For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंत्रघोषात पंतप्रधान मोदी यांचे स्वागत

06:55 AM Nov 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
मंत्रघोषात पंतप्रधान मोदी यांचे स्वागत
Advertisement

जी-20 शिखर परिषदेशाठी ब्राझील दौरा, भारतीय वंशाच्या नागरिकांकडून भव्य सत्कार

Advertisement

वृत्तसंस्था / रिओ-डी-जानेरो

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ब्राझील देशात भव्य स्वागत करण्यात आले आहे. ते जी-20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी ब्राझीलला गेले आहेत. गेल्यावर्षी या परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे होते. ब्राझीलमधील भारतीय वंशाच्या नागरीकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संस्कृत वेदमंत्रांच्या घोषात स्वागत केले. त्यांच्यासाठी या नागरीकांनी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यांचे ब्राझीलची राजधानी रिओ-डी-जानेरो येथे आगमन झाल्यानंतर ब्राझील प्रशासनाच्या वतीनेही त्यांचे स्वागत करण्यात आले, अशी माहिती देण्यात आली आहे.

Advertisement

‘भारतीय संस्कृतीचा ब्राझीलमधील आविष्कार पाहून मला आनंद झाला आहे. येथील भारतीय वंशाच्या नागरीकांचा मी या भव्य स्वागतासाठी आभारी आहे,’ अशा शब्दांमध्ये त्यांनी आपल्या भावना ‘एक्स’ वरुन व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला नायजेरियाचा दौरा करुन सोमवारी ब्राझीलला पोहचले. नायजेरियात त्यांना त्या देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. नायजेरियाच्या अध्यक्षांसह त्यांनी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली.

भारतीय समुदायाला आनंद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी आम्ही उत्सुक होतो. ते येथे आल्याने आणि आमच्यात सहभागी झाल्याने आम्हाला अतियश आनंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया या विशेष कार्यक्रमाच्या आयोजकांनी आणि कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या नागरीकांनी व्यक्त केली. त्यांच्या स्वागतासाठी संगीत, नृत्य आदी कलांचे कार्यक्रमही ब्राझीलमधील भारतीय वंशाच्या लोकांनी सादर केले. हा कार्यक्रम साधारणत: तीन तास चालला होता. विदेशस्थ भारतीय नागरीकांचे आपल्यावरील प्रेम पाहून माझ्या भावना उचंबळून आल्या, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. ब्राझीलमधील भारतीय वंशाच्या नागरीकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

ब्राझीलमध्ये भरगच्च कार्यक्रम

ब्राझीलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अनेक कार्यक्रम आहेत. सोमवारपासून प्रारंभ होणाऱ्या जी-20 शिखर परिषदेत ते सहभागी होतील. या परिषदेचा मुख्य कार्यक्रम आज मंगळवारी आहे. या परिषदेत चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि अमेरिकेचे मावळते अध्यक्ष जोसेफ बायडेनही समाविष्ट होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्षी जिनपिंग यांची भेट आणि चर्चा होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काही काळापूर्वी रशियात या दोन्ही नेत्यांची प्रत्यक्ष चर्चा झाली होती. त्याआधी लडाख येथील सीमेवरील तणाव निवळण्यासाठी दोन्ही देशांमध्ये करारही करण्यात आला होता. हेच संबंध अधिक दृढ करण्यासाठी दोन्ही नेत्यांची ब्राझीलमधील जी-20 परिषदेच्या निमित्ताने पुन्हा भेट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, तशी कोणतीही अधिकृतरित्या घोषणा भारत किंवा चीनच्या वतीने करण्यात आलेली नाही. त्यामुळे भेटीसंबंधी निश्चितता नाही.

ब्राझीलच्या अध्यक्षतेत परिषद

जी-20 परिषदेचे अध्यक्षपद भारतानंतर ब्राझीलला मिळाले आहे. भारताच्या पावलावर पाऊल टाकून ब्राझीलनेही ही परिषद पुढे नेली आहे. ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भवितव्य’ हा मंत्र या परिषदेला भारताने दिला होता. ब्राझीलमधील परिषदेतही याच सूत्राच्या आधारे अर्थपूर्ण निर्णय घेतले जातील. या परिषदेच्या निमित्ताने अन्य देशांच्या नेत्यांशी चर्चा होतील, असे प्रतिपादन त्यांनी केले. भारताच्या अध्यक्षतेत झालेल्या जी-20 परिषदेत आफ्रिकन देशांच्या संघटनेला प्रवेश देण्याचा महत्वाचा निर्णय झाला होता. तसेच रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाच्या प्रश्नावरुन परिषदेत फूट पडण्याची शक्यता भारताच्या कूटनैतिक प्रयत्नांमुळे मावळली होती. या पार्श्वभूमीवर आता ब्राझीलमध्ये ही परिषद होत असून या परिषदेत कोणते निर्णय होतात, याकडे उत्सुकतेने पाहिले जात आहे.

गयानाचाही दौरा करणार

जी-20 शिखर परिषदेच्या कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद मोदी गयानाचा दौरा करणार आहेत. ते गयानात 19 आणि 20 नोव्हेंबर असे दोन दिवस असतील. गयानाला भेट देणारे ते भारताचे गेल्या 50 वर्षांमधील प्रथमच सर्वोच्च नेते ठरतील. गयानाकडून त्यांना त्या देशाच्या भेटीचे विशेष आमंत्रण देण्यात आले आहे. या देशाशी दृढ द्विपक्षीय संबंध स्थापन करण्याची भारताची इच्छा आहे.

Advertisement
Tags :

.