विंडीजचा पहिल्या डावात 146 धावांत खुर्दा
नाहिद राणाचे 5 बळी, बांगलादेश 211 धावांनी आघाडीवर, शादमान इस्लामच्या 46 धावा
वृत्तसंस्था / किंग्जस्टन (जमैका)
दुसऱ्या क्रिकेट कसोटीतील खेळाच्या तिसऱ्या दिवशी बांगलादेशने आपली स्थिती अधिक मजबूत करताना यजमान विंडीजवर 211 धावांची आघाडी मिळविली. तत्पूर्वी विंडीजचा पहिला डाव 146 धावांत आटोपला. बांगलादेशच्या नाहिद राणाने 61 धावांत 5 गडी बाद केले. दिवसअखेर बांगलादेशने दुसऱ्या डावात 5 बाद 193 धावा जमविल्या.
दोन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत या दुसऱ्या सामन्यात बांगलादेशचा पहिला डाव 164 धावांवर आटोपला. त्यानंतर विंडीजने 1 बाद 70 या धावसंख्येवरुन तिसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. पण नाहिद राणाच्या अचूक गोलंदाजीसमोर विंडीजचे 9 फलंदाज 76 धावांत तंबूत परतले. विंडीजच्या पहिल्या तीन फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. कार्टीने 115 चेंडूत 1 चौकारांसह 40, कर्णधार ब्रेथवेटने 129 चेंडूत 3 चौकारांसह 39 आणि लुईसने 1 चौकारांसह 12 धावा जमविल्या. उपाहारावेळी विंडीजची स्थिती 62 षटकात 8 बाद 135 अशी होती. उपाहारानंतर केवळ 3 षटकातच त्यांचे उर्वरित दोन गडी तंबूत परतले. बांगलादेशतर्फे नाहिद राणाने 61 धावांत 5, हसन मेहमुदने 19 धावांत 2, तस्किन अहमद, टी. इस्लाम आणि मेहिदी हसन मिराज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. बांगलादेशने विंडीजवर पहिल्या डावात 18 धावांची नाममात्र आघाडी मिळविली.
बांगलादेश संघाने पहिल्या डावात 200 पेक्षा कमी धावसंख्या रचल्यानंतर दुसऱ्यांदा त्यांनी पहिल्या डावात प्रतिस्पर्धी संघावर आघाडी मिळविली आहे. 2008 साली द. आफ्रिका संघाविरुद्ध खेळताना बांगलादेशने पहिल्या डावात 192 धावा जमविल्या होत्या. तरी त्यांनी द. आफ्रिकेवर 22 धावांची आघाडी मिळविली होती. नाहिद राणाची ही सहावी कसोटी असून एका डावात 5 गडी बाद करण्याची त्याची पहिलीच वेळ आहे.
18 धावांची आघाडी मिळविल्यानंतर बांगलादेशच्या दुसऱ्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. संघाचे खाते उघडण्यापूर्वीच सलामीचा फलंदाज जॉयला सील्सने झेलबाद केले. शादमान इस्लाम आणि शहादत हुसेन यांनी दुसऱ्या गड्यासाठी 47 धावांची भागिदारी केली. अल्झारी जोसेफने हुसेनला झेलबाद केले. त्याने 26 चेंडूत 4 चौकारांसह 28 धावा जमविल्या. शादमान इस्लाम आणि कर्णधार मेहिदी हसन मिराज यांनी संघाचा डाव सावरताना दुसऱ्या गड्यासाठी 70 धावांची भागिदारी केली. शमार जोसेफने शादमान इस्लामला झेलबाद केले. त्याने 82 चेंडूत 7 चौकारांसह 46 धावा केल्या. मेहिदी हसन मिराजने 39 चेंडूत 7 चौकारांसह 42 जमविल्या. शमार जोसेफने त्यालाही बाद केले. लिटन दास ग्रिव्सच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला. त्याने 3 चौकारांसह 25 धावा जमविल्या. जाकेर अली 49 चेंडूत 3 चौकारांसह 29 तर टी. इस्लाम 9 धावांवर खेळत आहे. बांगलादेशने दुसऱ्या डावात 41.4 षटकात 5 बाद 193 धावा जमविल्या होत्या. विंडीजतर्फे शमार जोसेफने 2 तर सील्स, अल्झारी जोसेफ आणि ग्रिव्स यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. चहापानावेळी बांगलादेशने 2 बाद 116 धावा जमविल्या होत्या. खेळाच्या शेवटच्या सत्रात बांगलादेशने 77 धावा जमविताना आणखीन 3 फलंदाज गमविले.
संक्षिप्त धावफलक: बांगलादेश प. डाव 71.5 षटकात सर्वबाद 164, विंडीज प. डाव 65 षटकात सर्वबाद 146 (केसी कार्टी 40, ब्रेथवेट 39, लुईस 12, नाहिद राणा 5-61, हसन मेहमुद 2-19, तस्किन अहमद, टी. इस्लाम आणि मेहिदी हसन मिराज प्रत्येकी 1 बळी), बांगलादेश दु. डाव 41.4 षटकात 5 बाद 193 (शादमान इस्लाम 46, शहादत हुसेन 28, मेहिदी हसन मिराज 42, दास 25, जाकेर अली खेळत आहे 29, टी. इस्लाम खेळत आहे 9, अवांतर 14, शमार जोसेफ 2-70, सील्स, अल्झारी जोसेफ आणि ग्रिव्स प्रत्येकी 1 बळी)