For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकच्या फिरकीसमोर विंडीजचे लोटांगण

11:06 PM Jan 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
पाकच्या फिरकीसमोर विंडीजचे लोटांगण
Advertisement

विंडीजचा 127 धावांनी पराभव : साजिद खान सामनावीर

Advertisement

वृत्तसंस्था/ मुल्तान

दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत रविवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी पाकच्या फिरकी गोलंदाजीसमोर विंडीजने साफ लोटांगण घातले. या सामन्यात 9 गडी बाद करणाऱ्या साजिद खानला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. पाकने ही पहिली कसोटी 127 धावांनी जिंकून मालिकेत आघाडी घेतली आहे.

Advertisement

या कसोटीमध्ये दोन्ही डावात पाकची फिरकी गोलंदाजी प्रभावी आणि यशस्वी ठरली. या सामन्यात पाकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण विंडीजच्या मोती आणि सेल्स यांच्या भेदक गोलंदाजीसमोर पाकची सुरुवातीला स्थिती 4 बाद 64 अशी केविलवाणी झाली होती. त्यानंतर सौद शकील आणि मोहम्मद रिझवान यांनी पाचव्या गड्यासाठी 141 धावांची शतकी भागिदारी केल्याने पाकला पहिल्या डावात 230 धावांपर्यंत मजल मारता आली. शकीलने 6 चौकारांसह 157 चेंडूत 84 तर मोहम्मद रिझवानने 133 चेंडूत 9 चौकारांसह 71 धावा जमविल्या. पाकचे फिरकी गोलंदाज साजिद खान, नौमन अली आणि अब्रार अहमद या फिरकी त्रिकुटासमोर विंडीजचा पहिला डाव 25.2 षटकात 137 धावांत आटोपला. पाकच्या या 3 गोलंदाजांनी 10 गडी बाद केले. विंडीजच्या पहिल्या डावात तळाचे फलंदाज वेरिकेन 24 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 31 तर सेल्सने 13 चेंडूत 3 षटकारांसह 22 आणि मोतीने 25 चेंडूत 19 धावा जमविल्या. पाकने पहिल्या डावात विंडीजवर 93 धावांची आघाडी घेतली होती. पाकच्या साजिद खानने 65 धावांत 4 तर नौमन अलीने 39 धावांत 5 आणि अब्रार अहमदने 6 धावांत 1 गडी बाद केला होता.

93 धावांची आघाडी घेतलेल्या पाकने दुसऱ्या डावाला बऱ्यापैकी सुरुवात केली. कर्णधार शान मसूद आणि मोहम्मद हुरेरा यांनी सलामीच्या गड्यासाठी 67 धावांची भागिदारी केली. हुरेराने 58 चेंडूत 3 चौकारांसह 29 धावा केल्या. तर कर्णधार मसूदने 70 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 52 धावा जमविल्या. पण त्यानंतर विंडीजच्या वेरिकेनसमोर पाकचा दुसरा डाव 46.4 षटकात 157 धावांत आटोपला. वेरिकेनने 32 धावांत 7 तर मोतीने 48 धावांत 1 गडी बाद केला. पाकने विंडीजवर 250 धावांची आघाडी घेत त्यांना विजयासाठी 251 धावांचे आव्हान दिले. पण पुन्हा पाकच्या शिस्तबद्ध आणि अचूक गोलंदाजीसमोर विंडीजचा दुसरा डाव 36.3 षटकात 123 धावांत आटोपला. अथनाजेने एकाकी लढत देत 68 चेंडूत 7 चौकारांसह 55, इमलेचने 1 चौकारासह 14, लुईसने 13, कर्णधार ब्रेथवेटने 2 चौकारांसह 12, सिंक्लेयरने 1 चौकारासह 10 धावा केल्या. पाकतर्फे साजिद खानने 50 धावांत 5 तर अब्रार अहमदने 27 धावांत 4 आणि नौमन अलीने 42 धावांत 1 गडी बाद केला. या सामन्यामध्ये साजिद खानने 115 धावांत 9 गडी बाद केले. आता उभय संघातील दुसरी कसोटीत 25 जानेवारीपासून मुल्तानमध्ये खेळवली जाईल. रविवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी चहापानापूर्वीच पाकने विजय नोंदविला. तिसऱ्या दिवशीच्या खेळामध्ये एकूण 17 गडी बाद झाले. हा सामना गोलंदाजांनी गाजविला.

संक्षिप्त धावफलक - पाक. प. डाव 68.5 षटकात सर्वबाद 330, विंडीज प. डाव 25.2 षटकात सर्वबाद 137, पाक दु. डाव 46.4 षटकात सर्वबाद 157 (शान मसूद 52, हुरेरा 29, कमरान गुलाम 27, सलमान आगा 14, अवांतर 12, वेरिकेन 7-32, मोती 1-48), विंडीज दु. डाव 36.3 षटकात सर्वबाद 123 (अथनाजे 55, ब्रेथवेट 12, लुईस 13, इमलेच 14, सिंक्लेयर 10, साजिद खान 5-50, अब्रार अहमद 4-27, नौमन अली 1-42).

Advertisement
Tags :

.