भारताचा आफ्रिकेवर दणदणीत विजय
तिसऱ्या टी 20 सामन्यात 7 विकेट्सनी मात मालिकेत 2-1 ने आघाडी
वृत्तसंस्था/ धरमशाला
रविवारी झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेट्सनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकन संघ 117 धावांत ऑलआऊट झाला. यानंतर विजयी लक्ष्य भारताने 15.5 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. उभय संघातील चौथा सामना दि. 16 रोजी नागपूर येथे होईल.
दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी दिलेल्या 118 या माफक धावसंख्येचा पाठलाग करताना अभिषेक शर्माने टीम इंडियाला धमाकेदार अंदाजात सुरुवात करून दिली. डावातील पहिल्या चेंडूवर षटकारासह खाते उघडणाऱ्या अभिषेक शर्मानं 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 18 चेंडूत 35 धावांची खेळी केली. शुभमन गिल 28 चेंडू खेळला. पण पुन्हा तो 28 धावांवर अडखळला. सूर्यकुमार यादवने 2 चौकार मारत माहोल निर्माण केला. पण मोठा फटका मारण्याच्या नादात तो एनगिडीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 11 चेंडूत 12 धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या तिलक वर्माने 34 चेंडूत नाबाद 26 धावा केल्या. शिवम दुबेनं षटकार आणि चौकार मारत 16 व्या षटकात मॅच संपवली.
आफ्रिकन संघ 117 धावांत ऑलआऊट
प्रारंभी, नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. दक्षिण आफ्रिकेकडून डी कॉक आणि रिझा हेंड्रिक्स उतरले होते. पण पहिल्याच षटकात हेंड्रिक्सला शून्यावर अर्शदीप सिंगने पायचीत केले. त्यानंतर पुढच्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर डी कॉकला हर्षित राणाने 1 धावेवर पायचीत पकडले. चौथ्या षटकात दक्षिण आफ्रिकेला आणखी एक मोठा धक्का हर्षित राणाने दिला. त्याने धोकादायक डेवाल्ड ब्रेव्हिसला 2 धावांवरच त्रिफळाचीत केले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची अवस्था 3 बाद 7 धावा अशी झाली होती. पण कर्णधार एडन मार्करम आणि ट्रिस्टन स्टब्सने डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यांची जोडी स्थिरावतच असताना स्टब्सला हार्दिक पंड्याने बाद केले. यानंतर इतर तळाच्या फलंदाजीनीही सपशेल निराशा केली. इतर फलंदाज बाद होत असताना मार्करम लढत होता. त्याने अर्धशतकही केले. त्याने 46 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारासह 61 धावांचे योगदान दिले. यामुळे 20 षटकात दक्षिण आफ्रिकेला सर्वबाद 117 धावा करता आल्या.
संक्षिप्त धावफलक :
दक्षिण आफ्रिका 20 षटकांत सर्वबाद 117 (डीकॉक 1, हेंड्रिक्स 0, मार्करम 46 चेंडूत 61, डेवाल्ड ब्रेविस 2, ट्रिस्टन स्टब्ज 9, फेरेरा 20, नोर्तजे 12, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव प्रत्येकी 2 बळी)
भारत 15.5 षटकांत 3 बाद 120 (अभिषेक शर्मा 35, शुभमन गिल 28, तिलक वर्मा नाबाद 26, सूर्यकुमार यादव 12, शिवम दुबे नाबाद 10, एन्गिडी, जॅन्सेन आणि बॉश प्रत्येकी 1 बळी).
हार्दिकचे बळींचे शतक तर वरुणनेही गाठला अर्धशतकी पल्ला
तिसऱ्या टी 20 सामन्यात भारतीय संघाच्या गोलंदाजांनी कमालीची कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेला अवघ्या 117 धावांवर रोखले. हार्दिक पंड्याने एक बळी घेत या सामन्यात आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात शंभर विकेट्सचा पल्ला गाठला. आंतरारष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 100 विकेट्स आणि 1500 धावा करणारा हार्दिक हा पहिला जलदगती अष्टपैलू गोलंदाज ठरला आहे. याशिवाय वरुण चक्रवर्तीने आपल्या फिरकीतील जादू दाखवून देताना आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेट कारकिर्दीत 50 विकेट्स पूर्ण केल्या.