चैतन्यमयी दीपोत्सवाला उत्साहात प्रारंभ
दारोदारी कलात्मक विविध रंगी रांगोळ्या, विद्युत दिव्यांची रोषणाई : बाजारपेठेत मोठी गर्दी
बेळगाव : पहाटेच्या आल्हाददायी वातावरणामध्ये पणत्या आणि टांगलेल्या आकाश कंदीलामधून पाझरणारा प्रकाश, दारोदारी रेखाटलेल्या कलात्मक अशा विविधरंगी रांगोळ्या, विद्युत दिव्यांची रोषणाई अशा पार्श्वभूमीवर चैतन्यपूर्ण अशा दीपोत्सवाला प्रारंभ झाला. या उत्सवामुळे संपूर्ण शहरामध्ये मांगल्याचे आणि तितकेच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नरक चतुर्दशी म्हणजे अभ्यंगस्नान करण्याचा दिवस. दिवाळीच्या निमित्ताने आवर्जून खरेदी केलेले उटणे, सुगंधी तेल आणि सुवासिक साबणाने अभ्यंगस्नान पार पडले. कारीटही चिरडले गेले. त्याची कडू चव अर्थातच खमंग अशा फराळाने दूर केली. मुलांनी फटाके लावण्याचा आनंद घेतला. यंदा नेहमीपेक्षा तयार फराळांना अधिक मागणी होती.
गृहोद्योग स्वरुपात फराळाची ऑर्डर घेण्यात आली होती. तसेच तयार फराळाचे स्टॉलही मांडलेले पाहायला मिळाले. या तयार फराळामुळे नोकरदार महिलांची सोय झाली. फराळानंतर बहुसंख्य कुटुंबातील मंडळी खरेदीसाठी बाहेर पडली. खरेदीप्रमाणेच शुभेच्छा देण्यासाठीही परस्परांच्या घरी ये-जा सुरू होती. तसेच फराळांच्या ताटांचीही देवाण-घेवाण झाली. शनिवारी पाडवा व नंतर भाऊबीज असल्याने अनेकांची पावले बाजारपेठेकडे वळाली. वस्त्रप्रावरणे, सराफी पेढ्या, शोरुम्स, मोबाईल विक्रीच्या शोरुम्स येथे दिवसभर गर्दीचा ओघ सुरू होता. याशिवाय दुचाकी, चारचाकी गाड्यांचे बुकिंग तेजीत सुरू होते. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानांतही गर्दी होतीच. दरम्यान वेगवेगळ्या कंपन्यांच्या ऑफर लक्षात घेऊन अनेकांनी ऑनलाईन स्वरुपातही भेटवस्तू घेण्याचा कलही दिसून आला.