शहर हेस्कॉमच्या दिमतीला सुसज्ज कार्यालय
उद्या उद्घाटन, प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र केबिन : विजेसंदर्भातील कामे योग्य होण्यास मदत
बेळगाव : हेस्कॉमच्या शहर विभागातील अर्बन डिव्हिजन ऑफिसचे उद्घाटन रविवार दि. 30 रोजी होणार आहे. बेळगाव शहराला हेस्कॉमचे सुसज्ज कार्यालय मिळणार आहे. प्रत्येक विभागवार स्वतंत्र केबिन देण्यात आली असून, यापुढे विजेसंदर्भातील कामे योग्यरित्या होण्यास मदत होणार आहे. नेहरुनगर केएलई रोड येथे हेस्कॉमच्या अर्बन डिव्हिजनचे कार्यालय होत आहे. परंतु हे कार्यालय केपीटीसीएलच्या जागेमध्ये असल्यामुळे महिन्याला भाडे द्यावे लागत होते. तसेच इमारतही जीर्ण झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना काम करताना अडचणी येत होत्या.
याची दखल घेऊन हेस्कॉमच्या सिव्हील विभागाकडून मागील दोन वर्षांपासून सुसज्ज कार्यालयाचे बांधकाम सुरू होते. अखेर नोव्हेंबर महिन्यात हे काम पूर्ण झाले. दोन मजली इमारत असून, यामध्ये टेक्निकल, अकौंटंट, ऑडिट व सिव्हील असे चार विभाग कार्यरत राहणार आहेत. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी लिफ्टची व्यवस्थाही करण्यात आली आहे. शहरातील मनपाचे 58 वॉर्ड व कॉन्टोन्मेंटचे 7 वॉर्डाचे सर्व महत्त्वाचे विजेसंदर्भातील काम याच कार्यालयातून होणार आहे. रविवारी कार्यालयाचे उदघाटन होणार असून, यावेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच हेस्कॉम व केपीटीसीएलचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
ग्राहकांना उत्तम सेवा देणार
हेस्कॉमच्या शहर विभागाचे मुख्य कार्यालय नेहरुनगर येथे होते. या कार्यालयाच्या परिसरातच नवीन कार्यालय उभारण्यात आले आहे. रविवार दि. 30 रोजी या सुसज्ज कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. हेस्कॉमचा कारभार सुसूत्र व्हावा तसेच ग्राहकांना उत्तम सेवा मिळाव्यात यासाठी हे कार्यालय उभारण्यात आले आहे.
- मनोहर सुतार, (हेस्कॉमचे शहर कार्यकारी अभियंता)
