गोवा मुक्तीदिनी आमदारांना काळे झेंडे दाखवणार
म्हापसा येथील व्यापारी संघटनेचा सरकारला इशारा : अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न सोडविण्याची मागणी
म्हापसा : म्हापसा येथील बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर स्थानिक आमदार जोशुआ डिसोझा आणि पालिकेने लक्ष घालून येत्या 15 डिसेंबरपर्यंत त्या सोडवाव्यात, अन्यथा गोवा मुक्तीदिनी 19 डिसेंबर रोजी काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवू, असा निर्वाणीचा इशारा म्हापसा व्यापारी संघटनेने दिला आहे. म्हापसा पालिकेत मुख्याधिकाऱ्यांनी बोलावलेल्या बैठकीनंतर म्हापसा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र फळारी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी सरचिटणीस सिद्धेश राऊत, अखिल गोवा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नारायण कारेकर व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. म्हापसा पालिकेत मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर यांच्या नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांबरोबर बैठक झाली. यावेळी व्यापाऱ्यांनी आपल्या अनेक वर्षापासून रखडून पडलेल्या प्रश्नांबाबत चर्चा केली.
म्हापसा पालिकेच्या मालकीच्या दुकानांच्या नगरपालिकेकडे तिष्टत पडलेल्या प्रश्नांमध्ये भाडेकरू करारपत्र नूतनीकरण, रक्ताच्या नात्यातील दुकानांचे हस्तांतरण आणि थकीत विविध करार वसुलीसंदर्भासह इतर मागण्यांवर व्यापाऱ्यांना पालिकेकडून अद्याप दिलासा मिळालेला नाही. हे प्रश्न सुटण्यासाठी कोणती आवश्यक पावले उचलण्यात यावीत यावर व्यापाऱ्यांनी बैठकीत मते मांडली. सरकार फक्त म्हापशातील व्यापारी वर्गालाच लक्ष्य बनवत असल्याचा आरोपही बहुतांश व्यापाऱ्यांनी केला. व्यापाऱ्यांनी बैठकीत आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आम्ही व्यवसाय करून आमचा उदरनिवार्ह चालवतो. सरकारकडून आम्हाला आमच्या व्यवसायात नाहक त्रास दिला जात आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशांची आम्हाला कल्पना नाही. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या व्यापारी संघटनेच्या बैठकीचे इतिवृत्त आपल्याला बीएमएकडून मिळालेले नाही. ते आल्यावर पुढील प्रक्रिया करू पण ज्या नोटिसा भाडेकरूंना पाठवल्या आहेत. त्यांचा अहवाल सरकारला सादर केला जाईल. जितेंद्र फळारी म्हणाले की, म्हापशातील व्यापाऱ्यांच्या करारपत्र नूतनीकरणाचा हा प्रश्न 2018 पासून प्रलंबित आहे. वेळोवेळी पालिका व आमदारांकडे व्यापारी संघटनेने पाठपुरावा केला आहे. परंतु, आम्हाला दिलासा मिळालेला नाही. मुख्यमंत्र्यांकडून हा प्रश्न धसास लागेल अशी आमची अजूनही आशा आहे. मात्र स्थानिक पातळीवर आम्हाला सहकार्य मिळत नाही. येत्या 15 डिसेंबरपर्यंत व्यापाऱ्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करून आमदार हे म्हापसेकर म्हणजे व्यापाऱ्यांचेच आहे, हे त्यांनी सिद्ध करावे, अन्यथा 19 डिसेंबर रोजी काळे झेंडे दाखवून आम्ही त्यांचा निषेध करणार, असे म्हापसा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र फळारी यांनी सांगितले.