न्यायला आले भाजी अन् गमावले मोबाईल
सातारा :
शहरातील सेव्हन स्टार समोरील शेतकरी भाजी मंडई व तहसिलदार ऑफिस समोरील रविवार पेठ भाजी मंडईतून रविवारी 17 जणांचे मोबाईल फोन चोरीला गेले आहेत. यामुळे विक्रेत्यांच्यात व ग्राहकांच्या एकच खळबळ उडाली. याच दिवशी मोबाईल फोन चोरीला गेलेले संतोष ओव्हाळ यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने सकाळपासून शेतकरी भाजी मंडई व रविवार पेठ भाजी मंडई खरेदीला ग्राहकांनी गर्दी केली होती. या गर्दीत अज्ञात चोरट्याने कधी शिरकाव केला हे कोणालाच कळले नाही. भाजी खरेदी करण्याच्या गडबडीत अनेकांनी आपला मोबाईल फोन खिशात ठेवला होता. यांचा फायदा घेत चोरट्याने मोबाईल फोन चोरी करायला सुरूवात केली. अवघ्या काही तासात दोन्ही भाजी मंडईतून 17 जणांचे मोबाईल फोन चोरीला गेले. भाजी खरेदी करून पुन्हा घरी जाताना या ग्राहकांनी खिशात हात घालून मोबाईल फोन बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तर मोबाईल फोन नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पुन्हा भाजी मंडईत जावून फोन कुठे पडला का? याची पाहणी केली. परंतु फोन नसल्याचे लक्षात आले. असाच प्रकार इतरही ग्राहकांबरोबर घडल्याने सर्वांनाच धक्का बसला. सगळे आपला मोबाईल फोन आहे का याची खात्री करू लागले. यामुळे भितीचे वातावरण पसरले. दिवसभर मोबाईल चोरीच्या घटनांची चर्चा सर्वत्र होती.
- मागेही घडल्यात घटना
शेतकरी व रविवार पेठ भाजी मंडईतून या आधीही मोबाईल फोन चोरीला जाण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यावेळी पोलिसांनी साध्या वेशात पेट्रोलिंग करावे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे अशा मागण्या करण्यात आल्या. परंतु एक आठवडा पोलिसांनी पेट्रोलिंग केले. नंतर चोरीच्या घटना कमी होताच पेट्रोलिंग बंद झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. यामुळे ही बाब चोरट्यांच्या लक्षात येताच त्यांनी पुन्हा मोबाईल चोरी करण्यास सुरूवात केली.
- तात्काळ दखल घेतली नाही
रविवारी शेतकरी भाजी मंडईतून दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास माझा आयफोन चोरीला गेला. याची तक्रार करण्यासाठी मी 1 वाजता सातारा शहर पोलीस ठाण्यात गेले. पोलिसांना मी आयफोन चोरीला गेल्याचे सांगितले. परंतु त्यांनी दखल न घेता पावती आणा, तक्रार अर्ज द्या, अशा कागदपत्रांची मागणी करायला सुरूवात करत संध्याकाळचे पाच वाजवले. त्यानंतर तक्रार दाखल करून घेतली. पोलीस दलाकडे यंत्रणा असताना त्यांनी फोन ट्रॅक केला असता तर आयफोनसह चोरही सापडला असता.
संतोष वसंत ओव्हाळ रा. कृष्णानगर, सातारा