महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विवाह सोहळे...डोळे फिरविणारं ‘मार्केट’ !

06:13 AM Jul 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विवाह...म्हणजे आपल्याकडील धारणेनुसार एक अतूट बंधन, साता जन्माची गांठ...मात्र आता ते तेवढ्यापुरतं मर्यादित राहिलेलं नसून त्याचं भव्य-दिव्य स्वरुप विस्तारत चाललंय...प्रचंड उत्पन्न, खिशात खुळखुळणाऱ्या पैशांचं वधारत चाललेलं प्रमाण यामुळं वधू-वराची अन् त्यांच्या कुटुंबांची या समारंभांवर मुक्त हस्ते खर्च करण्याची इच्छा प्रबळ होत चाललीय...त्यातून ‘प्री-वेडिंग’सारखे प्रकार जसे वाढताना दिसताहेत तसंच ‘डेस्टिनेशन वेडिंग’चा प्रवाहही झपाट्यानं वाढीस लागल्याचं दर्शन घडतंय...या पार्श्वभूमीवर भारतीय विवाह सोहळ्यांचं ‘मार्केट’ चक्क देशात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलंय...

Advertisement

भारतातील विवाह सोहळ्यांचा उद्योग पोहोचलाय तो तब्बल 130 अब्ज डॉलर्सवर...अन्नधान्य आणि किराणामाल यांचा अपवाद सोडल्यास त्याला तोंड देणं सध्या कुणालाही शक्य नाहीये...विशेष म्हणजे आपल्या देशातील लग्न समारंभांमध्ये क्षमता आहे ती अनेक ‘सेक्टर्स’चं भलं करण्याचं...भारतातील विवाह सोहळ्यांच्या मार्केटचा विचार केल्यास ती आकारानं अमेरिकेहून दुपटीनं मोठी असली, तरी चीनवर मात करणं मात्र जमलेलं नाही...‘इन्व्हेस्टमेंट बँकिंग’ अन् ‘कॅपिटल मार्केट कंपनी ‘जेफ्रीस’ यांनी या विषयावर एक अहवाल तयार केलाय. त्यांनी या उद्योगाच्या आकाराचा विचार करताना भारतातील विविध विवाहांसाठी प्रसिद्ध असलेली स्थळं नि उपलब्ध संख्या यांना जमेस धरलंय...

Advertisement

भारतातील विवाहांचा सरासरी खर्च...

? भारतातील प्रत्येक विवाहावर होणारा सरासरी खर्च 12.50 लाख रुपये वा 15 हजार डॉलर्स...

? वधू-वरानं त्यासाठीच्या वैयक्तिक बाबींवर ओतलेला पैसा लग्नाच्या दुप्पट असतो अन् त्याला तोंड देणं त्यांच्या पूर्वप्राथमिक ते पदवीपर्यंतच्या शिक्षणावर केलेल्या खर्चाला देखील जमत नाहीये...याउलट अमेरिकेत मात्र विवाहाच्या दुप्पट खर्च शिक्षणावर करण्यात येतोय...

? आकड्यांनुसार, लग्न समारंभांवर केलेला सरासरी खर्च हा भारताच्या दरडोई उत्पन्नापेक्षा पाच पटींनी अधिक (आपलं दरडोई उत्पन्न 2.4 लाख रुपयांवर वा 2900 डॉलर्सवर पोहेचलंय)...

? दुसरीकडे विवाह सोहळ्यांवरील पदरमोड ही कुटुंबांच्या सरासरी वार्षिक उत्पन्नापेक्षा तीन पटींनी जास्त (कुटुंबाचं सरासरी उत्पन्न 4 लाख रुपये)...

? मजेशीर बाब म्हणजे ‘जीडीपी’च्या तुलनेत लग्नाचं पारडं पाच पटींनी भारी करणारं आपल्याकडील वरील प्रमाण हे कित्येक राष्ट्रांहून जास्त...

श्रीमंतांचा थाट...

