पुढील अधिवेशनापर्यंत पत्रकार भवन उद्घाटनासाठी प्रयत्न करू
पालकमंत्री सतीश जारकीहोळी : निधी मंजूर केल्याबद्दल पत्रकारांकडून सन्मान
बेळगाव : शहरात पत्रकारांसाठी सुसज्ज पत्रकार भवनाची आवश्यकता होती. यासाठी अनेकवेळा निवेदने देण्यात आली. याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम खात्याकडून 10 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. यंदाच्या अधिवेशनादरम्यान भवनचे भूमिपूजन करण्यात येणार असून पुढील अधिवेशनावेळी याचे उद्घाटन केले जाईल, असे आश्वासन पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिले. पत्रकार भवनासाठी निधी मंजूर केल्याबद्दल मंगळवारी वार्ता भवनमध्ये सत्कार स्वीकारून ते बोलत होते. जारकीहोळी म्हणाले, 20 वर्षांपासून पत्रकार भवन निर्माण करण्याची मागणी होत होती. मात्र याची कोणीही दखल घेतली नाही.
आपल्या सरकारने याची दखल घेतली असून मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याकडून 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. यामुळे पत्रकार भवन निर्माण होणार असल्याने पत्रकारांप्रमाणे आपणही आनंदी असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यात अनेक कोट्यावधी रुपयांची विकासकामे करण्यात येत आहेत. राज्यात सुमारे 500 ब्रिज निर्माण करण्यात येणार असून जिल्ह्यातही विविध ठिकाणी ब्रिज निर्माण करण्याची कामे करण्यात येत आहेत. तसेच चिकोडीसह विविध ठिकाणी न्यायालयांचा विकास करण्यात येत आहेत. आपल्या कार्यकाळात अनेक विकासकामांसाठी निधी मंजूर केला असून कामेही प्रगतीपथावर असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी वार्ता खात्याचे अधिकारी, पत्रकार उपस्थित होते.