लवकरच शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊ
जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांचे आंदोलन मागे, जय किसानचा इमारत परवाना रद्दची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
जय किसान भाजी मार्केटचा लँड यूज रद्द करण्यासह कृषी पणन खात्याकडून व्यापार परवानाही रद्द केला आहे. त्यामुळे भाजी मार्केट आवारातील इमारती बेकायदा ठरवून व तेथील विद्युत कनेक्शन बंद करण्याच्या मागणीसाठी सोमवारी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. परिणामी सायंकाळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.
दरम्यान, शेतकरी दुपारी 12 च्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहभागी झाले. यानंतर ठाण मांडून मागणीची त्वरित अंमलबजावणी करण्याची मागणी करत घोषणाबाजी केली. सरकारने जय किसान भाजी मार्केटचा व्यापार परवाना रद्द केला आहे. आता तेथील इमारती बेकायदेशीर ठरविण्याबाबत नोटीस जारी करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
शेतकरी-पोलिसांमध्ये झटापट
जिल्हाधिकाऱ्यांनी सायंकाळी 4 वाजेपर्यंत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र 5 वाजल्यानंतरही जिल्हाधिकाऱ्यांकडून निर्णय न आल्याने शेतकरी संतप्त झाले. परिणामी बॅरिकेड्स पाडून जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला. यावेळी पोलीस व शेतकऱ्यांमध्ये काहीशी झटापट झाली. पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत वेळीच शेतकऱ्यांची अडवणूक केली. याचे गांभीर्य ओळखून शहर पोलिसांकडून बंदोबस्तात वाढ करण्यात आली.
संतप्त शेतकऱ्यांकडून रास्ता रोको
संतप्त शेतकऱ्यांनी न्यायालसमोरील मुख्य रस्त्यावर ठाण मांडून रास्तारोको केला. यामुळे काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी विनाविलंब निर्णय द्यावा, अशी मागणी करत शेतकऱ्यांकडून घोषणाबाजी करण्यात येत होती. काहीकाळ ठाण मांडल्यानंतर एका मार्गाची वाहतूक सुरू करण्यात आली. यातच पाऊस सुरू झाल्याने शेतकरी भर पावसात ठाण मांडून आंदोलन करत होते. याचा फटका या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना बसला.
जिल्हा प्रशासनाची बैठक
दुपारी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाची या विषयाबाबत बैठक घेण्यात येत होती. सुमारे अडीच तास सुरू असलेली बैठक आटोपून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे, प्रांताधिकारी श्रवण नायक, महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी भर पावसात आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
कायद्याच्या चौकटीत निर्णय घेऊ
जिल्हाधिकाऱ्यांनी हा विषय उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. सुमारे अडीच तास बैठक घेऊन सर्व कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे. यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून जिल्हा प्रशासनाकडून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊ. यासाठी शेतकऱ्यांनीही सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. याला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.
सर्वांचे लक्ष ‘जय किसान’वर
जय किसान भाजी मार्केटचा परवाना रद्द करण्यात आला. यानंतर इमारत परवाना रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी तर मार्केट वाचविण्यासाठी जय किसान भाजी मार्केटमधील व्यापारी आंदोलन करत आहेत. जिल्हा प्रशासनाकडून हा विषय न्यायप्रविष्ट असून लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे दोन्ही बाजूंनी हा प्रश्न प्रतिष्ठेचा बनला असून कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सोमवारी दिवसभर चर्चेचा विषय
सोमवारी सकाळपासून शेतकरी व व्यापारी यांचे आंदोलनाचे सत्र सुरूच होते. शेतकरी जय किसान भाजी मार्केटचा इमारत परवाना रद्द करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत होते. तर महापालिका कार्यालयासमोर मार्केटमधील व्यापाऱ्यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत होते. एकंदरीत सोमवारी एकमेकांविरोधात दोन्ही बाजूंनी श•t ठोकण्यात येत होता. यामुळे सोमवारी दिवसभर जय किसान भाजी मार्केटचीच चर्चा होत होती.
‘जय किसान’ व्यापाऱ्यांचा आज मोर्चा
जय किसान भाजी मार्केट व्यापारी मंगळवार दि. 23 रोजी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार आहेत. तसेच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर करणार आहेत. व्यापाऱ्यांकडून भाजी मार्केट ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढण्यात येणार आहे.