श्रीमंतांच्या विवाह सोहळ्यांच्या बाबतीत 20 ते 30 लाख रुपयांचा टप्पा अगदी सहज ओलांडण्यात येतोय, तर अतिश्रीमंत कुटुंबांनी ओतलेल्या पैशांचा विचार न केलेलाच बरा...त्यांच्या अंदाजपत्रकात समावेश असतो तो पाच ते सहा समारंभांचा वा कार्यक्रमांचा. जोडीला बड्या हॉटेलांत पाहुण्यांसाठी आलिशान खोल्या, खवय्यांच्या जिभेला वेड लावणारं कॅटरिंग, अक्षरश: झोप उडविणारी सजावट आणि मनोरंजनाचे अन्य कार्यक्रम यांचा. त्यात दागिने, वर-वधूचे नामवंत ‘डिझाईनर्स’नी खास तयार केलेले पोशाख, विमानांची तिकिटं यांचा अंतर्भाव केलेला नाहीये. मुकेश अंबानींसारखा जगातील श्रीमंत गृहस्थ ‘प्री-वेडिंग’वर विवाहाप्रमाणंच पाण्यासारखा  पैसा खर्च करतो...

विविध क्षेत्रांत ‘दिवाळी’ घडविणारे सोहळे...

? अहवालानं भारतातील विवाह सोहळ्यांच्या उद्योगाचा आकार नि त्यांचा विविध सेक्टर्सवर होणारा परिणाम यांचा शोध घेण्याचं अतिशय कष्टाचं काम केलंय...भारतीय लग्नं म्हणजे विविध क्षेत्रांची अक्षरश: दिवाळीच. त्यात समावेश दागिने, कपडेलत्ते, कॅटरिंग, हॉटेल व्यवसाय, प्रवास वगैरे बाबींचा...

? फक्त दागिन्यांचा विचार केल्यास त्या क्षेत्राचा 50 टक्के महसूल हा अवलंबून असतो वधूकडून परिधान केल्या जाणाऱ्या दागिन्यांवर, तर 10 टक्के समारंभांच्या वेळी वापरल्या जाणाऱ्या कपड्यांवर...

? प्रत्यक्ष लग्न समारंभाच्या वेळी होणाऱ्या खर्चाच्या बाबतीत दागिन्यांवर सर्वांत जास्त 25 टक्के, कॅटरिंगवर 20 टक्के, तर ‘इव्हेंट्स’वर 15 टक्के रकक्म ओतण्यात येतेय...

सेवा पुरवठादारांची चांदी...

लग्नासाठी विविध सेवांचा पुरवठा करणारे व्यावसायिक असंघटित क्षेत्रांमध्ये येत असले, तरी वैशिष्ट्यापूर्ण बाब म्हणजे विवाहाच्या आकाराचा विचार न करता ते अधिक खर्च व कमी पदरमोड करणाऱ्यांना देखील आपली सेवा पुरवितात...भारतातील प्रत्येक राज्यातील विवाह सोहळ्यांचा विचार केल्यास आपापल्या रीतीरिवाजांना काटेकोरपणे जपलं जात असल्यानं त्यामध्ये भरपूर वैविध्य दिसून येतं. त्यामुळं लहान आणि प्रादेशिक ‘प्लेयर्स’ ग्राहकांना चांगली सेवा देतात...गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीयांना विदेशात विवाह समारंभ साजरा न करता ‘मेड इन इंडिया’ला चालना देण्याचा संदेश दिला होता. कारण भारतातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींवर विवाह समारंभाचं आयोजन करण्याच्या बाबतीत विदेशातील स्थळांची मोहिनी पडू लागलीय...

‘डेस्टिनेशन वेडिंग’चा ‘ट्रेंड’...

? सध्या गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या ‘प्रोफेशनल्स’ तसंच अन्य धनिकांमध्ये देश-विदेशातील नयरनम्य ठिकाणं शोधून तिथं लग्न समारंभ भव्यदिव्य स्वरुपात आयोजित करण्याची टूम आलीय अन् हा प्रवाह वाढत चाललाय. त्यामुळं चंगळ होऊ लागलीय ती ‘वेडिंग प्लॅनर्स’ची...

