॅब्रियलने सर्वोत्तम कामगिरी करताना 13 गडी बाद केले होते. या सामन्यात त्याने पहिल्या डावात 62 धावांत 8 गडी बाद केले होते. कसोटी क्रिकेटमधील गॅब्रियलची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. विंडीजतर्फे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या वेगवान गोलंदाजांच्या यादीत मायकेल होल्डिंग पहिल्या स्थानावर असून कोर्टनी वॉल्श दुसऱ्यास्थानावर तर गुदाकेश मोती तिसऱ्या स्थानावर आहेत. होल्डिंगने 149 धावांत 14 बळी, वॉल्शने 55 धावांत 13 बळी तर मोतीने 99 धावांत 13 गडी बाद केले होते. आता या यादीत गॅब्रियल चौथ्या स्थानावर आहे. गॅब्रियलने आपली शेवटची कसोटी गेल्या जुलै महिन्यात भारताविरुद्ध त्रिनीदादच्या घरच्या मैदानावर खेळली होती.