For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दुबईत भारतीयांच्या नावावर दीड लाख कोटीची संपत्ती

06:30 AM May 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
दुबईत भारतीयांच्या नावावर दीड लाख कोटीची संपत्ती
Advertisement

पाकिस्तानी नागरिक 91 हजार कोटीच्या संपत्तीचे मालक : झरदारी-मुशर्रफ यांचेही नाव सामील

Advertisement

वृत्तसंस्था/ दुबई

जगभरातील धनाढ्यांमध्ये दुबईत मालमत्ता खरेदी करण्याची क्रेझ सातत्याने वाढतेय. भारताच्या 29 हजार 700 लोकांकडे दुबईमध्ये 35 हजार मालमत्ता आहेत. या मालमत्तांचे मूल्य 1.42 लाख कोटी रुपये इतके आहे. सेंटर फॉर अॅडव्हान्स डिफेन्स स्टडीजला मिळालेल्या डाटाच्या आधारावर 58 देशांमधील 74 माध्यमसमुहांनी यासंबंधीचा अहवाल तयार केला आहे.

Advertisement

या अहवालाला ‘दुबई अनलॉक्ड’ नाव देण्यात आले आहे. यात 2020-22 पर्यंत दुबईत विदेशी नागरिकांच्या असलेल्या संपत्तीचा तपशील नमूद आहे. अहवालानुसार या यादीत सर्वात वर भारतीयांची नावे आहेत. संपत्तीप्रकरणी पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचे 17 हजार नागरिक सुमारे 23 हजार संपत्तींचे मालक आहेत. या संपत्तींचे एकूण मूल्य 91.8 हजार कोटी रुपये आहे.

मुकेश अंबानींचे नाव सामील

यादीत तिसऱ्या स्थानावर ब्रिटन तर चौथ्या स्थानावर सौदी अरेबियाचे नागरिक आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची दुबईत 2 हजार कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर लुलु ग्रूपचे प्रमुख एमए युसूफ अली आणि त्यांच्या कुटुंबाकडे 585 कोटीची संपत्ती आहे. या यादीत अब्जाधीश गौतम अदानी यांच्या बंधूचेही नाव आहे. तसेच बॉलिवूड कलाकार शाहरुख खान, अनिल कपूर आणि शिल्पा शेट्टी देखील दुबईतील कोट्यावधींच्या संपत्तीचे मालक आहेत. अहवालानुसार दुबईत विदेशींकडे एकूण 160 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे.

झरदारींचे पेंटहाउस

जगभरात भ्रष्टाचाराचे आरोपी असलेले राजकीय नेते, सेलेब्रिटीज, उद्योजकांसह गुन्हेगारांच्या दुबईत संपत्ती आहेत. आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांच्यापासून माजी सैन्यप्रमुख परवेझ मुशर्रफ यांचेही नाव याती सामील आहे. मार्च 2014 मध्ये अब्दुल गनी माजिद नावाच्या व्यक्तीने दुबईतील एक पेंटहाउस झरदारी यांना गिफ्ट म्हणून दिले होते. याची किंमत तेव्हा 2700 कोटी रुपये होती. झरदारी यांचे पुत्र बिलावल भुट्टो यांचीही दुबईत संपत्ती आहे. तसेच नवाज शरीफ यांचे पुत्र हुस्सेन, पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी, अनेक खासदार आणि आमदारही दुबईतील कोट्यावधींच्या संपत्तीचे मालक आहेत.

हिजबुल्लाह-हूतीचे सदस्यही संपत्तींचे मालक

दुबईत अनेक दहशतवादी संघटनांच्या सदस्यांकडेही लाखो-कोट्यावधींची संपत्ती आहे. यात हूती दहशतवादी आणि लेबनॉनमधून संचालित होणाऱ्या हिजबुल्लाह संघटनेच्या सदस्यांची नावे सामील आहेत. हिजबुल्लाह संघटनेसाठी मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप असलेल्या अली ओसीरानची बुर्ज खलिफामध्ये एक प्रॉपर्टी आहे. तर इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्सने देखील दुबईत मालमत्तांची खरेदी केली आहे. तर जपानमध्ये अवैध कारवायांचा आरोप असलेल्या 1 हजार लोकांच्या दुबईत संपत्ती आहेत.

बुर्ज खलिफाचे मूल्य वाढतेच

बुर्ज खलिफामध्ये इमारतीची किंमत 2021 पासून 55 टक्क्यांपेक्षा अधिक दराने वाढली आहे. दुबईत 2023 मध्ये 10 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 83.45 कोटी रुपये) मूल्य असलेल्या 431 घरांची विक्री झाली आहे. जगातील कुठल्याही शहराच्या तुलनेत हे प्रमाण सर्वाधिक आहे. या प्रकरणी लंडन 240 घरांसह दुसऱ्या तर न्यूयॉर्क 211 घरांच्या विक्रीसह तिसऱ्या स्थानावर आहे. दुबईत 4 कोटीची संपत्ती खरेदी केल्यावर सहजपणे दीर्घकालीन व्हिसा प्राप्त होतो.

Advertisement
Tags :

.