दिव्यांग बांधवांच्या लढ्यासाठी आता मैदानात उतरणार
महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचा जागतिक अपंग दिनानिमित्त संकल्प ; ओरोस येथे अपंग दिन साजरा
ओरोस प्रतिनिधी
दिव्यांगांसाठी अनेक योजना सरकार राबवत आहे. पण त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही. शासकीय पातळीवर दिव्यांगांचे प्रश्न , समस्या अनेक आहेत. दिव्यांगांच्या संरक्षणार्थ सुरक्षेच्या दृष्टीने अनेक निर्णय घेतले जातात. अध्यादेश काढले जातात. पण त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. आज सर्वसामान्य दिव्यांगांसमोर अनेक अडचणी आहेत त्या अडचणी निश्चितपणे सोडवल्या जातील. यापुढे संघटना गावागावातील सर्वसामान्य गोरगरीब दिव्यांग बांधवांच्या लढ्यासाठी आता मैदानात उतरणार आहे. सर्वसामान्य दिव्यांग बांधवांना आर्थिक मदत देऊन त्यांना उभारी देण्याचे काम केले जाईल असा संकल्प काल जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून ओरोस माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या कार्यालयात करून जिल्हास्तरीय जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव ,अधिकारी ,कर्मचारी उपस्थित होते .
यावेळी सर्वप्रथम जागतिक अपंग दिनानिमित्त हीलन किलर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष सौ सुरेखा परब देसाई, जिल्हा सचिव अनिल कदम,कार्याध्यक्ष प्रशांत बुचडे ,रमेश कांबळे ,उपाध्यक्ष रवींद्र लोकरे ,कोषाध्यक्ष जमुस गावित, जिल्हा संचालक अभय करंबळेकर,जिल्हा सल्लागार सुदाम जोशी ,जिल्हा सदस्य मंगेश परब ,इरफान सारंग ,संतोष धुळप, जिल्हा सदस्य कुंदा बोंडाळे, संगीता म्हाडगूत , राजन खोत , मंगेश परब ,सौ अर्चना सावंत,डीएम डिसोजा,बाळकृष्ण सक्रे, आनंद तोंडवळकर ,सुमन पेडणेकर, उमाकांत बोमनाळे,मोहिनी वस्त ,अर्चना राजपूत, आदी उपस्थित होते.
यावेळी खास जागतिक अपंग दिनानिमित्त सामाजिक काम करून दिव्यांग बांधवांच्या हितासाठी झटणाऱ्या दिव्यांग आदर्श व्यक्तींचा गौरव करण्यात आला. यामध्ये जिल्हा अध्यक्ष सुरेखा परब,उपाध्यक्ष रवींद्र लोकरे ,सुदाम जोशी आदींचा विशेष गौरव करण्यात आला. आज जागतिक अपंग दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष सौ सुरेखा परब देसाई म्हणाल्या आज आपली महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना दिव्यांग बांधवांच्या हितासाठी झटत आहे . कर्मचाऱ्यांच्या समस्या ,अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने ही संघटना निश्चितपणे नेहमी अग्रेसर आहे. शासनाच्या माध्यमातून आज विविध योजना तळागाळापर्यंत कशा पोहोचतील या दृष्टीने आमचे कार्य सुरू आहे. कोरोना महामारीच्या काळात जवळपास सर्वसामान्य दिव्यांग बांधवांसाठी दोन लाख रुपयांच्या आसपास आर्थिक मदत करण्यात आली आहे. आता यापुढेही अशी आर्थिक मदत करून त्यांना उभारी देण्याचे काम केले जाईल. यावेळी उपाध्यक्ष रवींद्र लोकरे,कार्याध्यक्ष प्रशांत बुचडे, रमेश कांबळे , आदींनी दिव्यांग बांधवांच्या हितासाठी निश्चितपणे ही संघटना कार्यरत आहे. आज गावागावात सर्वसामान्य गोरगरीब दिव्यांग बांधव यांच्यासमोर अनेक प्रश्न आहेत. समाजामध्ये त्यांना चांगले स्थान कसे मिळेल या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत. आज शासनाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांच्या हितासाठी अनेक अध्यादेश काढले जातात. पण , त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी प्रयत्न केले जातील असे त्यांनी स्पष्ट केले. आजच्या जागतिक अपंग दिनाच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग बांधवांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. विशेष करून ही महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना यापुढे सर्वसामान्य गोरगरीब दिव्यांग बांधवांच्या समस्या प्रभावीपणे सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आणि तसा संकल्प आज केला जात आहे. असे त्यांनी स्पष्ट केले. ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद आधी विविध शासनाच्या योजना प्रभावीपणे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने अभियान राबवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने दिव्यांग कर्मचारी उपस्थित होते.