दुसऱ्या वनडेत विंडीजचा पाकवर विजय
डकवर्थ लुईस नियमानुसार पाक पराभूत : विंडीजची मालिकेत 1-1 बरोबरी : रोस्टन चेस सामनावीर
वृत्तसंस्था/त्रिनिदाद
मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान क्रिकेट संघाला रविवारी झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजकडून 5 विकेट्सनी पराभव पत्करावा लागला. त्रिनिदादमधील ब्रायन लारा स्टेडियमवर वेस्ट इंडिज विरुद्ध पाकिस्तान दुसरा एकदिवसीय सामना खेळला गेला. या सामन्यात पावसाने लपंडाव केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 37 षटकांत 7 विकेट गमावून 171 धावा केल्या. पावसामुळे लक्ष्य बदलण्यात आले आणि यजमानांना 35 षटकांत 181 धावांचे लक्ष्य मिळाले. वेस्ट इंडिजने 5 विकेट शिल्लक असताना 33.2 षटकांत ही धावसंख्या गाठली आणि मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. उभय संघातील तिसरा व शेवटचा सामना दि. 12 रोजी होईल.
प्रारंभी, नाणेफेक गमावल्यानंतर आणि प्रथम फलंदाजी केल्यानंतर, पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. 9 व्या षटकात त्यांना सॅम आयुबच्या रूपात पहिला धक्का बसला, त्यानंतर संघाची घसरगुंडी उडाली. अब्दुल्ला शफीक (26), बाबर आझम (0), कर्णधार मोहम्मद रिझवान (16) स्वस्तात बाद झाल्याने पाकची 4 बाद 88 अशी स्थिती झाली होती. या कठीण स्थितीत हुसेन तालतने 4 चौकारासह 31 तर हसन नवाजने 3 षटकारासह नाबाद 36 धावांचे योगदान दिले. सलमान आगा 9 धावा करुन बाद झाला. यामुळे पाकला 37 षटकांत 7 बाद 171 धावापर्यंत मजल मारता आली. वेस्ट इंडिजकडून जेडेन सील्सने 7 षटकांत 23 धावा देत 3 बळी घेतले. शमर जोसेफ, गुडाकेश मोती, रोस्टन चेस, जस्टिन ग्रीव्हज आणि जेदिया ब्लेड्स यांनी 1-1 बळी घेतले.
विंडीजकडून लक्ष्य सहज पार
वेस्ट इंडिजची सुरुवात खूपच खराब झाली आणि चौथ्या षटकात दोन्ही सलामीवीर ब्रँडन किंग (1) आणि एविन लुईस (7) पॅव्हेलियनमध्ये परतले. संघाने 7 षटकांच्या बॅटिंग पॉवरप्लेमध्ये फक्त 22 धावा केल्या. तथापि, यानंतर संघाचा कर्णधार शाय होपने 35 चेंडूत 32 आणि शेरफेन रुदरफोर्डने 33 चेंडूत 45 धावा केल्या. रोस्टन चेसने 47 चेंडूत 49 धावांची नाबाद खेळी केली. त्याने जस्टिन ग्रीव्हजसह संघाला लक्ष्यापर्यंत पोहोचवले. ग्रीव्हज आणि चेसने 72 चेंडूत 77 धावांची नाबाद भागीदारी केली. विंडीजने विजयी लक्ष्य 33.2 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यातच पूर्ण केले. पाककडून हसन अली आणि मोहम्मद नवाज यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
सहा वर्षानंतर विंडीजची पाकवर मात
वेस्ट इंडिजने पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमधील विजयाचा दुष्काळ संपवण्यात यश मिळवले. यजमानांनी 2263 दिवसांच्या दीर्घ अंतरानंतर एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला आहे. 31 मे 2019 रोजी वेस्ट इंडिजने पाकिस्तानविरुद्धचा शेवटचा एकदिवसीय सामना जिंकला, तो विश्वचषक सामना होता.
संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान 37 षटकांत 7 बाद 171 (आयुब 23, शफीक 26, हुसेन तालत 31, हसन नवाज नाबाद 36, सील्स 3 बळी) वेस्ट इंडिज 33.2 षटकांत 5 बाद 184 (केसी कार्टी 16, शाय होप 32, शेरफेन रुदरफोर्ड 45, रोस्टन चेस नाबाद 49, ग्रीव्हज नाबाद 26, हसन अली आणि मोहम्मद नवाज प्रत्येकी 2 बळी).