दीड दिवसांच्या गणरायाला निरोप
विसर्जन तलावांवर गणेशभक्तांची गर्दी : कपिलेश्वर तलावावर दिव्यांची सोय नसल्याने नाराजी
बेळगाव : गणरायाची मनोभावे आराधना केल्यानंतर रविवारी दुपारनंतर जड अंतकरणाने दीड दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यात आला. सायंकाळी 6 नंतर बेळगावच्या विसर्जन तलावांवर विसर्जनासाठी गर्दी झाली होती. फटाक्यांच्या आतषबाजीत व वाजत गाजत मिरवणुका काढून विसर्जन करण्यात आले. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशी आर्त हाक देत गणेश भक्तांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला. पारंपरिक पद्धतीने अनेक कुटुंबांकडून दीड दिवसांच्या गणरायाला निरोप दिला जातो. त्यानुसार दीड दिवसाच्या विसर्जनासाठी महानगरपालिकेने विसर्जन तलाव स्वच्छ केले होते. कपिलेश्वर, जक्कीनहोंडसह अनगोळ, जुने बेळगाव, किल्ला तलाव येथेही दीड दिवसांच्या गणरायांचे विसर्जन झाले. बेळगावमधील बरेच नागरिक इतर शहरांमध्ये नोकरी व्यवसायनिमित्त असल्याने दीड दिवसांच्या गणरायाला निरोप देऊन हे नागरिक पुन्हा आपापल्या गावी परतले.
रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणूक
मोदक तसेच इतर गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवून गणरायाला निरोप देण्यात आला. निर्माल्यासाठी कुंड उभे करण्यात आले होते. त्याचबरोबर महापालिकेचे कर्मचारीही विसर्जन तलावांवर लक्ष ठेवून होते. डीजे तालावर फटाक्यांची आतषबाजी करत रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणूक काढण्यात येत होती.
विसर्जनामध्ये पावसाचा व्यत्यय
रविवारी दुपारपासून शहरासह उपनगरांमध्ये रिमझिम पाऊस सुरू झाला. यामुळे दीड दिवसाच्या गणेशमूर्तींचे विसर्जन उशिराने सुरू झाले. दरवर्षी दुपारी 4 वाजल्यापासून विसर्जनाला सुरुवात होत होती. परंतु यावर्षी मात्र सायंकाळी 6 वाजताही विसर्जन तलावांवर मोजकेच गणेश भक्त दिसून येत होते. पाऊस काहीसा थांबल्यानंतर सायंकाळी 7 नंतर विसर्जनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. जक्कीनहोंड व कपिलेश्वर तलावात अधिकाधिक गर्दी दिसून आली.
काळोखातच विसर्जन
रविवारी दीड दिवसांच्या गणपतीचे कपिलेश्वर तलावात विसर्जन केले. मात्र, प्रशासनाकडून दीड दिवसाच्या विसर्जनासाठी कसलीच व्यवस्था करण्यात आली नव्हती. कपिलेश्वर तलावावर विसर्जनासाठी प्रखर दिव्यांची व्यवस्था नव्हती. त्यामुळे उड्डाणपुलावरील पथदीपांच्या उजेडात विसर्जन करावे लागले. याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत होती. यापुढील विसर्जनासाठी तरी प्रशासनाने कपिलेश्वर तलावावर व्यवस्था करण्याची मागणी केली जात आहे.