मध्यवर्ती बसस्थानकातील पश्चिम प्रवेशदार बंद
प्रतिनिधी/ बेळगाव
तात्पुरत्या स्वरूपात मध्यवर्ती बसस्थानकात उभारण्यात आलेले पश्चिमेकडील प्रवेशद्वार अखेर बंद करण्यात आले आहे. संरक्षण भिंत बांधून हे प्रवेशद्वार कायमस्वरूपी बंद झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना आता केवळ उत्तरेकडे असलेल्या प्रवेशद्वारानेच ये-जा करावी लागणार आहे.
जुने बसस्थानक हाटवून त्या ठिकाणी सुसज्ज आधुनिक बसस्थानक उभारण्यात आले आहे. 2015-16 साली जुने बसस्थानक हटविण्यात आले. दरम्यान प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी संरक्षण भिंतीचा काही भाग हटवून त्या ठिकाणी तात्पुरत्या प्रवेशद्वाराची व्यवस्था करण्यात आली होती. मागील चार-पाच वर्षापासून या प्रवेशद्वारातूनच बस आणि पादचाऱ्यांची ये-जा सुरू होती. बसस्थानकाचे उद्घाटन झाल्यानंतर पूर्वीप्रमाणे उत्तर दिशेचे प्रवेशद्वार खुले आहे. त्यामुळे या प्रवेशद्वारामार्फत स्थानिक आणि लांब पल्याच्या बसेस ये-जा करीत आहेत. त्याबरोबर पादचारी देखील या प्रवेशद्वारांनेच वर्दळ वाढू लागली आहे.
सद्यस्थितीत मध्यवर्ती बसस्थानकात उत्तर आणि पुर्वेकडच्या बाजूला प्रवेशद्वार आहेत. यापैकी उत्तर दिशेच्या प्रवेशद्वारावरच अधिक ताण आहे. शिवाय प्रवेशद्वारातच रिक्षाचालक प्रवाशांसाठी गर्दी करू लागले आहेत. त्यामुळे वाहतुक व्यवस्थाही विस्कळीत होऊ लागली आहे.