महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जल्लोष अन् जयघोषात गणरायाचे स्वागत!

06:58 AM Sep 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगावसह संपूर्ण परिसरात एक चैतन्यमय वातावरण :  पारंपरिक पेहरावांसह सनई-चौघड्यांचा सूर

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

सळसळत्या उत्साहात आणि चैतन्यपूर्ण वातावरणात लाडक्या गणरायाचे शनिवारी मोठ्या थाटात व वाजतगाजत आगमन झाले. बेळगाव शहरासह उपनगरांमध्ये गणरायाच्या आगमनाचा उत्साह दिसून आला. सनई-चौघड्यांच्या सुरात भगव्या टोप्या, शेले, कुर्ते, नऊवारी साड्या अशा पारंपरिक पेहरावात गणरायाच्या आगमनाच्या मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. घरोघरी व सार्वजनिक श्रीमूर्ती मंडपात आल्याने बेळगावसह संपूर्ण परिसरात एक चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे.

मागील काही दिवसांपासून आस लागलेल्या गणरायाचे शनिवारी अखेर आगमन झाले. गणरायाच्या आगमनासाठी घरोघरी जय्यत तयारी करण्यात आली होती. गणरायासाठी सुंदर अशी आरास करण्यासाठी मागील अनेक दिवसांपासून तरुण मंडळी मेहनत घेत होती. गणेशोत्सवासाठी बाजारपेठेतही कपड्यांसह सजावटीचे अनेक साहित्य दाखल झाले होते. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होती.

वाहनांमधून गणेशमूर्ती आणण्यासाठी गर्दी

काही वर्षांपूर्वीपर्यंत डोक्यावरून अथवा हातावरूनच गणेशमूर्ती मूर्तीशाळेपासून घरापर्यंत आणल्या जात होत्या. परंतु, आता घरगुती गणेशमूर्तींचीही उंची वाढल्याने वाहनांचा वापर वाढला आहे. दुचाकी, चारचाकी, रिक्षा, मालवाहक रिक्षा तसेच हातगाड्यांवरूनही गणेशमूर्ती आणण्यासाठी रस्त्यांवर गर्दी झाली होती. त्यामुळे यावर्षी डोक्यावरून गणेशमूर्ती आणणाऱ्यांची संख्या अत्यल्प दिसून आली. परंतु, यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात तसेच एसपीएम रोडवर बराच काळ वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले.

पारंपरिक वाद्यांनाच पसंती

सध्या डीजेचे फॅड असले तरी बेळगावमध्ये अद्यापही पारंपरिक वाद्यांच्या सुरातच गणरायाचे आगमन होते. यावर्षीही सनई व बँडच्या सुरांवर आपल्या लाडक्या गणरायाला घरापर्यंत आणण्यात आले. कपिलेश्वर मंदिर परिसर, शहापूर, वडगाव तसेच शहराच्या मध्यवर्ती भागात वादक मंडळी दिसून येत होती. हजार रुपयांपासून पुढे घराच्या अंतरावर अवलंबून वादकांचे दर ठरलेले होते. दर कितीही असले तरी गणरायाला वाजतगाजतच घरी आणण्यासाठी गणेशभक्त उत्सुक होते.

मूर्तीशाळांमध्ये सकाळपासूनच रांगा

मूर्ती बनवण्याचे काम शेवटच्या क्षणापर्यंत सुरूच होते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येपासून पहाटेपर्यंत गणेशमूर्तींवर शेवटचा हात फिरवण्याचे काम मूर्तीकार करत होते. गर्दी टाळण्यासाठी काही भाविकांनी शुक्रवारी रात्रीच गणेशमूर्ती घरी घेऊन जाणे पसंत केले. काहींनी मात्र सकाळी 6 वाजल्यापासून मूर्तीशाळांसमोर रांगा लावल्या होत्या. ज्या ठिकाणी गणेशमूर्तींची संख्या अधिक आहे, अशा ठिकाणी बांबू बांधून गणेशभक्तांची सोय करण्यात आली होती. गणेशमूर्ती भक्तांकडे देण्यापर्यंत मूर्तीकारांची दमछाक होत होती.

गणेशमूर्तींच्या प्रतिष्ठापनेसाठी पुरोहित महत्त्वाचे असतात. त्याचबरोबर काही गणेशभक्तांनी गणेशाच्या आगमनादिवशीच सत्यनारायण व इतर पूजांचेही आयोजन केल्याने पुरोहितांची कमतरता भासत होती. एका घरची पूजा संपवून दुसऱ्या घरात पोहोचेपर्यंत पुरोहितांची दमछाक झाली. सायंकाळपर्यंत भाविकांच्या सोयीनुसार पूजा सुरूच होत्या. काही भाविकांना पुरोहित शोधण्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागले.

सार्वजनिक गणेशमूर्तींचे उत्साहात आगमन

घरगुती गणेशमूर्तींसोबतच सार्वजनिक गणेशमूर्तींचेही मोठ्या थाटात आगमन झाले. गर्दीमध्ये होणारी गैरसोय टाळण्यासाठी अनेक मंडळांनी यापूर्वीच गणेशमूर्ती मंडपात आणून ठेवल्या आहेत. अशा मंडळांनी शनिवारी मुहूर्तावर गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली. उर्वरित मंडळांनी मात्र शनिवारी दुपारनंतर गणेशमूर्ती आणण्यासाठी तयारी सुरू केली होती. ढोलताशा व पारंपरिक वाद्यांच्या गजरात सार्वजनिक गणेशमूर्तींच्या मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article