आठवडय़ाचा अवधी, कोणाला मिळणार संधी!
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बेंगळूर दौऱयानंतर भाजपमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. बसवराज बोम्माई मंत्रिमंडळातील कोणाचे मंत्रिपद धोक्मयात येणार, कोणाला मंत्रिपदाची संधी मिळणार? याचे आडाखे बांधले जात आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या विदेश दौऱयावर आहेत. ते भारतात परतल्यानंतर कर्नाटकात मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा पुनर्रचना होणार आहे. अमित शहा यांच्या दौऱयावेळीच सूत्रांनुसार सर्व मंत्री राजीनामे देणार, असा बोलवा होता. कोअर कमिटी बैठक आणि भाजप नेत्यांशी अमित शहा चर्चा करणार होते. ही चर्चा झाली नाही. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या मेजवानीत अमित शहांनी भाग घेतला होता. ‘तुम्ही केवळ प्रशासन सांभाळा, राजकारण आम्ही सांभाळू’, असा सल्ला देतानाच अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांकडे काही मंत्र्यांच्या कार्यपद्धतीविषयी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचा दौरा ठरला तेव्हापासूनच भाजपमधील नेत्यांची धावपळ वाढली होती. आता ते बेंगळूर दौरा आटोपून दिल्लीला परतले आहेत. 10 मे नंतर कर्नाटकातील राजकीय घडामोडी पुन्हा वेग पकडणार आहेत.
केंद्रीय गृहमंत्र्यांच्या कर्नाटक दौऱयापूर्वी भाजपचे राष्ट्रीय संघटना सचिव बी. एल. संतोष यांनी म्हैसूरमधील एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे पक्षांतर्गत अस्वस्थता वाढली होती. भाजपची पुढील वाटचाल कशी असणार, आगामी निवडणुकीला सामोरे जाताना पक्षाची व्यूहरचना कशी असणार, नव्यांना संधी मिळणार की जुन्या चेहऱयांनाच पुढे करणार? याचा त्यांनी उलगडा केला होता. कर्नाटकातील पक्षाचे नेतृत्व आणि आगामी निवडणुकीत उमेदवारी कोणाला मिळणार? याचा विचारविनिमय करताना त्यांनी सारे पत्ते उघड केले होते. बदलत्या काळानुरुप बदल हा आवश्यक आहे. बदल झाला नाही तर विनाश निश्चित आहे. वारंवार नेतृत्वबदल करणे हीच भाजपची खरी ताकद आहे, असे सांगत कर्नाटकात नेतृत्वबदल होणार, याचे सूतोवाच त्यांनी केले. त्यामुळे कर्नाटकात नेतृत्वबदल होणार का? अशी चर्चा सुरू झाली. जे आमदार, खासदार सर्वसामान्यांच्या समस्यांचे निराकरण करत नाहीत, त्यांना उमेदवारी मिळणार नाही. ही चर्चा तशी जुनीच आहे. तेच बी. एल. संतोष यांनी सुचवले आहे.
गुजरात आणि नवी दिल्ली येथे पक्षाने सलग दोन वेळा विजयी झालेल्या उमेदवारांना तिकीट दिले नाही. तरी गुजरातमध्ये आणि दिल्लीतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पकड भाजपचीच राहिली. भाजपची उमेदवारी मिळालेल्या नव्या चेहऱयांनाही मतदारांनी संधी दिली. हीच भाजपची खरी ताकद आहे. व्यक्तीपेक्षा पक्ष श्रे÷ आहे. ज्या पक्षात बदल होत नाही, त्या पक्षाचा सर्वनाश अटळ आहे, म्हणून बदलत्या काळानुरुप भाजपने बदल स्वीकारला आहे. स्वतःमध्ये वेळोवेळी बदल घडवून आणले आहेत. म्हणून या सत्तासंघर्षात आपला पक्ष मजबूतपणे उभा आहे. काँग्रेस बदलला नाही. काँग्रेसमधील युवानेते कोण आहेत? तर सोनिया गांधी, सिद्धरामय्या, मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मुलांवर युवानेतृत्वाची धुरा सोपविली गेली आहे. भाजपमध्ये अशी उदाहरणे फार कमी आहेत. येथे कार्यकर्त्यांना नेते होण्याची संधी आहे, असे सांगतानाच घराणेशाहीच्या राजकारणाला थारा देणार नाही, हे स्पष्ट करून आपल्या मुलांना राजकारणात उतरविण्याचे स्वप्न पाहणाऱया अनेक नेत्यांना बी. एल. संतोष यांनी धक्काच दिला आहे.
