Kolhapur Crime : यड्रावमध्ये मोठी कारवाई; 53 लाख 74 हजार रुपयांचे सोने जेरबंद
शहापूर पोलीसांच्या कारवाईत दोन अट्टल चोरटे अटक
यड्राव : शहापूर पोलिसांना चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे व सीसीटीव्ही फुटेज आधारे दोघा अट्टल चोरट्यांना सापळा रचून जेरबंद केले. प्रल्हाद विठ्ठल कवठेकर (वय ३० रा. संगमनगर तारदाळ) व उदय श्रीकांत माने (वय २९ रा. बेगर वसाहत यड्राव) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून शहापूर, कुरुंदवाड, हातकणंगले व सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील आठ गुन्ह्यातील तब्बल ५३ लाख ७४ हजार रुपयाचे ४३ तोळे ७०० मिली ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले. जिल्ह्यातील ही आतापर्यंतची मोठी कारवाई आहे याबाबतची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषद देण्यात आली.
गुन्हे शोध पथकातील कर्मचारी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की दोन इसम है चोरीच्या गुन्ह्यातील सोने विक्री प्रल्हाद कवठेकर उदय माने करण्यासाठी यड्राव येथे येणार आहेत. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने गुन्हे शोध पथकाने सापळा रचून या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतलेली असता त्यांना सोने मिळून आले. याबाबत चौकशी केली असता या दोघांनी उडवा उडवीची उत्तरे दिली.
त्यानंतर या दोघांना पोलीस ठाण्यामध्ये आणून चौकशी केली असता तारदाळमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून अधिक चौकशी केली असता शहापूर पोलीस ठाणे हद्दीतील तीन, हातकणंगले पोलीस ठाणे हद्दीतील तीन, कुरुंदवाड पोलीस ठाणे हद्दीतील एक व सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील एक अशा आठ ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ५३ लाख ७४ हजार रुपयाचे ४३ तोळे सोने हस्तगत करण्यात आले.
सदरची ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर, अविनाश मुंगसे, रोहित ढवळे, शशिकांत ढोणे, आयुब गडकरी, अर्जुन फातले, सतीश कुंभार व रवी महाजन यांच्या पथकाने केली. या गुन्ह्यातील आरोपी प्रल्हाद कवठेकर व उदय माने हे अट्टल चोरटे असून त्यांच्यावर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पोलीस ठाणे मध्ये मोटरसायकल चोरी, मोबाईल चोरी, घरफोडी चे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याबरोबर यामध्ये त्यांचे इतरही अनेक सहकारी सामील असून त्यांचे मोठे रॅकेट आहे.