लग्नाचा बाजार...
घरात असलेला मुलगा किंवा मुलगी उपवर झाल्यानंतर त्यांच्या लग्नाचे उत्तरदायित्व पालकांना स्वीकारावे लागते हा प्रत्येक घरातील अनुभव आहे. अलिकडच्या काळात प्रेमविवाहांचे प्रमाण वाढले असले तरी आजही पुष्कळ मातापित्यांना हे उत्तरदायित्व स्वीकारावे लागतेच. वधूवर सूचक मंडळे किंवा इंटरनेटवर मॅट्रिमोनियस साईटस्ही संख्याही आत्ताच्या काळात पुष्कळ असते. त्यामुळे मातापित्यांवरील या संदर्भातले ओझे बरेच कमीही झाले आहे. तरीही मुलाला योग्य अशी वधू शोधणे किंवा मुलीला पती शोधणे हे अलिकडच्या काळात वेळखाऊ आणि जिकीरीचे झाल्याचा अनुभव अनेकांना येतो. वेगाने बदलणाऱ्या काळाचा हा परिणाम आहे. तथापि, चीनच्या एका शहरात स्थिती वेगळीच आहे.
चीनमध्ये शांघाय हे जगप्रसिद्ध औद्योगिक शहर आहे. तेथे उपवर किंवा अविवाहित युवक-युवतींचा अक्षरश: बाजार भरतो. या बाजाराचे अनेक व्हिडीओज प्रसिद्ध करण्यात येत असतात. एखाद्या वस्तूची विक्री करावी तशी या बाजारात वधू-वरांची विक्री केली जाते. विवाहेच्छू युवक-युवतींची प्ररिचय पत्रके आणि त्यांचा ‘दर’ मांडलेला असतो. आपल्याला हवा तो जोडीदार या बाजारपेठेत मिळू शकतो. विवाहेच्छू युवक-युवतींची विक्री चक्क त्यांच्या मातापिताच करत असतात. त्यांनी ठरविलेली किंमत मोजली की जोडीदाराशी विवाह लावण्यात येतो. दरामध्ये घासाघीसही अनेकदा केली जाते. एकंदर वातावरण भाजीबाराजारासारखेच असते. युवक-युवतींच्या परिचयपत्रकात त्यांची सर्व माहिती, आवडीनिवडी, जोडीदाराकडून अपेक्षा, नोकरी, वेतन आणि कौटुंबिक स्थिती यांची सविस्तर माहिती असते. बाजारात उभ्या असणाऱ्या युवक युवतींना एकमेकांशी बोलताही येते. असा हा लग्न बाजार जगाच्या चर्चेचा विषय ठरला नसता तरच नवल मानले जाईल.