ग्रीसमध्ये मंगळवारी होत नाही विवाह
प्रथेमागील कारण अत्यंत अजब
विवाह प्रत्येक समाजात केवळ दोन व्यक्तींचे नव्हे तर दोन परिवारांचे पवित्र मिलन असते. प्रत्येक देश, संस्कृतीत विवाहावरून वेगवेगळ्या प्रथा-परंपरा पार पाडल्या जात असतात. भारतात शुभ मुहूर्त पाहून विवाहाची तारीख निश्चित केली जाते. तर एका युरोपीय देशात प्रथेमुळे मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी विवाह करण्यास सक्त मनाई आहे.
ग्रीसमध्ये शतकांपेक्षा जुन्या प्रथेमुळे मंगळवार आणि शुक्रवारी विवाह करणे अशुभ मानले जाते. ग्रीसमध्ये मंगळवार अशुभ दिवस मानला जातो, कारण या दिवशी 1453 साली कॉन्स्टँटिनोपलवर हल्ला झाला होता आणि बीजान्टिन साम्राज्याचे पतन झाले होते. ग्रीसमध्ये या दिवशी विवाह केल्यास माणसाच्या आयुष्यात मोठे वादळ येऊ शकते, असे मानले जाते. तर ख्रिश्चन मान्यतेनुसार ग्रीसमध्ये शुक्रवारी देखील विवाह करणे टाळतात.
सद्यकाळात अनेक जुन्या प्रथांचे पालन अनेक देशांमध्ये केले जात नाही. परंतु ग्रीसमध्ये पारंपरिक प्रथा आणि धार्मिक भावनांचा अद्याप मोठा प्रभाव आहे. तेथील अनेक ग्रामीण भागांमध्ये लोक अद्याप विवाहाची तारीख निश्चित करताना मंगळवार अन् शुक्रवार वगळून अन्य दिवस निवडतात. ग्रीसमध्ये विवाहासाठी सर्वात शुभ दिन शनिवार आणि रविवार असतो.