आंदोलनाआड दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेणार
हत्तरगी येथील घटनेत अकरा जण जखमी
प्रतिनिधी/ बेळगाव
ऊसदर आंदोलनावेळी हत्तरगी टोलनाक्यावर शुक्रवारी दुपारी झालेल्या दगडफेकीत चार बसेस आणि दोन पोलीस वाहनांसह दहा वाहनांचे नुकसान झाले असून पोलीस उपअधीक्षकांसह अकरा जण जखमी झाले आहेत. सीसीटीव्ही फुटेजवरून दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालक हितेंद्र आर. यांनी सांगितले. दगडफेकीतील जखमी अधिकारी व पोलिसांपैकी पाच जणांना खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी खासगी इस्पितळाला भेट देऊन जखमी अधिकाऱ्यांची त्यांनी विचारपूस केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना हितेंद्र यांनी संपूर्ण घटनेची माहिती दिली. सुमारे 40 ते 50 फुटेज ताब्यात घेऊन दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
हितेंद्र आर. यांच्यासमवेत बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक चेतनसिंग राठोड, पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, पोलीस उपायुक्त नारायण बरमणी आदी अधिकारी उपस्थित होते. जखमी अधिकारी व पोलिसांकडून टोलनाक्यावरील घटनेविषयी त्यांनी माहिती घेतली.
शुक्रवारी दुपारी ऊसदर आंदोलनावेळी हत्तरगी टोलनाका परिसरात तुफान दगडफेक झाली होती. या घटनेची माहिती मिळताच रात्री उशिरा कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालक हि तेंद्र आर. हे बेळगावात दाखल झाले आहेत. शनिवारी जखमी अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर हत्तरगी टोलनाका परिसराला भेट देऊन त्यांनी घटनास्थळाचीही पाहणी केली.
शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना अचानक दगडफेक झाली आहे. दगडफेक करणारे शेतकरीच आहेत, असे म्हणता येणार नाही. सुमारे 40 ते 50 सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन संबंधितांचा शोध घेण्यात येत आहे. यमकनमर्डी पोलीस स्थानकात 11 अज्ञातांविरुद्ध सरकारतर्फे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दगडफेकीची घटना लक्षात घेता कोणीतरी उद्देशपूर्वक दगडफेक केल्याचे दिसून येते. संपूर्ण चौकशीनंतर सत्य बाहेर पडणार असल्याचे हितेंद्र आर. यांनी सांगितले.
प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार
शेतकरी आंदोलनाच्या बंदोबस्तासाठी आलेले गदग सीईएनचे पोलीस उपअधीक्षक महांतेश सज्जन यांच्या हाताला दुखापत झाली आहे. त्यांना खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. यमकनमर्डीचे पोलीस पी. बी. गाडीव•र, राज्य राखीव दल दुसऱ्या बटालियनचे बी. आर. कामगौडर, इंडी ग्रामीणचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी. एल. राठोड, यमकनमर्डीचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ए. आर. जाधव हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर यमकनमर्डी, उळ्ळागड्डी-खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.