? गेल्या वर्षीच्या एका अहवालानुसार, या उद्योगातील सर्वांत आशादायक विभागांपैकी एक म्हणजे ‘वेडिंग टुरिझम’. 2022 मधील 18 टक्क्यांच्या तुलनेत यंदा ‘डेस्टिनेशन वेडिंग’ची टक्केवारी वाढून 21 टक्क्यांवर पोहोचेल असा अंदाज त्यात व्यक्त केलाय...

? ऋषिकेश हा त्यासाठीचा नवा ‘हॉटस्पॉट’ बनण्याच्या वाटेवर असल्याचं त्यात म्हटलंय...याव्यतिरिक्त गोवा, राजस्थानमधील जयपूर, उदयपूर, केरळ आणि हिमाचल प्रदेशातील मसुरीसारखी स्थळं ही ‘डेस्टिनेशन वेडिंग’साठी पसंतीची ठिकाणं असल्याचं या अहवालानं समोर आणलंय...

? आंतरराष्ट्रीय आघाडीवर मध्य-पूर्व हे थायलंडला मागं टाकून आवडतं भारतीय ‘वेडिंग डेस्टिनेशन’ बनलंय. आंतरराष्ट्रीय विवाह सोहळ्यांचा अनुभव असलेल्या 30 टक्के व्यावसायिकानी दुबई, बाहरिन आणि ओमानला पसंतीचं ठिकाण म्हणून नमूद केलंय. त्यानंतर थायलंड नि इटलीचा क्रमांक लागतो...उदयोन्मुख आंतरराष्ट्रीय स्थळांमध्ये बाली व तुर्की यांचा समावेश होतो असंही या सर्वेक्षणात नमूद करण्यात आलंय...

? यंदाच्या अन्य एका सर्वेक्षणानुसार, अंदाजे 69 टक्के शहरी ‘प्रोफेशनल्स’नी ‘डेस्टिनेशन’ विवाह आयोजित करण्याकडे वाढता कल दर्शविलाय, तर केवळ 11 टक्क्यांनी प्राधान्य दिलंय ते पारंपरिक सोहळ्यांना...त्यात नमूद केल्याप्रमाणं, अशा 30 टक्के लोकांनी गोवा व राजस्थानला ‘डेस्टिनेशन वेडिंग’चा सर्वोत्तम पर्याय म्हणून निवडलं, तर अनुक्रमे 21 टक्के अन् 19 टक्के लोकांनी निवड केली ती लक्षद्वीप नि हिमाचल प्रदेशची...

लग्नांची वार्षिक सरासरी संख्या...

देश              विवाहांची संख्या

भारत          80 लाख ते 1 कोटी

चीन            70 ते 80 लाख

अमेरिका      20 ते 25 लाख

विवाह सोहळ्यांवरचा सरासरी खर्च...

देश                 खर्च

चीन               170 अब्ज डॉलर्स

भारत             130 अब्ज डॉलर्स

अमेरिका          70 अब्ज डॉलर्स

अतिश्रीमंतांच्या भारतीय लग्नांचा खर्च...

गट                            खर्च

दागिने                   35 ते 40 अब्ज डॉलर्स

कॅटरिंग                  24 ते 26 अब्ज डॉलर्स

कार्यक्रम                 18 ते 20 अब्ज डॉलर्स

छायाचित्रण                10 ते 12 अब्ज डॉलर्स

पोशाख                     9 ते 10 अब्ज डॉलर्स

सजावट                    9 ते 10 अब्ज डॉलर्स

अन्य खर्च                20 ते 25 अब्ज डॉलर्स

मार्केट आकारानुसार भारतीय लग्न सोहळे दुसऱ्या स्थानावर...

गट                                                   खर्च

अन्न व किराणामाल                           681 अब्ज डॉलर्स

लग्नं                                            130 अब्ज डॉलर्स

कपडे व अन्य संलग्न वस्तू                 84 अब्ज डॉलर्स

दागिने                                     78 अब्ज डॉलर्स

घर, फर्निचर                              42 अब्ज डॉलर्स

कन्झ्युमर ड्युरेबल्स                     39 अब्ज डॉलर्स

मोबाईल                                    32 अब्ज डॉलर्स

आरोग्य व ब्युटी केअर                 32 अब्ज डॉलर्स

पादत्राणं                                   11 अब्ज डॉलर्स

 

संकलन : राजू प्रभू

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article