पाकिस्तानात शिकवणार गीता, महाभारत
‘लाहोर युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस’ या विद्यापीठाचा निर्णय
वृत्तसंस्था / इस्लामाबाद
पाकिस्तानातील एका विद्यापीठाने संस्कृत भाषा, हिंदूंचा धर्मग्रंथ भगवद्गीता आणि महाभारत यांचा समावेत आपल्या अभ्यासक्रमात केला आहे. या विषयांचे शिक्षण या विद्यापीठात दिले जाणार आहे. ‘लाहोर युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस’ असे या विद्यापीठाचे नाव आहे. 1947 मध्ये भारताची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर प्रथम पाकिस्तानच्या भूमीवर संस्कृत आणि इतर आद्य संस्कृत ग्रंथांचे शिक्षण अधिकृतरित्या दिले जाणार आहे. पाकिस्तानचे लोकही पारंपरिकरित्या संस्कृत आणि संस्कृत ग्रंथांशी जोडले गेले आहेत. हा आमचाही ज्ञान वारसा आहे. त्यामुळे आम्ही या शिक्षणाचे पाकिस्तानमध्ये पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला आहे, असे प्रतिपादन या विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी केले.
हे विषयांचे अध्यापन करण्यासाठी डॉ. अली उस्मान काझमी आणि डॉ. शहीद रशीद या प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे दोन्ही प्राध्यापक संस्कृतचे तज्ञ आहेत. या प्रकल्पाचे नेतृत्व त्यांच्याकडे देण्यात आले आहे. विविध समाजांमध्ये सांस्कृतिक सेतू निर्माण करण्यासाठी विविध शास्त्रीय आणि प्राचीन भाषांचे शिक्षण आवश्यक आहे. संस्कृत ही पुरातन आणि शास्त्रीय भाषा आहे. ही पाकिस्तानचीही पुरातन आणि पारंपरिक भाषा आहे, हे आपल्याला समजणे आवश्यक आहे. त्यामुळे हा मोठा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. संस्कृत आणि प्राचीन संस्कृत ग्रंथ यांचा अभ्यासक्रमाला ‘चतु:श्रेणी’ (फोर ग्रेड) मानले जाणार आहे. पाकिस्तानातील विद्यार्थ्यांना संस्कृत शिक्षणाची संधी उपलब्ध होणे आवश्यक आहे. तसेच संस्कृत या समृद्ध पण दुर्लक्षित भाषेचे तज्ञ पाकिस्तानतही निर्माण होणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन हा अभ्यासक्रम आयोजिण्यात आला आहे.
साप्ताहिक कार्यशाळा
या प्रकल्पाचा प्रारंभ म्हणून प्रत्येक सप्ताह अंताच्या दिवशी संस्कृत भाषेची कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असून या कार्यशाळेत कोणालाही भाग घेता येणार आहे. पाकिस्तानात अनेकांना संस्कृत भाषा शिकण्यात स्वारस्य असल्याचे दिसून आले आहे. त्यांना संधी मिळणे न्यायोचित ठरणार आहे. पाकिस्तानचे साहित्य, काव्य आणि तत्वज्ञान यांची पाळेमुळे वैदिक काळापासूनची आहेत, असे महत्वाचे विधान डॉ. काझमी यांनी या प्रकल्पाच्या संदर्भात केले आहे.