न्यूझीलंडच्या महिलांसमोर आज वेस्ट इंडिजचे आव्हान
वृत्तसंस्था/शारजा
महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेतील न्यूझीलंडचा संघ आज शुक्रवारी येथे दुसऱ्या उपांत्य फेरीतील सामन्यात वेस्ट इंडिजचा सामना करताना आपली प्रेरणादायी वाटचाल चालू ठेवण्याचा प्रयत्न करेल. न्यूझीलंडने भारत आणि श्रीलंकेला पराभूत करून ‘अ’ गटातून अंतिम चारमध्ये स्थान मिळवले आहे आणि स्पर्धेपूर्वीची आपली 10 सामन्यांतील पराभवाची मालिका मागे टाकली आहे. सोफी डिव्हाईनने किवी संघाचे प्रभावीपणे नेतृत्व केले असून त्यांच्या यशोगाथेमध्ये जॉर्जिया प्लिमर आणि दिग्गज सुझी बेट्स यांचे सर्वांत मोठे योगदान आहे. तसेच अष्टपैलू अॅमेलिया केरने तळाकडे आपली भूमिका चांगल्या प्रकारे बजावली आहे. या स्पर्धेत कमी धावसंख्या पाहायला मिळालेली असून केर 10 बळी आणि 85 धावांसह किवी आक्रमणात आघाडीवर आहे.
संयुक्त अरब अमिरातीतील संथ खेळपट्ट्यांवर सात बळी घेऊन या विश्वचषकातील न्यूझीलंडच्या यशात रोझमेरी मायर हिनेही चांगले योगदान दिले आहे. ईडन कार्सनने भारताविऊद्धच्या न्यूझीलंडच्या लढतीच्या निकालाची दिशा निश्चित केली आणि किवींना आशा असेल की, ही फिरकीपटू वेस्ट इंडिजविऊद्धच्या सामन्यात चांगली कामगिरी करेल. विंडीजने इंग्लंडवर मोठा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. हेली मॅथ्यूजच्या वेस्ट इंडिजने ‘ब’ गटात अव्वल स्थान पटकावले आणि न्यूझीलंडप्रमाणे त्यांनीही गट टप्प्यात एक सामना गमावला. परंतु एकूण पाहता 2016 मधील स्पर्धेच्या या विजेत्यांनी दमदार कामगिरी केली आहे.