बी. एल. संतोष यांच्या या वक्तव्यानंतर कर्नाटकात नेतृत्वबदल होणार, मुरुगेश निराणी, सी. सी. पाटील, अरविंद बेल्लद यापैकी एखाद्या नेत्याला मुख्यमंत्रीपद मिळणार, किमान सात-आठ मंत्र्यांना वगळून दहा नव्या चेहऱयांना संधी देणार, अशी चर्चा सुरू झाली होती. अमित शहा यांच्या कर्नाटक दौऱयानंतर पक्षाचे प्रभारी अरुण सिंग, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, प्रदेशाध्यक्ष नळिनकुमार कटिल आदींनी मंत्रिमंडळ विस्तार किंवा पुनर्रचना होणार आहे, मात्र बसवराज बोम्माई यांच्या नेतृत्वात बदल होणार नाही, हे ठासून सांगितले आहे. येडियुराप्पांच्या वेळीही शेवटच्या क्षणापर्यंत पक्षाचे नेते येडियुराप्पा हेच मुख्यमंत्री पदावर राहतील, असे वारंवार सांगत होते. तरीही त्यांना पायउतार व्हावे लागले होते. अमित शहा यांचा कर्नाटक दौरा, बी. एल. संतोष यांचे सूचक वक्तव्य लक्षात घेता कर्नाटकात नवे राजकीय प्रयोग करण्याची तयारी भाजपने ठेवली आहे, हे स्पष्ट होते. एकापाठोपाठ एक उघडकीस येत असलेले घोटाळे, सरकारवर कंत्राटदारांनी केलेला 40 टक्के कमिशनचा आरोप, पोलीस उपनिरीक्षक परीक्षेतील गैरव्यवहार आदींमुळे सरकारची प्रतिमा डागाळण्याचा धोका निर्माण झाला आहे. कंत्राटदाराच्या आत्महत्येनंतर के. एस. ईश्वराप्पा यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता पोलीस उपनिरीक्षक परीक्षेतील गैरव्यवहारात आणखी एक मंत्री डॉ. सी. एन. अश्वत्थनारायण यांच्यावर काँग्रेस नेत्यांनी गंभीर आरोप केला आहे.
अमित शहा बेंगळूरला येताना जे वातावरण कर्नाटकात होते ते दिल्लीला परतल्यानंतर राहिले नाही. त्यांच्या या कर्नाटकात दौऱयात आगामी नेतृत्व, मंत्रिमंडळ विस्तार आदींवर चर्चा होणार, ठोस निर्णय होणार, अशी अटकळ होती. मात्र, मिशन-150 साठी ठोस मार्गदर्शन करण्याआधीच त्यांनी दिल्ली गाठली आहे. त्यामुळे आधीच गोंधळात असलेल्या कर्नाटकातील नेत्यांच्या मनातील गोंधळात भरच पडली आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परतीची प्रतीक्षा लागून राहिली आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरे जाणार, असा संदेश अमित शहा यांनी दिला आहे. यावरून कर्नाटकात सार्वत्रिक निवडणुका एक वर्षावर असताना नेतृत्वबदल होणार नाही, अशी अटकळ बांधली जात असली तरी माजी केंद्रीय मंत्री व विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी 10 मे नंतर कर्नाटकात मुख्यमंत्री बदलणार, असा दावा केला आहे. त्यामुळे संभ्रमात भरच पडली आहे. हा संभ्रम आठवडाभरात दूर होणार आहे.