For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विंडीजचा न्यूझीलंडवर 7 धावांनी विजय

06:36 AM Nov 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
विंडीजचा न्यूझीलंडवर 7 धावांनी विजय
Advertisement

वृत्तसंस्था / ऑकलंड

Advertisement

तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत विंडीजने यजमान न्यूझीलंडचा 7 धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली. विंडीजच्या रॉस्टन चेसला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. त्याने फलंदाजीत 27 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांसह 28 तर गोलंदाजीत 26 धावांत 3 गडी बाद केले.

या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून विंडीजला प्रथम फलंदाजी दिली. विंडीजने 20 षटकात 6 बाद 164 धावा जमविल्या. त्यानंतर न्यूझीलंडने 20 षटकात 9 बाद 157 धावांपर्यंत मजल मारल्यानंतर त्यांना हा सामना 7 धावांनी गमवावा लागला. विंडीज संघाचा न्यूझीलंडवरील हा टी-20 प्रकारातील बऱ्याच दिवसानंतरचा पहिला विजय आहे.

Advertisement

विंडीजच्या डावात कर्णधार शाय हॉपने 39 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांसह 53, पॉवेलने 23 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 33, रॉस्टन चेसने 27 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांसह 28, अथांजेने 9 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 16, किंगने 3, ऑगेस्टीने 2 धावा केल्या. होल्डरने 1 चौकारासह नाबाद 5 तर शेफर्डने 2 चौकारांसह नाबाद 9 धावा जमविल्या. वेंडीजच्या डावात 7 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले. न्यूझीलंडतर्फे डफी आणि फोकेस यांनी प्रत्येकी 2 तर जेमिसन व निश्चाम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. विंडीजने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 32 धावा  जमविताना 2 गडी गमविले. 10 षटकाअखेर विंडीजची स्थिती 3 बाद 66 अशी होती. हॉपने अर्धशतक 38 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांसह पूर्ण केले.

प्रत्युत्तरादाखल खेळताना कर्णधार सँटेनरने एकाकी लढत देत 28 चेंडूत 2 षटकार आणि 8 चौकारांसह नाबाद 55 धावा जमविल्या. सलामीच्या रॉबिनसनने 1 षटकार आणि 4 चौकारांसह 27, रचिन रविंद्रने 19 चेंडूत 2 षटकारांसह 21, मिचेलने 9 चेंडूत 1 षटकारासह 13, निश्चामने 11 चेंडूत 1 षटकारासह 11 धावा जमविल्या. न्यूझीलंडने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 48 धावा जमविताना 1 गडी गमविला. सँटेनरने 26 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. सँटेनर आणि डफी यांनी शेवटच्या गड्यासाठी 20 चेंडूत अर्धशतकी भागिदारी नोंदविली. पण न्यूझीलंडला केवळ 7 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. विंडीजतर्फे जायडेन सेल्सने 32 धावांत 3, चेसने 26 धावांत 3, फोर्ड, शेफर्ड व अकिल हुसेन यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला.

संक्षिप्त धावफलक: विंडीज 20 षटकात 6 बाद 164 (हॉप 53, पॉवेल 33, चेस 28, अथांजे 16, अवांतर 15, डफी, फोकेस प्रत्येकी 2 बळी, जेमिसन व निश्चाम प्रत्येकी 1 बळी), न्यूझीलंड 20 षटकात 9 बाद 157 (सँटेनर नाबाद 55, मिचेल 13, रचिन रविंद्र 21, कॉन्वे 13, रॉबिनसन 27, सेल्स व चेस प्रत्येकी 3 बळी, फोर्ड, शेफर्ड, अकिल हुसेन प्रत्येकी 1 बळी).

Advertisement
Tags :

.